Home » क्षेत्ररक्षणातील हुकमी एक्का -एकनाथ सोलकर 

क्षेत्ररक्षणातील हुकमी एक्का -एकनाथ सोलकर 

by Team Gajawaja
0 comment
एकनाथ सोलकर
Share

१९७१ च्या ऐतिहासिक विंडीज दौऱ्यातील बार्बाडोसची चौथी कसोटी चालू होती. विंडीजच्या ५ बाद ५०१ या धावसंख्येला उत्तर देताना भारताचा डाव ६ बाद ७० असा गडगडला होता. दिलीप सरदेसाईंच्या साथीला एकनाथ सोलकर मैदानात आला. या जोडीने चिवटपणे खेळून विंडीज गोलंदाजांचा घाम काढायला सुरुवात केली.

गारफिल्ड सोबर्स गोलंदाजीला आला. त्याच्या गोलंदाजीवर एकनाथ खेळायचा प्रयत्न करत होता, पण बॅट आणि चेंडू यांची गाठ पडत नव्हती. त्यावेळी सोबर्स एकनाथला म्हणाला बॅट ही चेंडूला मारण्यासाठी असते. एकनाथने लगेच बाणेदारपणे उत्तर दिले की, तू तुझे क्रिकेट खेळ मी माझे क्रिकेट खेळीन. आज अशा बाणेदार एकनाथ उर्फ एक्कीची आठवण व्हायचे कारण म्हणजे १८ मार्चला त्याची ७४ वी जयंती आहे.

एकनाथने क्रिकेटचे कौशल्य आत्मसात केले ते हिंदू जिमखान्यावर सरावासाठी येणाऱ्या दिग्गज खेळाडूंकडून, ज्यात विनू मंकड होते, माधव मंत्री होते, बापू नाडकर्णी होते. या खेळाडूंना नेट प्रॅक्टिस देता देता तो त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला.

एकनाथ सोलकर (Eknath Solkar) हा हिंदू जिमखान्याच्या ग्राऊंड्समनचा मुलगा. वडिलांबरोबर मैदानाची देखभाल करतानाच त्याने क्रिकेटवरही लक्ष केंद्रित केले. अत्यंत गरिबीमध्ये दिवस कंठणाऱ्या एकनाथला मराठा मंदिर  शाळेत प्रवेश मिळवून दिला तो माधव मंत्रींनी. त्याला अभ्यासात गती नव्हती, पण क्रिकेटमध्ये मात्र तो मैदान गाजवीत राहिला. त्याने भारतीय शालेय संघाचा कर्णधार होण्यापर्यंत मजल मारली.

एकनाथ सोलकर (Eknath Solkar) ज्या काळात उदयास येत होता तेव्हा सामान्यतः सुखवस्तू मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत राजे -राजवाडे, उद्योजक अशा घरांमधूनच क्रिकेटपटू पैदा होत असत. एकनाथने या सर्व परिस्थितीला छेद दिला. समाजाच्या अत्यंत दुर्लक्षित वर्गातून पुढे येऊन त्याने भारतीय क्रिकेटला सर्वसमावेशक बनवले. भारतीय क्रिकेट तर दूरच राहिले, पण मुंबईच्या संघात अशा मुलाला स्थान मिळणे तसे दुरापास्त होते कारण दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्ग तसेच दादर माहीम मधील उच्च मध्यमवर्गातील क्रिकेटपटुंचाच भरणा मुंबईच्या संघात होता.

एकनाथची भारतीय शालेय संघात निवड झाली तेव्हा त्याच्याकडे क्रिकेटचा पोशाख सुद्धा नव्हता. विजयभाईंनी (विजय मर्चन्ट) त्याला क्रिकेटच्या पोषाखाबरोबर किट सुद्धा घेऊन दिले. विजय मर्चन्टना श्रद्धांजली वाहताना एकनाथने कृतज्ञतेने या गोष्टीचा उल्लेख केला होता.

