Home » मानलं भाऊ! एकेकाळी भजी विकली, पेट्रोल पंपावर काम केले पण धीरूभाईंनी शेवटी यशस्वी उद्योगपती होऊनच दाखवलं.

मानलं भाऊ! एकेकाळी भजी विकली, पेट्रोल पंपावर काम केले पण धीरूभाईंनी शेवटी यशस्वी उद्योगपती होऊनच दाखवलं.

by Correspondent
0 comment
Dhirubhai Ambani | K Facts
Share

आज प्रत्येकालाच आपण श्रीमंत असावे, आपल्याकडे भरपूर पैसे असावे असे वाटत असते. गाडी, बंगला, सोने, नाणे, जमीन या सर्व बाबतीत आपणही वैभवशाली असावे असे प्रत्येकाला वाटते. मग यासाठी अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा मार्ग निवडतात.

पण जे मोठी स्वप्न बघून आपल्या दैनंदिन जीवनाचे योग्य व्यवस्थापन करतात आणि अचूक ध्येय ठेऊन कामाचे नियोजन करतात तेच लोकं पुढे यशस्वी होतात.

आज आपण भारतातील अशाच एका ध्येयवेड्या श्रीमंत व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी वेळप्रसंगी यात्रेत भजी विकली, पेट्रोल पंपावर काम केले. पण शेवटी स्वतःच्या हिंम्मतीवर व्यवसायात यशस्वी होऊन देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला.

ही व्यक्ती म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्रात मोठे नाव असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा धीरूभाई अंबानी. आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त भजी विक्रेता ते यशस्वी व्यावसायिक असा त्यांच्या जीवनाचा प्रवास सांगणारा हा खास लेख.

 Dhirubhai Ambani
Dhirubhai Ambani

धिरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. तसेच त्यांचा जन्म दि. २८ डिसेंबर १९३२ मध्ये जुनागढ येथे झाला. हे तेच जुनागढ जे भारतात आणि पाकिस्तानात दोन्हीकडेही रहायला उत्सुक नव्हते. धिरूभाई तिथेच लहानाचे कळते झाले. त्यांचे वडील एक शिक्षक होते तर आई एक सामान्य गृहिणी होती.

त्यांचे प्राथमिक शिक्षण चोरवाड येथे झाले. पुढे त्यांनी जुनागढ येथूनही शिक्षण घेतले. पण ते शाळेत कधीच हुशार नव्हते. त्यांचा संपूर्ण कल व्यवसायाकडे होता.

घरची परिस्थिती हालाकीची असल्याने आणि लहानपणापासून अंगात व्यावसायिक कला असल्याने त्यांनी समोर येईल ते काम केले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी वयाच्या अवघ्या १२-१३व्या वर्षी व्यवसायात पदार्पण केले होते.

जुनागढ जिल्ह्यातील गिरनार या पवित्र स्थानाची लोक दरवर्षी यात्रा करीत असे, यावेळी यात्रेतील व्यवसायाची संधी शोधून या यात्रेत धीरूभाईंनी भजी विकायला सुरुवात केली होती.

पुढे त्यांनी आपले बंधू रमणिकलाल व आजून एक मित्र यांच्या मदतीने १९४८ मध्ये एडनला जाण्याचा निर्णय घेतला. एडनला गेल्यानंतर सुरुवातीला धीरूभाईंनी पेट्रोल पंपावर काम केले. पुढे ते व्यापार व आयात निर्यात क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या ए. बीज अँड कंपनी साठी कारकून म्हणून काम करू लागले.

पुढे ते आपल्या मायदेशी परतले व त्यांनी १९५५ मध्ये कोकिलाबेन यांच्याशी विवाह केला. याच दरम्यान धिरूभाई मुंबईत आले. येथे त्यांचे चुलत भाऊ चंपकलाल दमाणी यांच्यासोबत ते येमेनमधून पॉलीस्टर धागा आयात करू लागले व भारताचा माल अरब देशात पाठवू लागले.

यामध्ये त्यांनी मसाले, हळद, कापड अरबांना एक्स्पोर्ट केला. एका शेखला दुबईत गुलाबाचा मळा फुलवायचा होता. या मळ्यासाठी लागणारी माती धीरूभाई एक्स्पोर्ट करत असे. या व्यवसायाला त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन असे नाव दिले होते.

पुढे १९६६ मध्ये रिलायन्स टेक्सटाईल प्रा. लि. या नावाने धीरूभाईंनी नरोदा, अहमदाबाद येथे सिन्थेटिक फेब्रिकची निर्मिती सुरु केली. १९७५ मध्ये याचाच विस्तार होऊन त्यांनी ‘विमल’ या ब्रँडच्या नावाने कापड व्यवसायात जम बसवला.

यानंतर मात्र धीरूभाईंनी कधी मागे बघितलेच नाही. त्यांनी १९७७ साली आपला पहिला आयपीओ बाजारात आणला. याच दरम्यान धीरूभाईंचा व्यवसाय गरुड भरारी घेत होता. म्हणून त्यांनी १९८५ मध्ये व्यवसायाचे नामकरण रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (Reliance Industries) असे केले होते.

१९९१-९२ मध्ये धीरूभाईंचा हझिरा इथे पेट्रोकेमिकलचा पहिला कारखाना सुरु झाला होता. तर १९९५ -९६ मध्ये धीरूभाईंनी आपल्या व्यवसायाला टेलिकॉम क्षेत्रात उतरवून अधिक मोठे केले होते.

Ambani Family
Ambani Family

१९९९ मध्ये तर धीरूभाई अंबानींनी जामनगर येथे जगातला सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कार्यान्वित केला होता. आणि २००२ मधील कृष्णा-गोदावरी खोऱ्यात गॅसचा लावलेला शोध हा भारतातील खाजगी कंपनीने लावलेला पहिला शोध होता.

पण यासर्वात धीरूभाई अंबानी काळानुसार बदलत गेले होते. त्यांनी समाजाला नक्की कशाची गरज आहे, हे ओळखलं होत. तसेच त्यांनी रसायन, टेलिकॉम, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, रिटेल, दळणवळण, पेट्रोकेमिकल अशा अनेक क्षेत्रातून आपला व्यवसाय वाढवला होता. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले होते.

धीरूभाई अंबानींना मिळालेले महत्वाचे तीन पुरस्कार

१) मैन ऑफ द २० सेंचुरी
२) डीन मैडल और कॉर्पोरेट एक्सीलेंसचा जीवनगौरव पुरस्कार
३) पदमविभूषण (मरणोत्तर)

यांसह अनेक मोठ्या पुरस्काराने धीरूभाई अंबानींना गौरवण्यात आले आहे.

धीरूभाईंचा मृत्यू दि. ६ जुलै २००२ मध्ये झाला. आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त टीम क फॅक्टस तर्फे विनम्र अभिवादन…!

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.