Home » सावधान! तब्बल 72 वर्षांनी तो येतोय….

सावधान! तब्बल 72 वर्षांनी तो येतोय….

by Team Gajawaja
0 comment
Share

पिवळ्या, सोनेरी रंगावर काळे ठिपके, सडसडीत बांधा, भेदक नजर आणि कमालीची चपळता आणि तेवढाच रुबाब! विजेपेक्षाही त्याचा वेग अधिक, एकदा का त्याची नजर सावजावर पडली की, कितीही लांबचा टप्पा असो, त्याचा वेग आणि त्याची झेप यापुढे त्या सावजाचे काहाही चालत नाही. हे सर्व वर्णन आहे, चित्त्याबाबत! भारतातून जवळपास 72 वर्षापूर्वी गायब झालेला चित्ता आता पुन्हा परत येतोय. तोही नमेबियामधून.

भारतात 1951 मध्ये आंध्रप्रदेशमधील जंगलात चित्ता दिसला होता. त्यानंतर मात्र चित्ते लुप्त झाले. भारतातील चित्ते हे शिकारीमुळे लुप्त झाल्याचे सांगण्यात येते. महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतातील शेवटच्या तीन चित्यांची हत्या केली होती, असे सांगितले जाते. 1951 नंतर हा चपळ आणि देखणा प्राणी फक्त टिव्हीवर बघायला मिळाला होता. आता भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे पुन्हा चित्ता भारतात येतोय. 

भारतात चित्ते आणण्याबाबत गेले काही वर्ष प्रयत्न चालू आहेत. आता एवढ्या वर्षांनंतर या प्रयत्नांना यश आले आहे. नमेबियामधून आठ चित्ते (पाच मादी आणि तीन नर) भारतात पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये साम्यंजस्य करार झाला आहे. या चित्त्यांच्या स्वागतासाठी मध्यप्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) खास व्यवस्था करण्यात येत आहे. 

17 सप्टेंबर रोजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होत आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या चित्त्यांना भारतात आणण्यात येणार आहे. त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते या चित्त्यांना ‘कुनो’ नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) सोडण्यात येणार आहे.  भारत सरकार आणि नमेबियासोबत झालेल्या करारानुसार 17 सप्टेंबर रोजी आठ चित्त्यांची एक टीम भारतीय भूमीवर उतरणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादवही या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित रहाणणार आहेत.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशात येणारे हे खास पाहुणे 16 सप्टेंबर रोजी नमेबियामधून विशेष मालवाहू विमानाने भारतात येण्यासाठी निघणार आहेत. यासाठी खास विमान नमेबियाच्या राजधानीमध्ये दाखल झाले आहे. या विमानाचा पुढचा भाग चित्त्यांप्रमाणे रंगवण्यात आला आहे. यावरुनच या शाही पाहुण्यांचे किती शाही थाटात स्वागत होणार आहे, याची झलक मिळतेय. 17 सप्टेंबर रोजी हे विमान ग्वाल्हेरला पोहोचेल. त्याच दिवशी या चित्त्यांना घेऊन लष्कराचे हेलिकॉप्टरमधून मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park)  दाखल होईल. त्यासाठी कुनो येथे खास हेलिपॅड तयार करण्यात आला आहे.  

भारताच्या इतिहासात हा दिवस महत्त्वाचा मानला जाईल. अवघ्या आशिया खंडात फक्त इराणमध्ये चित्ते अस्तित्वात आहेत. त्यानंतर भारतात त्यांचे वास्तव्य रहाणार आहे. या खास पाहुण्यांच्या स्वागतासाठी भारत सरकार आणि मध्यप्रदेश सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत आहेत. 

नमेबियाच्या रुईबर्ग वाईल्डलाईफ पार्कमध्ये आता या चित्यांना ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यात येत आहे.  या चित्त्यांना एक वर्षापूर्वी जंगलातून पकडून या वाईल्डलाईफ पार्कमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यात आली. रुईबर्ग वाईल्डलाईफ पार्कमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. 

या चित्त्यांना घेऊन भारतीय विमान नमेबियाची राजधानी विंडहॉक येथून विमान उडेल. तिथून हे विमान ग्वाल्हेरमध्ये लॅंड होईल. ग्वाल्हेरमध्ये लष्कराच्या विशेष हॅलिकॉप्टरमधून हे पाहुणे कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येतील. 

हा सर्व प्रवास 12 ते 13 तासांचा असणार आहे. या विमानात नमेबियामधील खास डॉक्टर सोबत असतील. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान चित्यांना कुठलेही गुंगीचे औषध देण्यात येणार नाही. कुनो नॅशनल पार्कमध्ये त्यांना एक महिने कॉरंटाईन ठेवण्यात येईल. चित्त्यांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेडिओ कॉलरिंगचाही वापर करण्यात येणार आहे. 700 एकरच्या भव्यदिव्य कुनो नॅशनल पार्कच्या एका भागात आता चित्तांचा दबदबा रहाणार आहे. चित्त्यांसाठी खाद्य म्हणून आधीच या जंगलात हरणं आणि अन्य वनपशूंची संख्या वाढवण्यात आली आहे.  

=========

हे देखील वाचा :पिटबुल कुत्रा चावल्याने मुलाला पडले चक्क १२५ टाके, जाणून घ्या या प्रजातीबद्दल अधिक

==========

या चित्त्यांवर खास नजर ठेवण्यासाठी नमेबियामधील विषेतज्ज्ञही काही महिने कुनो नॅशनल पार्कमधील (Kuno National Park) कर्मचाऱ्यांसोबत राहून त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. साधारण महिनाभरानंतर या चित्त्यांना एक चौरस किलोमीटरच्या परिसरात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतर त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये मुक्तपणे फिरण्यासाठी सोडण्यात येणार आहे. 

या चित्त्यांचे आगमन होण्यापूर्वी या भागातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. कुनो जंगलाच्या आसपासमधील 25 गावे मध्यप्रदेश सरकारने रिकामी केली आहेत. यापैकी 24 गावे पूर्णपणे रिकामी करून तेथे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. या नॅशनल पार्कच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये सरकारतर्फे मानवी वस्तीत चित्ता दिसल्यास काय करावे, यासंबंधी प्रशिक्षणही देण्यात आले आहे.  

चित्त्यांना भारतात पाठवण्यापूर्वी नमेबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव तज्ज्ञांचे पथक भारतात आले आहे. या पथकांने कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या रहिवासासाठी केलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आता पुढील पाच वर्ष चित्तांचे आगमन भारतात होणार आहे. या पंचवार्षिक योजनेसाठी 91 कोटींचे बजेट ठेवण्यात आले असून यामध्ये इंडियन ऑईलतर्फे आर्थिक मदत करण्यात आली आहे.

सध्या दक्षिण आफ्रिका, नमेबिया, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे यांसारख्या दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये चित्याचे अस्तित्व आहे. आशिया खंडात इराणनंतर आता फक्त भारतात चित्ते दिसणार आहेत.  त्यामुळेच नैसर्गिकरित्या चित्त्यांची संख्या वाढवण्याची योजना आहे. कुनो नॅशनल पार्कची सध्या 21 चित्ते ठेवण्याची क्षमता असून ती येत्या काळात 36 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. कुनोमध्ये (Kuno National Park) मुबलक शिकार आणि गवताळ भाग असल्यामुळे चित्त्यांना हे वातावरण पोषक ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 17 सप्टेंबर रोजी येणाऱ्या शाही पाहुण्याच्या आगमनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.