Home » सुषमा स्वराज: वाजपेयी काळात घेतला होता महत्त्वाचा निर्णय ज्यामुळे बहरली चित्रपटसृष्टी

सुषमा स्वराज: वाजपेयी काळात घेतला होता महत्त्वाचा निर्णय ज्यामुळे बहरली चित्रपटसृष्टी

by Team Gajawaja
0 comment
Sushma Swaraj
Share

काही व्यक्तींची प्रतिमाच अशी असते की, त्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी मनात प्रचंड आदर दाटून येतो. यामधलंच एक नाव म्हणजे सुषमा स्वराज. सुषमा स्वराज यांच्या नावामागे कैलासवासी हा शब्द लिहायला मन धजावत नाही कारण त्यांचं जाणं अजूनही मनापासून स्वीकारता आलं नाहीये. कलम ३७७ हटलवल्यावर त्यांनी केलेलं ट्विट शेवटचं ठरेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.(Sushma Swaraj)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वांचं पालन करणाऱ्या कुटुंबात १४ फेब्रुवारी १९५२ रोजी जन्मलेल्या सुषमा स्वराज यांनी पॉलिटिकल सायन्स आणि संस्कृत विषयांत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कॉलेजला असतानाच वयाच्या १७ व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्या सामील झाल्या. संघ संस्कार घरात होतेच आता ‘अभाविप’च्या माध्यमातून त्यांनी त्यावर अमंल करायलाही सुरवात केली. इथे त्यांच्या नेतृत्वगुणाला वाव मिळाला. एन सी सी मध्येही त्या सक्रिय होत्या. सलग ३ वर्ष त्यांना एन.सी.सी. च्या ‘बेस्ट कॅडेट’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं, तसंच त्यांचं वक्तृत्वही उत्तम होतं.

पदवी घेतल्यावर पुढे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि वकिल म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. आणिबाणीच्या काळात सुप्रीम कोर्टात कित्येक केसेस त्यांनी लढवल्या. याच दरम्यान त्यांची आणि स्वराज कौशल यांची ओळख झाली. ‘अपोझिट अटरॅक्टस्’ म्हणतात तसंच घडलं. संघाच्या विचारसरणीच्या पुरस्कर्त्या सुषमा स्वराज आणि सोशल बिलीफ विचारसरणीचे स्वराज कौशल मनाने एकमेकांच्या जवळ आले. कुटुंबीयांचा विरोध पत्करून त्यांनी विवाह केला आणि तो यशस्वीही ठरला. त्यांना बांसुरी कौशल नावाची मुलगी असून ती देखील वकील आहे. (Memories of Sushma Swaraj)

सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय आणि किती लिहिणार? वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी हरियाणाच्या जनता पार्टीचे अध्यक्षपद, भारतामधील प्रमुख राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या आणि सन २००९ ते २०१४ या काळात पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या. १९९८ साली त्या दिल्लीच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण दुर्दैवाने दिल्लीचं मुख्यमंत्रीपद अवघ्या दोन महिन्यांतच त्यांना सोडावं लागलं.

सुषमा स्वराज यांच्या कारकिर्दीमधला अजून एक दुर्दैवी क्षण म्हणजे १९९९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बेल्लारी मतदारसंघात सोनिया गांधीकडून झालेला पराभव.. या मतदारसंघासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. इतकंच काय तर, लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी कानडी भाषाही शिकली होती. असो. वाजपेयी सरकारच्या काळात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यावेळी चित्रपट क्षेत्राचा विकास आणि उलाढाल पाहून त्यांनी या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला. यामुळे या क्षेत्रासाठी बँकेकडून कर्जसुविधा उपलब्ध झाली.

सुषमा स्वराज यांच्या हुशारीला खरा न्याय मिळाला तो २०१४ नंतर मोदी सरकारच्या काळात. या काळात त्यांनी परराष्ट्र खातेही सांभाळले. या दरम्यान त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या, पण आपली वेशभूषा मात्र बदलली नाही. त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल प्रचंड आदर होता. (Memories of Sushma Swaraj)

२०१८ साली चीन दौऱ्यावर असताना त्यांचा एक फोटो प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये सर्व पुरुषांसोबत ताठ मानेने उभी असणारी एकमेव स्त्री म्हणजे सुषमा स्वराज. पारंपरिक भारतीय वेषभूषेमधील त्यांची छबी पाहून अख्ख्या जगाने भारताचं कौतुक केलं. त्यावेळी “Saree and Sindoor: How Sushma Swaraj made the world notice the Indian woman” अशा शब्दांत अनेक वृत्तपत्रांनी त्यांचं कौतुक केलं.

