Home » सेवाभावी साधनाताई!

सेवाभावी साधनाताई!

by Correspondent
0 comment
Sadhana Amte | K Facts
Share

आनंदवन म्हणा किंवा हेमलकसा म्हणा ही दोन्ही नावे आपल्या परिचयाची आणि जवळची आहेत. बऱ्याच लोकांना याबद्दल आधीपासूनच माहिती आहे पण बहुसंख्य वर्ग असाही होता ज्यांना याबद्दल माहिती मिळाली ती 2014 साली प्रेक्षकांसमोर प्रदर्शित झालेल्या ‘डॉ.प्रकाश बाबा आमटे – A real hero’ या चित्रपटातून. आनंदवन आणि हेमलकसा हे डॉ. विकास बाबा आमटे आणि डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या देखरेखीखाली आणि संगोपनाखाली मोठे झाले असले तरी याची सुरुवात केली ती श्री बाबा आमटे यांनी. बाबांकडे सुरवातीपासूनच अत्यंत चिकाटी होती, सामाजिक रूढींना न जुमानणारे ते होते.

समाजासाठी काहीतरी करावे यासाठी ते सतत आघाडीवर असायचे म्हणूनच सगळ्या सुखसोयी हाताशी असूनसुद्धा त्यांनी समाजकल्याणाचा खडतर मार्ग निवडला. हा मार्ग कधीच सोपा नव्हता, या प्रवासात अडथळ्यांचा सहवास जास्त मिळाला. सर्व स्तरातील लोकांना समाजात बरोबरीचे स्थान मिळावे यासाठी बाबांचे खूप मोठे योगदान आहे. कुष्ठ रोग्यांसाठी त्यांची असणारी तगमग यातूनच आनंदवनाचा जन्म झाला. या खडतर प्रवासात त्यांना शेवटपर्यंत साथ दिली ती त्यांचा पत्नी ‘सौ. साधना आमटे’ यांनी. असे म्हणतात ना ‘आयुष्याच्या प्रवासात जोडीदाराची साथ असली की प्रवास भागीदारीचा आणि सोपा होतो’ हे वाक्य बाबांनी साधना ताईंच्या साथीने खरे करून दाखविले. बाबांच्या या प्रवासात साधना ताईंचा तितकाच मोलाचा वाटा आहे.

साधना आमटे
साधना आमटे

आज 5 मे, साधना आमटे (Sadhana Amte) यांच्या जन्मदिवस. या निमित्ताने त्यांचा जीवनातील काही घडामोडी सांगाव्याशा वाटतात. साधना आमटे यांचा जन्म 5 मे 1926 रोजी नागपूर येथे झाला. साधना ताईंचे नाव ‘इंदू घुले’.  एकूण 6 भावंडे आणि तिसरा नंबर म्हणजे साधना ताई. आई आणि ही 6 मुले. अशा साधना ताई लहानाच्या मोठ्या झाला. त्या 10 वर्षाच्या असतानाच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. भावंडांची जबाबदारी आईबरोबर त्यांनी उत्तम पार पाडली.

साधना ताईंचे घराणे म्हणजे अगदी सनातन, धार्मिक आणि जुन्या परंपरेला चिकटून असलेले. आचारविचार, व्रतवैकल्ये, सोवळे ओवळे हे सगळे पाळण्यात त्या आघाडीवर असायच्या. घुले घराणे हे पूर्वी भट्ट या नावाने प्रसिद्ध होते, शिवाजी महाराजांच्या काळातले गागाभट्ट हे घुल्यांचे पूर्वज. इतके मोठे घराणे आणि सुशिक्षित वातावरण असल्यामुळे साधना ताईंचे शिक्षणसुद्धा छान झाले. अभ्यासातही त्या हुशार होत्या आणि सातत्याने त्यांचा पहिला नंबर येत असे. अभ्यासात हुशार असल्यामुळे शाळेचे अधिकारी अण्णासाहेब जामदार यांच्या आग्रहाखातर सातवीत असताना त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्या आणि त्याचा निकाल म्हणजे आठवी ते दहावी तीन वर्षे दरमहा पाच रुपये अशी स्कॉलरशिप त्यांना मिळाली.

Samidha by Sadhana Amte

1944 साली साधना ताई मँट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. दुसरी श्रेणी आणि रसायनशास्त्र ही जमेची बाजू ठरली. साधना ताईंना पुढे शिकायची खूप इच्छा होती आणि त्यांनी कॉलेज मध्ये दाखला सुद्धा घेतला परंतु घरच्या जबाबदाऱ्यांमूळे त्यांना पुढील शिक्षण सोडावे लागले. साधना ताईंचा स्वभाव हा शांत सहनशील दयाळू आणि लाजाळू होता. त्या फार कोणाशीच बोलत नसत परंतु जमेल तशी आणि आपल्या मर्यादांमध्ये राहून सगळ्यांना मदत करायची त्यांची सवय होती, स्वभावच होता म्हणा ना.