इंग्लंडच्या शालेय संघाविरुद्ध एकनाथ सोलकर (Eknath Solkar) भारतीय शालेय संघाचा कप्तान होता. दोन्ही संघांच्या स्वागतासाठी ताज हॉटेलमध्ये समारंभ होता. भारतीय कप्तान म्हणून एकनाथला इंग्लिशमधून भाषण करायचे होते. पण त्याला तर इंग्लिशचा गंध नव्हता. गावस्करने त्याला देवनागरी लिपीत इंग्लिशमधील भाषण लिहून दिले ते त्याने सराईतपणे वाचले व ‘जितं मया’ अशा अविर्भावात सुनीलकडे पाहिले.

गुणवत्तेच्या जोरावर एकनाथने मुंबई रणजी संघात स्थान मिळवले ते १९६७-६८च्या मोसमात फिरकी गोलंदाज व उपयुक्त फलंदाज म्हणून.

विजयभाईंनी १९६९ साली तरुण खेळाडूंना भारतीय संघाचे दरवाजे खुले केल्यावर तीन नाथांनी भारतीय संघात प्रवेश केला ते म्हणजे विश्वनाथ, एकनाथ आणि अमरनाथ (मोहिंदर). यातील एकनाथचा पहिला नंबर लागला आणि न्यूझीलंड विरुद्ध हैदराबाद कसोटीत त्याने भारतीय संघात पदार्पण केले.

पाठोपाठ आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कानपुर कसोटीत सोलकरने संघात पुनरागमन केले आणि आपली जागा पक्की केली. दुसऱ्या डावात त्याने विश्वनाथच्या पहिल्या शतकात अमोल साथ देत शतकी भागीदारी रचली. याच मालिकेदरम्यान दिल्लीला कर्णधार पतौडीने सोलकरला फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे राहण्याविषयी विचारणा केली आणि नवोदित असल्याने हा विनंतीवजा आदेश सोलकरने स्वीकारला. 

सोलकरने या संधीचे सोने केले. भारताने दिल्ली कसोटीत विजय मिळवला त्यात सोलकरने दोन झेल घेतले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध  मालिकेत एकनाथने एकंदर ९ झेल घेतले आणि त्याशिवाय नियमितपणे ३०-४० धावांचे उपयुक्त योगदान दिले. मध्यमगती गोलंदाज म्हणून रेडपाथ व इतर काही खेळाडूना बाद करून आपल्या अष्टपैलूत्वाची चुणूकही दाखवून दिली .

ऑस्ट्रेलियाच्या मालिकेनंतर १९७१च्या  ऐतिहासिक दौऱ्यावर वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारत वेस्ट इंडिज मध्ये गेला. हा दौरा आणि गावस्कर यांचे अतूट नाते असल्याने रसिक फक्त त्याचीच चर्चा आणि आठवणी काढतात. पण दिलीप सरदेसाई आणि एकनाथ सोलकर यांनी कठीण परिस्थितीत जी अजोड कामगिरी केली ती अविस्मरणीय आहे. पहिल्या जमेकाच्या सामन्यात पहिल्याच डावात भारताची ५ बाद ७५ डळमळीत स्थिती असताना सरदेसाई -सोलकर जोडीने १३७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सोलकरने ६१ धावा करून आपले पहिले अर्धशतक नोंदवले तर सरदेसाईने २१२ धावा केल्या.

भारताने पोर्ट ऑफ स्पेन येथील दुसरी कसोटी सात गडी राखून जिंकली. या कसोटीत सरदेसाईने परत एक शतक (११२) मारले तर सोलकरने ५५ धावा  काढल्या. सोलकरने या कसोटीत एकूण ६ झेल घेऊन फिरकी गोलंदाजांना विंडीजचे दोन्ही डाव स्वस्तात गुंडाळण्यात मदत केली. विंडीज दौऱ्यात सोलकरने मध्यमगती मारा करताना सोबर्स,कन्हाय सारख्या खेळाडूंची विकेट काढली होती. खेळाच्या तिन्ही अंगात प्राविण्य दाखवून त्याने भारताचा ‘गॅरी सोबर्स’अशी ख्याती मिळवली.

