Home » माना (Mana village) – पांडवांनी जिथून स्वर्गात प्रवास केला ते गाव

माना (Mana village) – पांडवांनी जिथून स्वर्गात प्रवास केला ते गाव

by Team Gajawaja
0 comment
माना Mana village
Share

शांतता, आत्मिक समाधान, नितळ निसर्ग सहवास या सर्वांसोबत ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा असेल, तर देशाच्या शेवटच्या गावाला नक्कीच भेट द्यायला हवी. आपल्या देशाला निसर्गानं उदारहस्ते वरदान दिलं आहे. त्यातही उत्तराखंड राज्य म्हणजे निसर्गाचा पूरेपूर वरदहस्त लाभलेलं राज्य आहे. या राज्याचं आणि आपल्या देशाचंही शेवटचं गाव म्हणजे माना (Mana village).  

अलकंनंदा आणि सरस्वती नदीच्या संगमावर असलेल्या या गावाला पौराणिक वारसा लाभला आहे. आपला हा वारसा बघण्यासाठी आणि माना गावाच्या सहवासात स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. सध्या कोरोना काळातही सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पाळत माना गावात पर्यटक येत आहेत. सन २०१९ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वोत्तम स्वच्छ, प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून माना गावाचा गौरव करण्यात आला आहे.  

उत्तराखंड राज्याच्या ‘चमोली’ जिल्ह्यातील माना गावचा इतिहास खूप जुना, अगदी महाभारतापासूनचा! भारतीय संस्कृतीबरोबर नाळ जोडणारा! महर्षी वेद व्यास यांची गुहा इथे आहे. याच गुहेजवळ ‘गणेश गुफा’ म्हणून स्थान आहे. याच ठिकाणी ‘महर्षी व्यास’ यांनी चार वेदांचे संकलन केले आणि श्रीगणेशानं ते लिखीत स्वरुपात उतरवले, अशी मान्यता आहे. या दोन्हीही स्थानांना भेटी देण्यासाठी हजारो भाविक येतात.  

Do you know Mana village?, Uttarakhand

यासोबत पांडव आणि उत्तराखंडाचे एक नाते आहे. महाराज पडूं यांनी आपल्या राज्याचा त्याग केल्यावर ते आपल्या दोन राण्या, कुंती आणि माद्रीसह याच पर्वतशिखरांवर वास्तव्य करुन होते. येथेच पाच पांडवांचा जन्म झाला. येथूनच पांडवांचा अंतिम प्रवासही झाला.  

पौराणिक कथांच्या अनेक खूणा ‘माना (Mana village)’ गावाच्या प्रत्येक भागात बघायला मिळतात. स्वर्गात जाण्यासाठी पांडवांना हेच गाव पार करावं लागलं.  मात्र त्यासाठी नदीचा मोठा अडसर होता. तेव्हा भीमाने दोन दगडांना ओढून दगडाचा पूल तयार केला. या पूलावरुन पांडव स्वर्गाच्या दिशेने गेले. हा भीमानं केलेला पूल अद्यापही नदीवर असून तो ‘भीम पूल’ म्हणून ओळखला जातो. या पूलावर २० फूट उंच पायाच्या आकाराची खूणही आहे. त्याला भीमाची ‘पाऊलखूण’ म्हणतात.   

समुद्रसपाटीपासून ६५९७ फूट उंचीवर असलेले ‘नीलकंठ’ शिखर हे ट्रेकिंगसाठीचे मुख्य आकर्षण आहे. ट्रेकींगचे चाहते निलकंठ शिखर सर करण्यासाठी गर्दी करतात. वसुंधरा धबधबा आणि गरम पाण्याचे कुंडही भाविकांना आकर्षित करतात. या धबधब्याच्या परिसरात पांडवांचे काही काळ वास्तव्य होते, अशी आख्यायिका आहे. याशिवाय माता मंदिरात ऑगस्ट महिन्यात होणारा उत्सवही खूप लोकप्रिय आहे. 

File:The Last Indian Village.jpg - Wikimedia Commons

पाच हजार वर्षांहूनही जुनी मंदिरं आणि गुहा बघणे, हाच एक ट्रेक ठरतो. पर्यटकांना आवडतील अशा सर्व वस्तू माना गावाच्या बाजारपेठेत उपलब्ध असतात. अगदी या भागातील अस्सल खाद्यपदार्थ ते हस्तकलेच्या वस्तूंची स्थानिक बाजारात रेलचेल असते. यामध्ये मेंढींच्या लोकरीपासून केलेले स्वेटर, टोप्या, शाल, मफलर, हातांनी विणलेले गालिचे यांना विशेष मागणी असते.  

पौराणिक वारसा, तिथली जीवनशैली बघण्याची उत्सुकता, खुणावणारा निसर्ग यामुळे माना गाव पर्यटकांसाठी स्वर्ग समजले जाते. ट्रेकींगचे आव्हान सांभाळत, धबधबे, लुप्त होणारी सरस्वती नदी, अत्यंत प्राचीन मंदिरं हे सर्व बघण्यासाठी येथे गर्दी होते.  

अनेक वृद्ध मंडळी बाजारपेढेच्या गल्ल्यांमध्ये या सर्व कलांमध्ये व्यग्र असलेली दिसतात, तर इथले तरुण वाटाडे म्हणून काम करतात. बहुतांश स्त्रीया पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात. विशेष म्हणजे या भागातील लहान मुलंही पर्यटकांना महाभारताचे दाखले देत आपल्या गावाचा पौराणिक वारसा मोठ्या अभिमानाने सांगतात.    

हरिद्वार, डेहराडून येथून माना गावात जाण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. आता पर्यटकांचा वाढता ओघ बघून वाहतुकीच्या साधनातही वाढ झाली आहे. तसेच, वस्तीसाठी अनेक चांगली, किफायतशीर हॉटेल्सही या भागात आहेत.  

हे ही वाचा: विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे गुन्हेगार आर्थिक गुन्हे करून लंडनलाच का पळून जातात?

कोरोना महामारीचा भयानक परिणाम! भारताच्या शेजारचा ‘हा’ देश झाला आहे कर्जबाजारी!

पर्यटकांसाठी स्वर्गीय स्थान म्हणून माना गावाचा उल्लेख होतो. या गावात गेल्यावर त्याचा प्रत्ययही येतो. जेवढे भाविक येथे येतात, तेवढेच तरुण पर्यटक ट्रेकींगसाठी येतात. आपल्या प्रत्येकाच्या ट्रॅव्हल डायरीमध्ये माना गावाचा समावेश असलाच पाहिजे. तिथल्या निसर्गाचे वर्णन वाचण्यापेक्षा तिथे प्रत्यक्ष जाणे, हा एक नितांतसुंदर अनुभव आहे. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.