साधना ताईंच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने बाबा आणि इंदु (साधना ताई) यांची भेट झाली आणि 18 डिसेंबर 1946 साली त्यांचा प्रेमविवाह पार पडला. लग्नानंतर काही महिन्यातच बाबा आणि साधना ताईंची स्वारी निघाली वरोरा येथे. तेव्हा बाबा हरिजन समुदायाचे (भंगी, चांभार, महार, मांग अशा जातीची माणसे) पुढारी होते. बाबांबरोबर साधना ताईंनी सुद्धा हे सगळे आनंदाने आणि प्रेमाने स्वीकारले. त्या वस्तीतील सगळ्या बायकांबरोबर जाऊन बसल्या आणि त्यांच्यातच सामावून जाऊन त्यांनी सगळ्यांना आपलेसे केले.

Life Of Baba Amte And His Legendry Work
Life Of Baba Amte And His Legendry Work

अशीच अजून एक घटना म्हणजे बाबा आणि साधना ताई वरोरा पासून पाच किलोमिटर लांब असणाऱ्या एका खेडेगावात राहत. एक दिवस बैलगाडीतून प्रवास करताना रस्त्यात लागणाऱ्या एका गावातील लोकांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आनंदाने जेवण स्वीकारले. वास्तविक साधना ताईंचे ब्राह्मणाचे, जुन्या रूढी परंपरा यांचा पगडा असलेले घर, हरीजनांमध्ये बसणे तर सोडाच पण त्याना लांबून पाणी दिले तरी घरी येऊन पुन्हा स्नान करावे लागत असे. अशा कडक शिस्तीच्या वातावरणात काही वर्षे सरली असली तरी साधना ताईंचा स्वभाव निर्मळ होता आणि बाबांच्या सहवासात आल्यावर तो आणखीन फुलत गेला. त्यामुळे जातीवाद, असमानता, रूढी हे काहीही न जुमानता त्यांनी बाबांच्या प्रत्येक कार्यात सहकार्य केले. हरीजनांबरोबर राहतात म्हणून त्यांचे माहेर काही काळ तुटले.

सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे कितीतरी काळ बाबा आणि साधना ताईंना वेगळे राहून काढावा लागला पण त्यात सुद्धा त्या पहाडासारख्या बाबांबरोबर उभ्या असायच्या. कधीही तक्रार नसायची आणि चेहऱ्यावर सतत एक स्मित हास्य असायचे. दोन लहान मुले होती, राहायला भक्कम अशी जागा नसतांनासुद्धा सगळे अडथळे पार करत त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. समाजकार्याच्या निमित्ताने घरात सतत माणसांची रेलचेल असायची या सगळ्याचा भार, त्यांचे आदरातिथ्य सगळे खूप कौतुकाने साधना ताईंनी केले.

Sadhana Tai Amte
Sadhana Tai Amte

कुष्ठ रोग्यांचे इलाज आणि देखरेख सुरू झाल्यापासून आनंदवन उभे राहण्यास सुरवात झाली. हा प्रवास सुद्धा सोपा नव्हता. कितीतरी काळ नावाला म्हणता येईल अशा घरांमध्ये राहायला लागले. साधना ताई सोडल्या तर बाकी कोणालाच त्यांचा गोठ्यातील गाई जुमानत नसत. त्यामुळे गाईंचे दूध काढणे, स्वयंपाक करणे, सगळ्या रोग्यांची सेवा करणे या सगळ्या जबाबदाऱ्या साधना ताईंनी चोख पार पाडल्या. जेव्हा कॉलेजेसची उभारणी करण्यात आली तेव्हा त्याचा भार सांभाळण्यातसुद्धा साधना ताईंची खूप मदत झाली. साधना ताईंचे लहान मुलांवर अतिशय प्रेम. लहान मुलांची मालिश करणं, डोक्यातील उवा काढणं, मुलांची देखभाल करणं हे सगळे त्या अगदी नेटाने करायच्या. बाबा आमटे आणि साधना ताई यांनी, मानसकन्या रेणुका आणि बिजली यांचे आपल्या मुलांसारखेच संगोपन केले. त्यांच्यावर साधना ताईंचा खूप जीव होता.

 बाबांच्या आई-वडिलांच्या शेवटच्या काळात सुद्धा साधना ताईंनी त्यांची खूप सेवा केली. साधनाताईंची अनेक रुपे सगळ्यांनी पहिली. साधना ताई पतिव्रता होत्या, अन्नपूर्णा होत्या, वास्तल्याची ओढ असलेल्या साधना ताई कितीतरी मुलांच्या आई झाल्या. निस्वार्थी, आभाळाएवढे मन असलेल्या साधना ताईंना आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम.

शब्दांकन- अमृता आपटे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.