१९७७ च्या मार्च महिन्याची सुरुवात होती. एक दिवस अचानक रात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी रेडिओवर भाषण करून आणीबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली तसेच अटकेतील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुटका करणार असल्याचे जाहीर केलं. हे ऐकून जनतेचा कानावर विश्वास बसेना कारण आणीबाणीचे दमनचक्र पूर्ण जोमात चालू असल्याने निवडणुकीचा विचारही लोकांच्या मनातून हद्दपार झाला होता.
काही काळाने भानावर आल्यावर लोकांच्या मनातील आणिबाणीविरुद्धच्या भावनांना मोकळी वाट मिळाली आणि आणीबाणीच्या काळात जनतेच्या मूलभूत हक्कांचा झालेला संकोच, विरोधकांची केली गेलेली मुस्कटदाबी यांना वाचा फुटली.असे काय झाले होते की, जनता एवढी क्षुब्ध व्हावी?
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जशी अकस्मात उठवली तशीच २५ जून १९७५, या दिवशी आणीबाणी अगदी आकस्मिकपणे देशावर लादली होती. आणीबाणीची घोषणा होण्यापूर्वी देशाचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. देशात महागाईचा भडका उडाला होता.

जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. बिहार आणि गुजरात राज्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते व त्यांनी नवनिर्माण आंदोलन सुरु केले होते. मोरारजीभाई देसाई यांनी नवनिर्माण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले होते. (Indira Gandhi imposed the Emergency)
जयप्रकाशजी पूर्ण देश पिंजून काढत होते आणि त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी जमत होती. त्यांनी पोलीस व सैन्यदलांना आवाहन केले की, त्यांनी सरकारचे बेकायदेशीर आदेश मानू नयेत. असा संपूर्ण देश जणू ज्वालामुखीच्या तोंडावर उभा असताना उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरावी तसा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आला. राजनारायण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती सिन्हा यांनी इंदिरा गांधीचा १९७१च्या निवडणुकीतील विजय तांत्रिक कारणासाठी रद्दबातल ठरवला.
=====
हे देखील वाचा : व्हाय आय किल्ड गांधी: अभिनेते आणि जनमानसातील प्रतिमा
=====
यशपाल कपूर हे सरकारी कर्मचारी असूनही त्यांनी इंदिराजींचा पोलिंग एजंट म्हणून काम पाहिले, या कारणास्तव इंदिराजींची निवड न्यायालयाने रद्द ठरवली. देशभरात इंदिराजींच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला. इंदिराजी द्विधा मनःस्थितीत सापडल्या, पण त्यांनी धाकटे पुत्र संजय गांधी यांच्या सल्ल्यानुसार राजीनामा न देण्याचे ठरवले.
यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल याची कल्पना त्यांना आली होती. आपले पंतप्रधानपद वाचवण्यासाठी त्यांनी थेट आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांची सही झाल्यावर देशात आणीबाणी सुरु झाली. मध्यरात्रीच जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, वाजपेयी, अडवाणी, नानाजी देशमुख, मधू लिमये, मधू दंडवते इत्यादी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची धरपकड करण्यात आली. (Indira Gandhi imposed the Emergency)

सर्व देशभर हजारो विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेविरुद्ध कोर्टात दाद मागण्याचा मूलभूत हक्क हिरावून घेतला गेला. पोलीस कोणालाही कुठल्याही कलमाखाली वॉरंटशिवाय अटक करू शकत होते. कामगारांना संप करण्यास बंदी घातली गेली. कुणीही सरकारविरुद्ध बोलू शकत नव्हते. सर्वत्र दहशतीचे साम्राज्य पसरले होते. साध्या वेशातील पोलीस शाळा/कॉलेजच्या वर्गात जाऊन बसत होते.
अशा या भयप्रद वातावरणात अचानक निवडणूक जाहीर झाली आणि लोकांचा कोंडलेला श्वास बाहेर पडला. नंतरचे वातावरण म्हणजे खरोखरच मंतरलेले दिवस होते. साम्यवादी पक्ष वगळता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला. जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, नंदिनी सत्पथी हे काँग्रेसमधील दिग्गज नेते जनता पक्षाला येऊन मिळाले.
=====
हे देखील वाचा : …आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले
=====
चंद्रशेखर, मोहन धारिया या तरुण तुर्क नेत्यांनी आणीबाणीला विरोध म्हणून काँग्रेस पक्ष आधीच सोडला होता. सर्व देशभर विरोधकांच्या जंगी निवडणूक प्रचार सभा होत होत्या. नामवंत विचारवंत, साहित्यिक जनता पक्षाच्या प्रचाराला मैदानात उतरले होते. आम्ही आमच्या किशोरवयात हे वातावरण अक्षरशहा जगलो.
पुण्यात वाजपेयी, सुब्रमण्यम स्वामी यांच्या अभूतपूर्व सभा झाल्या. पु.ल.देशपांडे, दुर्गा भागवत, प्रभाकर पाध्ये यासारखे साहित्यिक राजकारण्यांच्या जोडीने मैदान मारत होते. जणू उमेदवार नुसते नावाला होते आणि जनताच निवडणूक लढवत होती. या सर्वाचा जो परिणाम व्हायचा तो झाला. जनता पक्ष पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आला.
इंदिरा गांधी, संजय गांधी, बन्सीलाल समवेत अनेक काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला. रायबरेलीचा निकाल आल्यावर (इंदिरा गांधींचा मतदारसंघ) रात्रभर विजय मिरवणूका निघाल्या, जणू जनतेने १५ ऑगस्ट १९४७ नंतर दुसरा स्वातंत्र्य दिन साजरा केला. ग.प्र.प्रधान तर म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जसे मंतरलेले दिवस होते तेच जणू या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यात पुनरुजीवीत झाले.
– रघुनंदन भागवत
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.