Home » खलनायकी भूमिकांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सदाशिव अमरापूरकरांबद्दल अधिक माहिती 

खलनायकी भूमिकांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सदाशिव अमरापूरकरांबद्दल अधिक माहिती 

by Team Gajawaja
0 comment
Sadashiv Amrapurkar
Share

मनोरंजनविश्वात प्रत्येक व्यक्ती ही काम मिळवण्यासाठी झटत असते. काम मिळवण्यामागे पैसा कमावणे हा मुख्य उद्देश असला तरी यामागे एक गुप्त आणि मोठा हेतू म्हणजे नाव कमावणे आणि प्रसिद्धी मिळवणे. प्रत्येक व्यक्ती या क्षेत्रात येताना आपल्याला आपल्या कामातून मोठी ओळख मिळावी ही सुप्त इच्छा बाळगून असते. सगळ्यांनाच मुख्य आणि सकारात्मक भूमिका साकारून ओळख कमवायची असते. मात्र या क्षेत्रात असे देखील काही कलाकार आहे. ज्यांनी मुख्य भूमिका न साकारता, नकारात्मक भूमिका साकारून मोठमोठ्या कलाकारांपेक्षा जास्त ओळख मिळवली. खलनायक साकारून ओळख मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये एक नाव प्रकर्षाने घेतले जाते ते म्हणजे अभिनेते सदाशिव अमरापुरकर. सदाशिव अमरापूरकर नाव उच्चारले की, डोळ्यासमोर चित्रपटांमधील क्रूर असा सामर्थ्यवान खलनायक उभा राहतो. मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीवर सदाशिव अमरापुरकर यांनी स्वतःच्या नावाचे एक गारुड निर्माण केले. ८०/९० च्या दशकात जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये अमरापुरकर यांनी खलनायक रंगवला. प्रत्येक सिनेमात जरी त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी त्या भूमिका पाहताना कधीच सारख्या वाटल्या नाही. हीच त्यांच्या अभिनयाची खास बाजू होती. हिरोमध्ये असणाऱ्या विशेष बाबी त्यांच्यामध्ये नसल्या तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. आज आपण सदाशिव अमरापुरकर यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Sadashiv Amrapurkar)

सदाशिव अमरापूरकर यांनी मराठी, हिंदी, बंगाली, ओरिया आणि हरयाणवी या चित्रपटसृष्टींमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम करत लोकांचे मनोरंजन केले. सदाशिव अमरापूरकर यांचा ११ मे १९५० रोजी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय अमरापुरकर हे अहमदनगमधील सन्मानित व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. सदाशिव अमरापूरकर यांना त्यांचे कुटुंबिय, मित्रमंडळी ‘तात्या’ या नावाने हाक मारायचे. सदाशिव अमरापूरकर यांना त्यांच्या शालेय जीवनापासूनच मोठा मित्रपरिवार लाभला. त्यांचे  शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर मधेच झाले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून इतिहास या विषयात एमए पूर्ण केले आणि ते रंगभूमीकडे वळले. १९७३ मध्ये त्यांनी त्यांची शाळेय मैत्रिण असणाऱ्या सुनंदा करमकर यांच्याशी विवाह केला.(Sadashiv Amrapurkar)

सदाशिव अमरापूरकर यांच्या आयुष्यात १९८० आणि ९० चे दशक हे खूप महत्वाचे आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. १९८१ मध्ये अमरापूरकर यांनी ‘हॅन्ड्स अप!’ हे मराठी नाटक केले. अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे-इनामदार यांच्यासोबत काम करणाऱ्या सदाशिव अमरापूर यांनी या नाटकातून प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आले. हे नाटक अमाप गाजले आणि लोकप्रिय झाले. त्या दशकातील मोठे आणि नावाजलेले दिग्दर्शक असलेल्या गोविंद निहलानी यांनी अमरापूरकर यांचे ‘हॅन्ड्स अप’ नाटक पाहिले आणि ते त्यांच्या अभिनयाने प्रभावित झाले. लगेच निहलानी यांनी सदाशिव अमरापुरकर यांना ‘अर्ध सत्य’ या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका ऑफर केली आणि त्यांना हिंदीमध्ये पहिला ब्रेक दिला. हा चित्रपट तुफान गाजला आणि पहिल्याच सिनेमातून सदाशिव अमरापूरकर यांनी त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनावर छाप पाडली. शिवाय त्यांनी समीक्षकांना देखील मोहित केले. या सिनेमातील भूमिकेसाठी अमरापूरकर यांना फिल्मफेअर पुरस्कारही देखील प्रदान करण्यात आला.  त्यानंतर सदाशिव अमरापूरकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अमरिश पुरी, प्रेम चोप्रा आदी त्या काळातील आघाडीच्या खलनायकांना जोरदार टक्कर देत आपल्या भूमिकेने स्वतःची एक वेगळी आणि मोठी ओळख निर्माण केली. (Sadashiv Amrapurkar)

=====

हे देखील वाचा – पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक यांचा बोलबाला

=====

१९९१ मध्ये सडक या चित्रपटात अमरापूरकर यांनी साकारलेली ‘महाराणी’ची भूमिका तुफान गाजली. या भूमिकेने त्यांनी अतिशय ताकदीचा खलनायक म्हणून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. या भूमिकेसाठी सदाशिव अमरापूरकर यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘अर्ध सत्य’नंतर पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी आणि फरिश्ते या चित्रपटांमध्ये अमरापूरकर यांनी भूमिका साकारल्या. १९८७ मध्ये धर्मेंद्रच्या ‘हुकूमत’मध्ये खलनायकाची मुख्य भूमिका अमरापूरकर यांनी साकारली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला एवढेच नाही तर त्यावर्षी आलेल्या मिस्टर इंडिया सिनेमाला देखील हुकूमतने मागे टाकले. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, गोविंदा, आमीर खानपर्यंत सगळ्याच आघाडीच्या कलाकारांसोबत सदाशिव अमरापुरकर यांनी काम केले. मधल्या काही काळात त्यांनी आँखे, इश्क, कुली नं. १, गुप्त, आँटी नं. १, जय हिंद आदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका देखील उत्तम पद्धतीने निभावल्या. पुढे २००० नंतर अमरापूरकर हे हिंदी चित्रपटांमध्ये फारसे दिसले नाहीत. सदाशिव अमरापुरकर यांनी काही मराठी मालिकांमध्ये देखील काम केले.(Sadashiv Amrapurkar)

सदाशिव अमरापूरकर यांनी अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनावेळी विविध वाहिन्यांवर अण्णांची बाजू ठामपणे मांडली. अभिनेत्यासोबतच सदाशिव अमरापुरकर एक सुजाण नागरिक म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमरापूरकर यांची ओळख होती. सामाजिक कृतज्ञता निधीतला त्यांचा सक्रिय सहभाग किंवा नगरच्या वस्तूसंग्रहालयासाठी काही लाख रुपयांचा निधी उभा करून देण्याचे काम अमरापूरकर यांनी उत्तम पद्धतीने केले. अतिशय यशस्वी अभिनेते म्हणून ओळख निर्माण केल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्यातून त्यांची विशेष ओळख जपली. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मार्च २०१४ मध्ये होळीच्या उत्सवात पाण्याची नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती.(Sadashiv Amrapurkar)

असे हरहुन्नरी अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सदाशिव अमरापूरकरांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.