Home » मुंडे साहेबांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

मुंडे साहेबांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

by Correspondent
0 comment
Share

भारतीय जनता पक्षाचा सामाजिक पाया व आक्रमकता वाढवून हा पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरलेला नेता अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख आहे. ‘मध्यमवर्गीय ब्राह्मणांचा पक्ष’ ही भाजपची प्रतिमा बदलून हा पक्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे श्रेयही यांनाच जाते. मराठवाड्यातील ग्रामीण भागातून आलेल्या मुंडे यांनी आपल्या नेतृत्व गुणांच्या बळावर बहुजनांतील तडफदार नेता अशी ख्याती मिळविली. मुंबई-पुण्यापुरता शहरी भागातील भाजप ग्रामीण भागात रुजला तो मुंडे व अण्णासाहबे डांगे यांच्या नेतृत्वामुळेच. मुंडे विधी पदवीधर आहेत.

कसा सुरू झाला प्रवास?
विद्यार्थिदशेत मुंडे साहेबांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम केले आणि त्यातूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या मुंडे यांनी १९७८ मध्ये निवडणूक लढवून प्रथम विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर मुंडे यांनी मागे वळून पाहिले नाही. मराठीवर प्रभुत्व असणारा त्यांच्यातील फर्डा वक्ता जाईल तेथे लक्ष वेधून घेत होता. काँग्रेस व काही भागात शे.का.प.चे वर्चस्व असलेल्या मराठवाड्यात मुंडे यांनी भाजपला स्थान मिळवून दिले. १९८६ ते ९० या काळात मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. पक्षातील काव्य एकनिष्ठ नेत्यांत मुंडे यांचे स्थान वरचे राहिले आहे. मुंडे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी भाजपचा खऱ्या अर्थाने विस्तार केला. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी या पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. माळी, धनगर, वंजारी (मा.घ.व.) या आत्तापर्यंत काँग्रेस सोबत असलेल्या, पण सत्तेपासून वंचित जातिसमूहांना मुंडे यांनी भाजपकडे आकर्षित केले. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी,माझी पदाधिकाऱ्यांना त्यांनी भाजपमध्ये स्थान दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी शिवसेनेसोबत युती केली आणि काँग्रेसला राज्यात प्रथमच प्रबळ विरोधी पक्ष दिला. मुंडे यांच्या नेतृत्वामुळेच भाजपला १९९०च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ४२ जागा जिंकता आल्या. शरद पवार यांच्यावर तोफ डागणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. एन्रॉन प्रकल्पाची उभारणी होत असताना मुंडे यांनी त्यास कडाडून विरोध केला. आम्ही सत्तेवर आल्यास हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवून टाकून अशी वक्तव्ये यांनी केली. त्यास सर्व थरांतून पाठिंबा मिळाला.

सरकार स्थापनेत त्यांचा वाटा
१९९२ मध्ये उद्ध्वस्त झालेली बाबरी मशीद, पाठोपाठ मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, १९९५ मध्ये झालेली मुंबईतील भीषण दंगल आणि शिवसेना-भाजपचे काँग्रेसविरोधात पेटवलेले रान यामुळे १९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदा बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले. त्यात मुंडे यांचा वाटा महत्त्वाचा होता. या सरकारमध्ये मुंडे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे गृह खात्याचाही कारभार आला. मुंडे यांनी गृह खात्याचा कारभार अत्यंत ठामपणे हाताळला. युतीच्या काळात दंगलीवर वचक बसला. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि मुंडे उपमुख्यमंत्री ही जोडी राज्यात चांगलीच जमली. भाजप-सेनेत अनेकदा मतभेदाचेही प्रसंग आले; पण प्रमोद महाजन यांच्या मध्यस्थीने आणि मुंडे यांच्या भूमिकेमुळे तणाव दूर होत गेला. १९९९ मध्ये मुदतीपूर्वी युतीने निवडणूक घेतली. मात्र काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने विभाजन होऊनही राज्यात पुन्हा युतीला सत्तेवर येता आले नाही. नारायण राणे हे विधानसभेत विरोधी पक्षनेते, तर गोपीनाथ मुंडे भाजपचे गटनेते झाले. २००४ च्या निवडणुकीतही भाजप-शिवसेनेला मतदारांनी हुलकावणीच दिली. या काळात भाजपमध्येही मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर मुंडे पक्षात काहीसे एकाकी पडले. पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली; पण तरीही नाराज झालेल्या मुंडे यांनी २००८ मध्ये पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला.पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत घातली.

भाषणांनी गाजविणारे मुंडे
२००९च्या लोकसभा निवडणुकीत मुंडे यांनी बीडमधून विजय मिळवला व दिल्लीच्या राजकारणात गेले. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतरही काहीसे दुखावल्या गेलेल्या मुंडे यांना पक्षाने लोकसभेतील भाजपचे उपनेते हे पद दिले. महाराष्ट्राची विधानसभा आपल्या आक्रमक भाषणांनी गाजविणारे मुंडे विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, भाजपचे पक्षनेते म्हणून सतत उजवे ठरले. कार्यकर्त्यांमधला नेता ही त्यांची जमेची बाजू आहे. राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना मुंडे यांनी सहकारक्षेत्रातही लक्ष दिले. बीड जिल्ह्यात यशस्वी साखर कारखाना चालविला. भाजपला खऱ्या अर्थाने बहुजन चेहरा देणारा राज्यातील हा चतुरस्र नेता राज्याच्या जडणघडणीला पैलू देणारा ठरला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.