अजित वाडेकरने या दौऱ्यातील एक किस्सा सांगितला आहे. एका प्रथम श्रेणी सामन्यात कालिचरणचा उंच उडालेला झेल घेण्यासाठी एकनाथ सोलकर (Eknath Solkar) तयारीत असताना एक विंडीज प्रेक्षक ओरडला की, “ए सोलकर तू हा झेल सोडल्यास मी माझी बहीण तुला देईन.” 

सोलकरने तो झेल घेतल्यावर अजित त्याला म्हणाला की, तू त्या प्रेक्षकाची ऑफर ऐकलीस का? सोलकरने मजेशीर उत्तर दिले की, मला काय माहित ती ‘ढापणी’ निघाली तर?

१९७१ चा इंग्लंड दौरा हा सोलकरच्या छोट्या कारकिर्दीतील कळसाध्याय ठरला. या सिरीजमध्ये त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली.

तिसरी ओव्हलची कसोटी जिंकून भारताने इंग्लंडमध्ये प्रथमच मालिका विजय साकार केला. हा सामना जसा चंद्रशेखरच्या नावाने ओळखला जातो तसाच तो सोलकरचाही होता. सोलकरने पहिल्या डावात ४४ धावा काढताना फारूक इंजिनिरबरोबर महत्वाची भागी केली. इंग्लंडच्या पहिल्या डावात २८ धावात ३ बळी घेतले आणि इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नॉटचा घेतलेला अविस्मरणीय झेल कोण विसरेल? 

नॉट हा या मालिकेत आपल्या दृष्टीने अडसर ठरला होता आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत लवकर बाद करणे आवश्यक होते. नॉट अंधश्रद्धाळू होता. तो खेळायला सुरुवात करण्याआधी बेलने क्रिज मार्क करायचा. सोलकरने त्याच्यावर मानसिक दबाव टाकण्यासाठी स्टंपवरची बेलच काढून घेतली त्यामुळे नॉट थोडा बावचळला. सोलकरने हेरले होते की, त्याच्या अंधश्रद्धेला तडा दिल्यास नॉट अस्वस्थ होईल. 

नॉटसाठी तो शॉर्ट लेगला थोडा पुढे उभा राहिला. वेंकटचा चेंडू जसा नॉट खेळला त्याक्षणी सोलकरने पुढे सूर मारून जवळजवळ नॉटच्या पायापाशी झेल पकडला. त्याचा फोटो हा एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरला आहे. या झेलाचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य.

विजयी भारतीय संघ भारतात परतला तेव्हा त्याचे ‘न भूतो न भविष्यती’ असे स्वागत झाले. मराठा वृत्तपत्राने खास पुरवणी काढली होती त्यात सोलकरने मालिकेत घेतलेल्या पाचही झेलांची छायाचित्रे होती. एकनाथ सोलकर (Eknath Solkar) विमानातून उतरला तेव्हा त्याने पाहिले की, त्याची आई संकोचून एका कोपऱ्यात उभी होती. तिने मुलाचे तोंड गोड करण्यासाठी पेढ्याचा पुडा आणला होता. सोलकरने धावत जाऊन आईला आलिंगन दिले.

१९७२ च्या हिवाळ्यात टोनी लुईसचा दुय्यम इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर आला. पाच सामन्यांची ही मालिका चंद्रशेखर,बेदी यांच्याबरोबरच सोलकरची म्हणून ओळखली जाते. या मालिकेत पहिल्या तीन कसोटीतच त्याने १२ झेल पकडले होते आणि ते होतेही एकापेक्षा एक सरस.

