Home » जाणून घ्या बनारसी साडीबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

जाणून घ्या बनारसी साडीबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Banarasi Saree
Share

साडी प्रत्येक स्त्रीचा वीकपॉइंट. मार्केटमधून जाताना साड्यांचे दुकानं दिसले की, घ्यायची नसली तरी देखील लक्ष त्या दुकानातील साड्यांकडेच असते. आपल्याकडे साड्यांचे जेवढे प्रकार आहे, त्यातली प्रत्येक साडी निदान एक तरी असावी अशीच प्रत्येकीची सुप्त इच्छा असते.

आजच्या काळात भलेही स्त्रिया साड्या कमी नेसत असल्या तरी देखील त्यांचे साडी प्रेम कायम असते. सण समारंभ असो, कार्यक्रम असो किंवा इच्छा असो स्त्रिया साडी घेतच असतात. या साड्यांमध्ये सर्वात जास्त पसंती मिळते ती पैठणी, कांजीवरम, बनारसी आदी साडयांना. काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीता अंबानी यांनी देखील त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी लागणाऱ्या साड्यांची खरेदी बनारसमध्ये जाऊन केली. त्यानंतर पुन्हा एकदा बनारसी साड्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

काशी विश्वनाथाचे वास्तव्य असणाऱ्या वाराणसीमध्ये अर्थात बनारसमध्ये या साड्यांची निर्मिती केली जाते. विविध खाद्य पदार्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीच्या ही एक वेगळी आणि मोठी ओळख आहे. या बनारसला मोठी परंपरा, इतिहास आणि संस्कृती लाभलेली आहे. भारतातील सर्वात प्राचीन शहर म्हणून ओळख असणाऱ्या या शहरातील साड्या संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. मात्र या साड्यांचा इतिहास, त्यांची निर्मिती आणि त्यांची माहिती जास्त लोकांना माहित नाही. तेच आपण जाणून घेऊया.

भरगच्च जरीकाम, काठपदर, रेशीम कापड आदी गोष्टींमुळे या साड्या खूपच मनमोहक दिसतात. बनारसमधल्या सिल्कचा इतिहास 2500 वर्षांचा आहे. बनारसच्या ब्रोकेड आणि जरीचे कापड 19व्या शतकात देखील होते याचा उल्लेख अनेक जुन्या ग्रंथांमध्ये आहे. 1603 च्या दुष्काळात गुजरातमधून अनेक रेशीम विणकर स्थलांतरित झाले. बनारसमध्ये १७ व्या शतकात रेशीम ब्रोकेड विणकाम सुरू झाले आणि 18व्या आणि 19व्या शतकात ते चांगल्या पद्धतीने विकसित झाले.

14 व्या शतकाच्या आसपास म्हणजेच मुघल काळात सोन्या -चांदीच्या धाग्यांना ब्रोकेड विणण्यासाठी प्राधान्य दिले जात होते. हळूहळू हे धागे बनारस आणि बनारसी रेशीमची ओळख बनले. त्यानंतर ब्रोकेड आणि जरीचा पहिला उल्लेख १९ व्या शतकातील बनारसी साड्यांमध्ये आढळतो. या साडीवरती मुघल प्रेरित रचनांचा वापर केला गेला आहे. यात प्रामुख्याने गुंफलेल्या फुलांचे, पानांचे नक्षीकाम, कलगा आणि वेल तर साडीच्या बाहेरील बाजूला झालर नावाची सरळ पानांची एक तारी अशा पद्धतीचे या साडीवर विणकाम केले जात होते.

Banarasi Saree

बनारसी साड्यांची वैशिष्ट्ये :

  • बनारसी सिल्क ह्या खासकरून त्यांच्यावरील सोने-चांदीच्या, ब्रोकेड किंवा जरी, उत्कृष्ट प्रकारचे रेशीम आणि त्यावरील केलेल्या भरत कामासाठी प्रसिद्ध आहे.
  • या साड्या अस्सल रेशमापासून बनवल्या जातात आणि त्यावरील जरीच्या विणकामामुळे या साड्या अतिशय महाग असतात.
  • बनारस मधील विणकर या साड्या बनवण्यासाठी पारंपारिक यंत्रांचा वापर करतात. ही साडी हात मागावरती बनवण्यासाठी 15 दिवस ते 1 महिना लागतो.
  • साडीवरील नक्षीकाम, कलाकुसर अधिक असेल तर साडी बनवण्यासाठी वेळही जास्त लागतो. काही साड्या बनविण्यासाठीचा वेळ हा 6 महिने ते 1 वर्ष इतका देखील असतो.
  • या साडीवर असलेल्या कामामुळे तिचा लूक खूपच रिच दिसतो. त्यामुळे बनारसी सिल्क साडीला लग्न समारंभ आणि पूजेसाठी विशेष महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर लग्नासाठी नववधूदेखील या साडीला विशेष पसंती देते. या साडीवरील नक्षीकाम आणि जरीच्या वापरामुळे या साडीला वजन असते.
  • या साडीवर असणारे सोन्याचे काम, कॉम्पॅक्ट विणकाम, लहान तपशीलांसह आकृत्या, धातूचे दृश्य प्रभाव, जल आणि मीना वर्क यामुळे ही साडी इतर साड्यांपेक्षा वेगळी आणि खास ठरते.
  • या साड्यांमध्ये बहुतकरून नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. IIT – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि BHU- बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या संशोधन पथकाने नैसर्गिक रंग विकसित केलेले आहेत. हे रंग फुले आणि फळांपासून तयार केले जातात, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

======

हे देखील वाचा : जाणून घ्या राजवस्त्र पैठणीचा वैभवशाली इतिहास

======

बनारसी सिल्क साडी चे प्रकार आणि त्यावरील डिझाइन

कतन बनारसी साडी
शत्तीर बनारसी साडी
जॉर्जेट बनारसी साडी
जाल किंवा जंगला बनारसी साडी
तनचोई बनारसी साडी
कटवर्क बनारसी साडी
टिशू बनारसी साडी
बुट्टीदार बनारसी साडी
जामदनी बनारसी साडी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.