चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या नवरात्रौत्सवात देवींच्या शक्तीपीठांना भेट देण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या उज्जैनमधील हरसिद्धी मातेच्या मंदिरातही भाविकांनी गर्दी केली आहे. मातेच्या या उत्सवाला देवीच्या भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे. 51 शक्तीपीठांपैकी एक असलेले हरसिद्धी माता मंदिर नवरात्रौत्सवानिमित्त सजवण्यात आले आहे. मातेची पूजा करण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उज्जैनला येत आहेत. राजा विक्रमादित्याची कुलदेवता असलेल्या या देवीचे भक्त देशातच नाही तर परदेशातही आहेत, हे भक्त देवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या हरसिद्धी माता मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होत आहे. नवरात्रीपासून रोज सकाळी होत असलेल्या आरतीसाठी भाविकांची गर्दी होत आहे. आरतीनंतर मातेच्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगा लावत आहेत. माता हरसिद्धी, राजा विक्रमादित्याची कुलदेवता आणि आराध्य देवी असल्याने, भक्तांसाठी हे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या मंदिराची पौराणिक कथा आहे. धर्मग्रंथातील प्रचलित दंतकथेनुसार, माता सतीचे वडील राजा दक्ष यांनी एक यज्ञ आयोजित केला होता. या यज्ञामध्ये सर्व देवी-देवतांना आमंत्रित केले होते. परंतु माता सतीला आमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र माता सती या यज्ञाच्या स्थळी गेल्यावर राजा दक्षाने भगवान शंकराचा अपमान केला. हा अपमान सहन न झाल्यानं माता सतीने स्वत: ला अग्नीच्या स्वाधीन केले. हे समजल्यावर माता सतीच्या विरहानं संतप्त झालेल्या भगवान शंकरानं सतीचे मृत शरीर उचलले आणि पृथ्वीभोवती फिरू लागले. शिवाला थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवून माता सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले आणि माता सतीच्या शरीराचे अवयव जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठे बांधली गेली. उज्जैन येथील या ठिकाणी सती मातेची कोपर पडल्याने या मंदिराचे नाव हरसिद्धी ठेवण्यात आले. अत्यंत जागरुक असलेल्या या शक्तीपीठाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होते. चैत्र नवरात्रीचे खूप महत्त्व आहे. हरसिद्धी मंदिरात यावेळी देवीच्या अनेक रुपात पुजा केली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवीला दूध, मावा, दही यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नऊ दिवस उपासना करणाऱ्या भक्ताला वर्षभराचे फळ मिळते, अशी भक्तांमध्ये धारणा आहे. मंदिरात दोन दीपस्तंभ आहेत जे राजा विक्रमादित्यच्या काळातील आहेत. नवरात्रौत्सवात होणा-या मातेच्या सोळाशृंगाराला विशेष महत्त्व आहे. मंदिरात घटस्थापनासोबतच नऊ दिवस चंडीपाठ हवन यज्ञाची पूजा केली जाते. या हवन यज्ञात भक्तांच्या सर्व संकटाचे हवन होते असे मानण्यात येते. हरसिद्धी माता मंदिराच्या आवारात बसवलेले दोन दीपस्तंभ हे मंदिरातील आकर्षणाचे केंद्र आहे. हे दीपस्तंभ सुमारे 51 फूट उंच आहेत. दोन्ही दीपस्तंभांमध्ये सुमारे 1 हजार 11 दिवे आहेत. हे दीपस्तंभ उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य यांनी स्थापित केल्याचे सांगण्यात येते. सम्राट विक्रमादित्यचा इतिहास सुमारे 2000 वर्षांचा आहे. या दृष्टिकोनातून हे दीपस्तंभ 2 हजार वर्षांहून अधिक जुने आहेत. या दोन्ही दीपस्तंभावंवर दिवा लावण्याचा खर्च सुमारे 15000 येतो. यासाठी अगोदर बुकिंग करावे लागते. दीपस्तंभांवर चढून हजारो दिवे लावण्याचे काम उज्जैनचे जोशी कुटुंब जवळपास 100 वर्षांपासून करीत आहे. दोन्ही दिव्याचे खांब एकदाच पेटवण्यासाठी सुमारे 4 किलो कापसाची वात आणि 60 लिटर सिंदूर तेल, इंधन लागते. या दिव्यांच्या खांबांची वेळोवेळी स्वच्छताही केली जाते. गेल्या काही वर्षांपासून हे दीपस्तंभ भाविकांच्या मदतीने दररोज प्रज्वलित केले जातात. उज्जैन हे स्थान सम्राट विक्रमादित्य यांची तपोभूमी होती आणि सम्राट विक्रमादित्य यांची हरसिद्धी मातेवर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे राजा विक्रमादित्य यांना वंदन करुन अनेक भाविक देवी हरसिद्धीच्या चरणी लीन होतात. या मंदिराची रचनाही वैशिष्टयपूर्ण आहे.
======
हे देखील वाचा : राजा विक्रमादित्य यांचा हिंदू नववर्षांशी काय असेल संबंध?
======
हरसिद्धी मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्वेला आहे. आग्नेय कोपऱ्यात एक पायरीची विहीर बांधलेली आहे. या विहिरीत एक खांब आहे. येथे श्रीयंत्र बनवण्याची जागा आहे. या जागेच्या मागे भगवती अन्नपूर्णेची सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाला लागूनच सप्तसागर तलाव आहे. या तलावाला रुद्रसागर तलावही म्हणतात. देवीच्या संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगडी आहे. मंदिराच्या पाठीमागे महाकालेश्वराचे भक्त असलेल्या अगस्तेश्वराचे पुरातन सिद्ध स्थान आहे. आता नवरात्रौत्सवानिमित्त येथे आलेल्या भाविकांसाठी क्षिप्रानदीकाठावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात नौकाविहार आणि सायंकाळी होणारी क्षिप्राआरती आणि रोषणाई हा उपक्रमही आहे.
सई बने