दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! पोर्ट एलिझाबेथ येथील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव करून भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.
तसे पाहिले तर २०१८ पासून भारताचा हा आफ्रिकेवरील सलग पाचवा विजय आहे. २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथे विजय नोंदवल्यावर भारताने २०१९ मध्ये मायदेशातील मालिकेत आफ्रिकेला ३-० अशी धूळ चारली होती. त्यानंतर तीच विजयी घोडदौड कायम ठेवत २०२१-२२ च्या आफ्रिकेमधील मालिकेतील पहिल्या कसोटीत विजय नोंदवला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३२७ धावा काढल्या. के.एल. राहुलने वैयक्तिक शतक (१२३ धावा) फटकावताना आपल्या कर्नाटकचा सहकारी मयांक अगरवाल याच्याबरोबर पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून जणू विजयाचा पायाच रचला. त्याने विराट कोहली व अजिंक्य राहाणे यांच्याबरोबर उपयुक्त अर्धशतकी भागीदाऱ्या करून भारताला ३२७ धावांपर्यंत मजल मारण्यात मोठाच हातभार लावला. त्याचे कव्हर ड्राईव्हज,कट्स, पूल्स अतिशय देखणे होते. परीक्षा बघणाऱ्या खेळपट्टीवर त्याने बचाव व आक्रमण याचा सुरेख मिलाफ साधला.
मात्र विराट व अजिंक्य राहणे हे चांगल्या सुरवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकले नाहीत. विराटने तर दोन्ही डावात सातव्या आठव्या स्टंपवरील चेंडूला बॅट लावून हाराकिरी केली. रहाणेने आक्रमक खेळाचे प्रदर्शन दोन्ही डावात केले. पण अजिंक्य मधून मधून धोकादायक फटके खेळत होता.
चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. आफ्रिकेच्या रबाडा, इंगिडी या जलद दुकलीने दोन्ही डावात भारताला सतावले. इंगिडीने पहिल्या डावात ६ बळी मिळवताना वेगवान स्विंग गोलंदाजीचा नमुना पेश केला.
भारतातर्फे मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करून पहिल्या डावात पाच विकेट्स काढल्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये बळीचे द्विशतक नोंदवले. त्याने सातत्याने उजव्या यष्टीवर अचूक टप्प्यावर मारा करून आफ्रिकन फलंदाजांना चकवले. बुमराह,सिराज व शार्दूल ठाकूरने शमीला चांगली साथ दिली.
चार जलद गोलंदाज खेळवण्याची भारताची रणनीती यशस्वी ठरली. सिराजने मैदानावरील माकडचेष्टा कमी करून क्षेत्ररक्षणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. डी कॉकला भारताने दोन्ही डावात नियोजनबद्ध रीतीने बाद केले ते बघून बरे वाटले.
आफ्रिकन फलंदाजी अननुभवी व कमकुवत आहे ते दोन्ही डावातील त्यांच्या पडझडीने अधोरेखित झाले. एल्गर, बाऊमा व मार्कर्म यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची भिस्त आहे. सामना जिंकल्यावर भारताने जो संयमितपणे आनंद व्यक्त केला त्यात प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित झाले.
हे ही वाचा: हे वाद टाळता येणार नाहीत का?
रणजी स्पर्धेला मुहूर्त केव्हा मिळणार? (Ranji Trophy)
पोर्ट एलिझाबेथला कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियायी देश ठरला. पण यातच समाधान न मानता भारताने मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवावे. अन्यथा भारत नुसता ‘आरंभशूर’ ठरेल.
– रघुनंदन भागवत