सुषमा स्वराज यांच्यावर विरोधी पक्षाकडून काही प्रसंगांत चिखलफेकही करण्यात आली होती. अगदी अलीकडचाच एक प्रसंग अनेकांना आठवत असेल. हा प्रसंग ललित मोंदींना पत्नीला भेटण्यासंदर्भात होता. ललित मोदींच्या कारनाम्यांमुळे त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. त्यांची पत्नी कॅन्सरने आजारी होती आणि पोर्तुगालमध्ये तिच्यावर उपचार चालू होते. त्यावेळी ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्यात आलेला असूनही ‘कीथ वाझ’ नावाच्या ब्रिटीश राजकारणी स्त्रीने ललित मोदी यांना त्यांच्या कॅन्सरने आजारी असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी लंडन वरून पोर्तुगालला पाठवायची व्यवस्था केली. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी ‘कीथ वाझ’ यांना लिहिलेल्या पत्रात “जर नियमात बसत असेल, तर तुम्ही त्याला मदत करू शकता” असा उल्लेख केला होता. (Memories of Sushma Swaraj)

या घटनेचे पडसाद संसदेत उमटले आणि सुषमाजींवर विरोधी पक्षाकडून वेगवेगळे आरोप करण्यात आले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सुषमा स्वराज यांची मुलगी ज्या वकिलांच्या ऑफिसमध्ये ज्युनिअरशिप करत होती त्यांच्याकडे ललित मोदींची पासपोर्टची केस होती. या केसच्या सुनावणीसाठी ती आपल्या सिनिअर वकिलांसोबत कोर्टात गेली होती. त्यामुळे मुलीच्या केससाठी सुषमा स्वराज ललित मोदींना झुकतं माप देत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

====

हे देखील वाचा – एका यशस्वी राजकारण्याची कर्तृत्ववान सावली – शोभाकाकी बाबर

====

या आरोपांना खोडून काढलं ते अरुण जेटली यांनी. त्यांनी या संपूर्ण केसची माहिती संसदेत दिली आणि विचारलं, “सुषमाजींची मुलगी स्वत:च्या सिनियरसह कोर्टात गेली होती. बरं ती एकटीच नव्हती तर तिच्यासह अजून ९ ज्युनिअर्सही होते. यामध्ये तिची भूमिका इतर कुठल्याही ज्युनियर प्रमाणेच होती. जर पैसे घेतलेच असतील, तर ते तिच्या सिनिअर वकिलांनी घेतले आहेत, ते देखील केसचे पैसे. यात तिचं काय चुकलं? ती फक्त आपलं काम करत होती.

पुढे अरुण जेटली म्हणाले, “या देशात अजूनही असे प्रामाणिक लोक आहेत ज्यांच्या मुलांना उदरनिर्वाहासाठी काम करावं लागतं. या देशाच्या राजकारणावर ज्या घराण्याने पिढ्यानपिढ्या सत्ता गाजवली, त्या घराण्याच्या कुठल्याही पिढीने कधी जगण्यासाठी कुठलंही काम केलं नाही. हे काम केल्याशिवाय आरामात जगण्याची कला या घराण्यातल्या लोकांनी अवगत आहे, आम्हाला नाही.”

सुषमा स्वराज उच्चशिक्षत तर होत्याच पण त्यांच्या विचारांमध्ये कमालीची प्रगल्भता आणि स्पष्टता होती. परराष्ट्र मंत्री असताना कोणत्याही देशाचे नाव न घेता एक दोन नाही तर, तब्बल ५७ इस्लामिक देशांच्या प्रतिनिधींसमोर पाकिस्तानच्या वृत्तीची त्यांनी निंदा केली होती. त्यांच्या मुद्देसूद, परखड आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे पाकिस्तानला चांगलीच शाब्दिक चपराक बसली होती. पण याच पदावर असताना त्यांनी शिरीन शिरज या पाकिस्तानी स्त्रीला वैद्यकीय उपचारासाठी १ वर्षाचा व्हिसा मंजूर केला. केवढा हा निःपक्षपाती स्वभाव! (Memories of Sushma Swaraj)

राजकारणात येण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक भारतीय तरुणीने, मग ती कोणत्याही पक्षाची असो; सुषमाजींचा आदर्श आवर्जून डोळ्यासमोर ठेवायला हवा. राजकारण हा महिलांचा पंथ नाही, संघात महिलांची प्रगती होत नाही अशी टीका करणाऱ्यांना सुषमाजींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आभाळाएवढं कर्तृत्व असणाऱ्या सुषमाजींचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने या महान व्यक्तिमत्वाचं आयुष्य एका लेखात बसवायचा केलेला एक छोटासा प्रयत्न. सुषमा स्वराज याना विनम्र अभिवादन!

  • मानसी जोशी

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.