Home » आता नील मोहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील

आता नील मोहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील

by Team Gajawaja
0 comment
CEO
Share

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबच्या सीईओ (CEO) पदी भारतीय वंशाचे नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नील मोहन हे सुसान वोजिकी यांची जागा घेणार आहेत. सुसान या गेली नऊ वर्ष यूट्यूबच्या सीईओपदी होत्या. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर या जागी त्यांच्या सोबत काम करणारे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे. नील मोहन सध्या यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून कार्यरत होते. मध्यंतरी त्यांनी यूट्यूबच्या नफ्यात वाढ करुन देण्यासाठी काही योजना कार्यान्वित केल्या,  तेव्हापासूनच नील लवकरच यूट्यूबच्या सीईओपदी विराजमान होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.  

यूएसस्थित भारतीय वंशाचे नील मोहन हे 2008 पासून गुगल आणि 2015 पासून यूट्यूब मध्ये काम करत आहेत. आता यूट्यूबच्या सीईओ (CEO) पदी विराजमान झाल्यावर नील मोहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत, जे जगातील आघाडीच्या कंपन्या हाताळत आहेत.  सध्या नील मोहन हे त्यांची पत्नी हेमा सरीमसोबत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात. त्यांनी ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वार्षिक उत्पन्न $60,000 होते. नील मोहन यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, यूएसए मधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.  तसेच 2005 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केले आहे. त्यांची 2015 मध्ये यूट्यूबच्या मुख्य उत्पादन अधिकारीपदी नियुक्ती झाली. यूट्यूब वर मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून त्यांनी शॉर्ट्स, संगीत आणि सदस्यतांवर लक्ष केंद्रित केले.  नील मोहन यांना ट्विटरवरून नोकरीची ऑफर देखील आली होती. तेव्हा ते गुगलमध्ये होते, आणि गुगलला याची माहिती मिळताच गुगलने त्यांना रोखण्यासाठी मोठ्या रकमेचा बोनस जाहीर केला होता.  

आता हेच नील मोहन यांच्याकडे यूट्यूबचे सीईओ (CEO) पद आले आहेत. सीईओ झाल्यावर त्यांनी प्रथम माजी सीईओ (CEO) सुसान वोजिकी यांचे धन्यवाद मानले आहेत. गेली अनेक वर्षे तुमच्यासोबत काम करणे हा खूप मोलाचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यूट्यूबला फायदेशीर बनवणे हे नीलचे पहिले लक्ष्य आहे. टीकटॉक आणि फेसबुकच्या रिल्स आणि शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ सेवा, नेटफ्लिक्स सारख्या स्ट्रीमिंग सेवांमधून होणाऱ्या स्पर्धेमुळे यूट्यूबच्या जाहिरात महसूलात सलग दुसऱ्या तिमाहीत घट झाली आहे. त्यामुळेच सुसान यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. मात्र सुसान व्होजिकी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अल्फाबेट इंकच्या शेअर्स 1 टक्क्यांनी पडले.

यूट्यूबचे नवीन सीईओ (CEO) झाल्यावर नील  मोहन यांच्यासोबत आता अन्य भारतीयांच्या नावाचीही पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.  गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या 15 बड्य कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे सीईओ आहेत. यामध्ये प्रुमख चर्चा होते ती सुंदर पिचाई यांची. गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांचा जन्म 1972 मध्ये भारताच्या तामिळनाडू राज्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडगपूरमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस केले. त्यांनी व्हार्टन विद्यापीठातून एमबीएची पदवीही घेतली. सुंदर पिचाई 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. आता ते गुगलचे सीईओ आहेत.   

जगातील प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ भारतीय वंशाचे सत्या नडेला आहेत. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1967 रोजी आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादमधील अनंतपूर जिल्ह्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला.  नाडेला 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाले. 4 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांची मायक्रोसॉफ्टच्या सीईओ (CEO) पदी निवड झाली. कॉफी चेन स्टारबक्सने भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा केली आहे. लक्ष्मण 1 एप्रिलपासून कंपनीची सूत्रे पूर्णपणे हाती घेतील. ते सध्या हंगामी सीईओच्या हाताखाली काम करत आहेत.  लक्ष्मण नरसिम्हन यांनी यापूर्वी इंफामिल बेबी, यूके आणि रेकिट बेंकिसर ग्रुप पीएलसीमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे.  लक्ष्मण नरसिंहन यांचा जन्म 15 एप्रिल 1967 रोजी पुण्यात झाला. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले आहे.  पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून त्यांनी व्यवसायात एमबीए केले आहे.  यानंतर नाव येते ते शंतनू नारायण यांचे.  जगातील प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी Adobe  चे ते सीईओ आहेत.  शंतनू नारायण यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. शंतनू यांनी उस्मानिया विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए आणि बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले आहे. 

=======

हे देखील वाचा : आपला कोहिनूर आणि ब्रिटनची राणी….

=======

2007 मध्ये ते Adobe चे सीईओ झाले. याशिवाय 2011 मध्ये शंतनू यांना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यवस्थापन सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणूनही नियुक्त केले होते. अरविंद कृष्णा हे नाव सुद्धा भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.  IBM  या आघाडीच्या कंपनीने अरविंद कृष्णा यांची सीईओ (CEO) पदावर नियुक्ती केली आहे. हैदराबादमध्ये जन्मलेले अरविंद कृष्णा हे सीईओ (CEO) पदी निवड होण्यापूर्वी आयबीएममध्ये क्लाउड आणि कॉग्निटिव्ह सॉफ्टवेअरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.  आयआयटी कानपूरचे ते विद्यार्थी आहेत.  त्यांनी इलिनॉय विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी केली आहे.  

याशिवाय Google क्लाउडचे सीईओ (CEO) थॉमस कुरियन,  पादत्राणे उत्पादक कंपनी बाटा चे सीईओ संदीप कटारिया, फ्रान्सच्या मोठ्या फॅशन हाऊस चॅनेलची पहिल्या महिला सीईओ लीना नायर,  अमेरिकेतील दिग्गज कुरिअर सेवा कंपनी FedEx चे सीईओ राज सुब्रमण्यम, संगणक नेटवर्किंग कंपनी अरिस्ता नेटवर्क्सच्या सीईओ जयश्री उल्लाल आदी भारतीयांची नावेही कायम प्रकाशझोतात असतात. आता या नावांमध्ये नील मोहन यांच्या नावाची भर पडली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.