अजून एक झेल पकडला असता, तर एका मालिकेतील सर्वात जास्त झेलांचा त्यावेळचा विक्रम त्याच्या नावावर लागला असता, पण उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्याच्या हातून काही झेल सुटले आणि भारतीय प्रेक्षक हळहळले. हेल्मेट अथवा इतर कुठलेही संरक्षणात्मक साधन न वापरता बेडरपणे फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभा राहणारा एकनाथ सोलकर (Eknath Solkar) प्रतिपक्षाच्या मनात मात्र धडकी भरवत असे.

१९७४ मध्ये भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आणि तेथील थंड वातावरणात चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारताची त्रेधा तिरपीट उडाली आणि ३-० असा  मालिका पराभव स्वीकारावा लागला. पण गावस्करव्यतिरिक्त सोलकरनेच या दौऱ्यात भारताची थोडीफार लाज राखली. त्याने महान फलंदाज बॉयकॉटला गिऱ्हाईक बनवले व बॉयकॉटने आत्मविश्वास गमावून कसोटी क्रिकेटमधून स्वेच्छेने काही दिवसांसाठी निवृत्ती पत्करली.

बॉयकॉट हा खडूस स्वभावाचा होता. एकदा आऊट झाल्यावर तो क्रीज सोडेना तेव्हा मिश्किल एकनाथ सोलकर (Eknath Solkar) त्याला म्हणाला की, “गो अँड आस्क युअर ऑंटी.” एकनाथला माहित होते की, बॉयकॉटची प्रेयसी त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती म्हणून त्याने ‘ऑंटी’असा उल्लेख केला.

याच मालिकेत त्याने डेविड लॉईडचा प्रसन्नाच्या गोलंदाजीवर फॉरवर्ड शॉर्ट लेगवर घेतलेला झेल चित्तथरारक होता. प्रसन्नाचा उंची दिलेला चेंडू डेविड लॉईडने पूर्ण ताकदीनिशी स्वीप केला तो थेट सोलकरच्या दिशेने. सोलकरने जमिनीवर पाठीवर पडून हा चेंडू छातीवर घेऊन झेलला. प्रसन्नचा तसेच डेविड लॉईडचा डोळ्यावर विश्वास बसला नाही. संघहिताला प्राधान्य देऊन सोलकर याच मालिकेत सलामीवीर बनला.

१९७४-७५ मध्ये लॉईडचा वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला त्या दरम्यान गावस्कर जखमी झाल्याने सोलकरला सलामीला जावे लागले. नंतर गावस्कर शेवटच्या कसोटीत परत आल्यावर सोलकरला तिसऱ्या क्रमांकावर धाडण्यात आले. याच मुंबई कसोटीत एकनाथने आपले एकमेव कसोटी शतक (१०२) झळकावले ते रॉबर्ट्स,होल्डर, जुलिएन, बॉइस गिब्ज यांच्या दर्जेदार माऱ्यासमोर.

हे शतक टीव्ही वर पाहिल्याचे चांगलेच स्मरते. नव्वदीत आल्यावर एकनाथ सोलकर (Eknath Solkar) कमालीचा नर्वस झाला होता आणि त्याने शंभरावी धाव विश्वनाथच्या साथीने धडपडत पूर्ण केल्यावर ‘गंगेत घोडे न्हाले’, अशी भावना झाली होती.

१९७५-७६ मध्ये भारताचा संघ न्यूझीलंड – वेस्ट इंडिजच्या जोड दौऱ्यावर गेला तेव्हा सोलकर फॉर्ममध्ये नव्हता, पण क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याची निवड झाल्याची टीका त्याकाळी झाली. या जोड दौऱ्यात एकनाथ फक्त एक कसोटी सामना विंडीजमध्ये ‘पोर्ट ऑफ स्पेन’ मध्ये खेळला. या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. 

सोलकरने विंडीजच्या दुसऱ्या डावात ३ झेल घेतले. पण याच दौऱ्यात एकनाथ एका सुटलेल्या झेलमुळे टीकेचा धनी झाला. दुसऱ्या कसोटीत भारत विजयाच्या मार्गावर असताना लॉईडचा झेल घेण्यासाठी ब्रिजेश पटेल व सोलकर एकाच वेळी धावले आणि त्यांची टक्कर झाल्याने झेल सुटला व विंडीजने सामना वाचवला. एकनाथ सोलकर (Eknath Solkar) या सामन्यात राखीव खेळाडू होता.

