भारतीय लेखिका गीतांजलि श्री यांच्या ‘टॉम्ब ऑफ सैंड’ या कादंबरीला बुकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ‘टॉम्ब ऑफ सैंड’ ही कांदबरी गीतांजलि श्री यांच्या ‘रेत समाधी’ या हिंदी कादंबरीचा इंग्रजी अनुवाद आहे. अमेरिकन लेखिका ‘डेजी रॉकवेल’ यांनी ‘रेत समाधी’चा इंग्रजी अनुवाद केला होता. बुकर सारख्या प्रतिष्ठीत पुरस्कारानं सन्मानित झालेली ही पहिलीच हिंदी कादंबरी असून यामुळे गीतांजलि यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Booker Award winner Geetanjali Shree)
बुकर पुरस्कारासाठी जगभरातली 13 पुस्तकं अंतिम यादीत होती. त्यात लेखिका गीतांजलि श्री यांच्या कादंबरीचाही समावेश होता. बुकर पुरस्काराची मोहोर उमटवणारी ‘टॉम्ब ऑफ सैंड’ ही हिंदी भाषेतील पहिली कादंबरी ठरली आहे.
लंडनमध्ये झालेल्या एका शानदार समारंभात गीतांजलि श्री यांनी ‘बुकर पुरस्कार’ स्विकारला. त्यांना 50 हजार पाऊंड एवढी रक्कमही पुरस्कार स्वरुपात मिळाली आहे. सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असलेल्या गीतांजलि मूळ उत्तर प्रदेश, मैनपुरी येथील रहिवासी आहेत. बुकर पुरस्कार जाहीर झाल्यावर गीतांजलि यांना एखाद्या स्वप्नासारखा आभास झाला. हा पुरस्कार कधी आपल्याला मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी केली नव्हती, असे त्यांनी सांगितले. अत्यंत आनंद देणारी ही घटना असल्याचे गीतांजलि यांनी नमूद केले आहे. (Booker Award winner Geetanjali Shree)
या पुरस्कारासाठी त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच प्रकाशकांचे आभार मानले आहेत. या पुरस्कारामुळे माझ्यासारख्याच अन्य हिंदी भाषिक लेखकांनाही प्रोत्साहन मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
कादंबरी आणि कथा संग्रहांच्या लेखिका असणाऱ्या गीतांजलि यांच्या साहित्याचा इंग्रजी, जर्मनी,सर्बियन, फ्रेंच आणि कोरीअन भाषांमध्येही अनुवाद झाला आहे. बुकर पुरस्कारानं सन्मानित ‘टॉम्ब ऑफ सैंड’ या कादंबरीत देशाच्या फाळणीच्यावेळी घटलेली एक कौटुंबिक कथा सांगण्यात आली आहे. या पुस्तकाची बुकरसाठी निवड करणाऱ्या पॅनलचे अध्यक्ष ‘फ्रैंक वायने’ यांनी या कथेतील महिला शक्ती, मार्मिकता, भावनिकता यांच्या अतूट नात्यांनी आपण भारावल्याचे सांगितले. (Booker Award winner Geetanjali Shree)
=======
हे देखील वाचा – डॉ. अनिल अवचट (Dr. Anil Awachat): एक साधा, सरळ, सोपा, माणूस
=======
उत्तरप्रदेशात 12 जून 1957 रोजी गीतांजलि श्री यांच जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण उत्तरप्रदेशच्या विविध शहरात झाले. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली आणि जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयात इतिहासात एम. ए. केले. याशिवाय गीतांजलि श्री यांनी अन्य मान्यवर विद्यापिठातही हिंदी भाषेमध्ये संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. या दरम्यान त्यांनी आपल्या स्वतंत्र लेखनालाही सुरुवात केली.
‘माइ’ ही त्यांची पहिली कांदबरी आहे. ‘हमारा शहर उस बरस’ ही त्यांची कादंबरीही लोकप्रिय ठरली आहे. दिल्लीमधील हिंदी साहित्य अकादमीने त्यांचा सत्कार केला होता. आता गीतांजलि श्री यांच्या नावापुढे ‘बुकर’ या पुरस्काराचे नाव लिहिले गेल्याने त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.
– सई बने