अमेरिकेमध्ये नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचे मंत्रीमंडळ नेमण्यात व्यस्त आहेत. या ट्रम्प टिमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांचा समावेश झाला आहे. आता त्यामध्ये डॉ. जय भट्टाचार्य यांची भर पडली आहे. डॉ. जय भट्टाचार्य यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. कोलकाता येथील डॉ. भट्टाचार्य हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहे. कोरोना काळात त्यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांनी कोरोनामध्ये लॉकडाऊन लावण्यास तीव्र विरोध केला होता. निरोगी लोकांमध्ये विषाणूचा प्रसार होऊ द्या, असे निवदन त्यांनी जाहीर केले होते. कोरोनासारख्या विषाणूंविरूद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित होणे गरजेचे आहे, त्यासाठी लॉकडाऊन, लस आणि मास्क यांचा त्यांनी तीव्र विरोध केला होता. त्यांच्या या मतांचा जागतिक आरोग्य संघटनेनं निषेध केला होता. त्यामुळे डॉ. जय भट्टाचार्य आणि जागतिक आरोग्य संघटना हा वाद अमेरिकेत बराच काळ चालला. (Dr. Jay Bhattacharya)
आता त्याच जय भट्टाचार्य यांच्या हातात डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालकपदाची जबाबदारी दिली आहे. कोलकतामध्ये जन्मलेल्या डॉ. जय भट्टाचार्य यांना ट्रम्प सरकारमध्ये मानाचे पद मिळाले आहे. जय भट्टाचार्य यांचा जन्म 1968 मध्ये कोलकाता येथे असून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमडी आणि पीएचडी केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्यावर अमेरिकेतील आघाडीच्या वैद्यकीय संशोधन संस्थेची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे डॉ. जय भट्टाचार्य हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सर्वोच्च प्रशासकीय पदासाठी नामांकन झालेले पहिले भारतीय-अमेरिकन बनले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांच्यासह नव्याने स्थापन झालेल्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय-अमेरिकन विवेक रामास्वामी यांची निवड केली आहे. मात्र या नियुक्तीला सेनेटची परवानगी आवश्यक आहे. नॅशनल इन्टिट्युट ऑफ हेल्थचे संचालक म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे 27 संस्थांची जबाबदारी असेल. ही संस्था साथीच्या रोगांसाठी लस आणि नवीन औषधे विकसित करते. (International News)
भट्टाचार्य यांनी या निवडीसाठी नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानून अमेरिकन वैज्ञानिक संस्थांमध्ये सुधारणा करुन अमेरिकेला पुन्हा निरोगी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे सांगितले आहे. सध्या डॉ. जय भट्टाचार्य हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात औषध, अर्थशास्त्र आणि आरोग्य संशोधन धोरणाचे अमेरिकन प्राध्यापक आहेत. ते स्टॅनफोर्ड सेंटर फॉर डेमोग्राफी अँड इकॉनॉमिक्स ऑफ हेल्थ अँड एजिंगचे संचालक आहेत. 56 वर्षाचे डॉ. जय भट्टाचार्य विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय म्हणून ओळखले जातात. त्यांचे संशोधन आरोग्य सेवेच्या अर्थशास्त्रावर केंद्रित आहे. कोरोना काळात लॉकडाऊनला विरोध करणारे डॉ. जय भट्टाचार्य आता रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांच्यासोबत काम करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांवरचा विश्वास या नियुक्तीनंतर पुन्हा एकदा दिसून आला आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय विवेक रामास्वामी यांच्यावर अमेरिकन सरकारमधील सरकारी कार्यक्षमता विभागाची जबाबदारी सोपवली आहे. एलोन मस्क यांच्या सोबतीनं रामास्वामी अमेरिकन सरकारमधील अतिरिक्त खर्चाला कात्री लावणार आहेत. संरक्षण आणि गुप्तचर प्रकरणांचा व्यापक अनुभव असलेले रिपब्लिकन हाऊसचे माजी कर्मचारी काश पटेल यांनाही ट्रम्प मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. (Dr. Jay Bhattacharya)
=====
हे देखील वाचा : अमेरिकेने घ्यावे भारताकडून धडे !
========
यामध्ये निक्की हॅली यांचेही नाव पुढे आहे. प्रख्यात रिपब्लिकन राजकारणी, निक्की हेली या पूर्वीच्या ट्रम्प सरकारच्या काळात दक्षिण कॅरोलिनाच्या राज्यपाल आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत होत्या. रिपब्लिकन अध्यक्षीय प्राथमिक शर्यतीत त्या ट्रम्प यांच्या विरोधात होत्या. मात्र नंतर त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. आता त्या ट्रम्प यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय अमेरिकेत आणखी एक चर्चेत असलेल्या भारतीयाचे नाव म्हणजे, शल्लभ शल्ली कुमार. शिकागोस्थित कुमार हे रिपब्लिकन हिंदू कोलिशनचे प्रमुख आणि ट्रम्प मोहिमेतील प्रमुख देणगीदार आहेत. मोहिमेच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आता ट्रम्प त्यांनाही आपल्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय बॉबी जिंदाल यांचेही नाव पुढे आहे. लुईझियानाचे माजी राज्यपाल बॉबी जिंदाल ट्रम्प प्रशासनाचा भाग होऊ शकतात. जिंदाल हे आता सेंटर फॉर अ हेल्दी अमेरिकाचे अध्यक्ष आहेत. अमेरिका फर्स्ट धोरणाचे जिंदाल पाठिराखे असल्यामुळे त्यांना ट्रम्प आपल्यासोबत घेणार असल्याची बोलले जाते. (International News)
सई बने