भारतात परत आल्यावर १९७६ मध्ये  ग्रेगच्या इंग्लंड संघाविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळाली नाही. या सामन्यात जॉन लिव्हर आणि अंडरवूड या डावखुऱ्या गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली. त्यावेळी या दोघांना तोंड देण्यासाठी सोलकरसारखा डावखुरा फलंदाज हवा अशी निकड भासली. मात्र सोलकरचे पुनरागमन सपशेल अयशस्वी ठरले. चेन्नई  कसोटी त्याची अखेरची ठरली.

====

हे देखील वाचा: क्रिकेटच्या दुनियेतला अवलिया ‘इंजिनियर’!

====

त्यानंतर पुढे पाच एक वर्षे तो मुंबईकडून रणजी सामने खेळत राहिला. १९८१ मध्ये मुंबईचा कर्णधार असताना त्याने बेदीच्या दिल्लीवर मात करून रणजी करंडक मुंबईला मिळवून दिला. त्या सामन्यात त्याने घेतलेल्या एका झेलाची तुलना बेदीने थेट ॲलन नॉटच्या झेलाशी केली होती.

एकूण २७ कसोटीत  १०६८ धावा १८ विकेट्स आणि ५३ झेल अशी आकडेवारी असणारा हा खेळाडू युगप्रवर्तक ठरला. त्याने क्षेत्ररक्षणाच्या कलेला नवीन आयाम दिले. पण त्यावेळच्या चित्रफिती उपलब्ध नसल्याने आजच्या पिढीला या कलेचं दर्शन घडत नाही. बेडरपणा, निस्वार्थीपणा संघहित सर्वोपरी मानण्याची त्याची वृत्ती यामुळे तो कायम टीम मॅन राहिला. पण यामुळेच त्याचे करिअर लवकर संपले असावे.

संघासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करताना त्याने स्वहिताकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागले. संघासाठी तो मूळ फिरकी गोलंदाजीकडून मध्यमगतीकडे वळला. संघासाठी तो कुठल्याही क्रमांकावर खेळण्यास तयार झाला आणि संघासाठीच जीवाची बाजी लावून फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करू लागला.

====

हे देखील वाचा: भारतीय क्रिकेटचा ‘टायगर’ मन्सूर अली खान पतौडी (Mansoor ali khan Pataudi)

====

महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री अंतुले यांचे सोलकरवर फार प्रेम. तो वरळीला बी डी डी चाळीत राहतो हे ऐकून त्यांना वाईट वाटले. त्यांनी वरळीतील भूखंड स्पोर्ट्स फील्ड या इमारतीसाठी दिला आणि सोलकरला त्याच्या आवडीचा फ्लॅट घेण्याचे स्वातंत्र्य दिले. सोलकरमुळेच ही इमारत उभी राहिली आणि अनेक क्रिकेटपटू या इमारतीत राहू लागले.

क्रिकेटच्या मैदानातून लहान वयात दूर होणाऱ्या एक्कीने जीवनाच्या खेळपट्टीवरूनही वयाच्या केवळ ५८ व्या वर्षी चटका लावून जाणारी अकाली एक्झिट घेतली. दूरदर्शनवर त्याचे अंतिम दर्शनाचे दृश्य दाखवत असताना सांगितले गेले त्यानुसार फार थोडे क्रिकेटपटू त्यावेळी उपस्थित होते. त्यावरून ग.दि.माडगूळकर यांच्या खालील ओळींची आठवण झाल्यावाचून राहवत नाही.

“लळा जिव्हाळा शब्दच खोटे कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही.”

क्षेत्ररक्षणातील या हुकमाच्या एक्क्याला शतशः प्रणाम !

– रघुनंदन भागवत 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.