Home » दाजीकाका आणि पीएनजी ज्वेलर्स

दाजीकाका आणि पीएनजी ज्वेलर्स

by Correspondent
1 comment
Pngjewellers | K Fracts
Share

‘पु. ना. गाडगीळ’ किंवा ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ ही नावे आपण ऐकलीच असतील! नव्हे, पाहिलीच असतील. तुमच्या शहरात देखील यांचं एखादं दुकान असेलच! बरोबर, ते नाक्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेलं ज्वेलर्सचं दुकान यांचंच. १८३२ पासूनची परंपरा, ही त्यांची टॅग लाईन. पण १८३२ ची ही सुरुवात नेमकी कशी होती? त्यानंतर पीएनजीचे प्रस्थ कसे काय वाढले? चला तर, जाणून घेऊया या उद्योजक घराण्याबद्दल.

१८१० ते १८२० या दशकात कोकणातील मालवण तालुक्यातील लहानशा गावातून ‘नारायणराव वासुदेव गाडगीळ’ हे मेहनती व्यक्तिमत्त्व व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात आले. त्यांनी घेतलेले अपार कष्ट त्यांचे कुटुंब पाहत होते. २८ नोव्हेंबर, १८३२ रोजी सांगली येथे नारायणराव यांचे चिरंजीव गणेश नारायण गाडगीळ यांनी वडिलांच्या अनुभवातून स्वतःचे छोटेखानी ज्वेलर्स सुरू केले. दुकानाचे नाव होते ‘गणेश नारायण गाडगीळ ज्वेलर्स’. हळूहळू गाडगीळ घराणे सोनाराच्या व्यवसायात जम बसवू लागले, अनुभवातून धडे घेऊ लागले.

गणेश गाडगीळ यांची तीन मुले. पहिले रामचंद्र गाडगीळ. सोनाराच्या व्यवसायात फारसा रस नसल्याने त्यांनी तुपाचा व्यवसाय सुरू केला. दुसरे गोपाळ गाडगीळ. यांनीही स्वतःचा कापडाचा व्यवसाय सुरू केला. मात्र पुत्र नारायण गाडगीळ (यांना बाळनाना असे म्हटले जाई) यांनी १८६० मध्ये ज्वेलर्सचा कारभार आपल्या हाती घेतला आणि गाडगीळ घराण्याचा वारसा सुरू ठेवला.

१८८० ते १९२० या चाळीस वर्षांच्या कालावधीत बाळनानांच्या (तीन मुले आणि दोन कन्यांपैकी) तिन्ही मुलांनी एकत्र काम करत गाडगीळ ज्वेलर्सचा कारभार सांभाळला. या तीन मुलांची नावे होती पुरुषोत्तम (आबा), गणेशपंत (दादा) आणि वासुदेव (बापुकाका). पुरुषोत्तम नारायण गाडगीळ या ज्येष्ठ भावाच्या म्हणजेच आबांच्या नावावरून ज्वेलर्सचं नामकरण झालं. यातील मधल्या मुलाला म्हणजेच गणेशपंत यांना तीन मुलं. त्यांच्या पहिल्या मुलाने म्हणजेच शंकररावांनी आणि दुसऱ्या मुलाने म्हणजेच अनंत गाडगीळ (दाजीकाका) यांनी पीएनजीची धुरा आपल्या हाती घेतली!

बापरे! किती ही गुंतागुंत, असं तुम्ही म्हणत असाल.. पण ‘पीएनजी’चे नाव कानाकोपऱ्यात पोहोचणारी खरी गम्मत तर पुढे आहे.

पीएनजी ज्वेलर्स

अनंत गाडगीळ म्हणजेच दाजीकाका यांनी सांगलीचा व्यवसाय पुण्यात नेऊन विस्तारला. सांगलीपुरता मर्यादित असणाऱ्या या व्यवसायाला नवी दिशा मिळाली. ‘मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने सराफी व जव्हेरी दुकानाची मुहूर्तमेढ रोवली. १९५८ साली पुण्यातील रविवार पेठेत ‘पीएनजी ज्वेलर्स’ उघडले. ‘आमची कुठेही शाखा नाही’, असे ठणकावून सांगणारे पीएनजी ज्वेलर्स पुण्यात झपाट्याने वाढत गेले. कालांतराने पुण्यासह भारतात देखील अनेक दुकाने उघडली. सगळा आनंदी आनंद! भारतात स्थिरस्थावर झाल्यावर तर हा ब्रँड परदेशातही पोहोचला.. अमेरिका आणि दुबईत असणाऱ्या भारतीय ग्राहकांच्या दागिन्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे काम पीएनजी आनंदाने करीत आहे. आज अमेरिकेत त्यांची ३ शोरूम्स आहेत. ‘जिथे ग्राहक आहेत, तिथे पीएनजी आहे’ यानुसार पीएनजी फक्त शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणीच नाही, तर इतरत्रही विस्तारत आहे.

‘पीएनजी’हा ब्रँड फक्त ज्वेलर्स पुरताच मर्यादित नाही, तर हॉटेल, डेव्हलपमेंट, डायमंड आणि शिक्षण क्षेत्रातही तो सक्रिय आहे. ‘पीएनजी’ च्या छताखाली गाडगीळ हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, गाडगीळ डायमंड्स आणि सीमलेस एज्युकेशन अकॅडमी हे ब्रँड दिमाखात उभे आहेत.

२०१७ मध्ये पीएनजी ज्वेलर्सचे दोन भाग पडले. ‘गोविंद गाडगीळ आणि रेणू गाडगीळ’ यांनी मिळून ‘पीएनजी अँड सन्स’ हा नवा ब्रँड सुरू केला. अगदी काही वर्षात त्यांचा व्यवसाय कोल्हापूर, विश्रामबाग, चिपळूण, रत्नागिरी, कराड आणि बेळगाव अशा विविध ठिकाणी पोहोचला. गेल्याच वर्षी डोंबिवली येथे आणि त्याच्या आदल्या वर्षी बदलापूर, शिर्डी, वर्धा, जळगाव याठिकाणी त्यांनी शोरूम उघडले. आज ३ राज्यांत एकूण २९ शोरुम असलेला हा ब्रँड!

तर असं आहे हे उद्योजक घराणं. या घराण्याची १८३२ पासूनची गुणवत्ता, शुद्धता आणि वैविध्यता आजही टिकून आहे. पारंपारिक डिझाईन्स, त्यांची पारंपरिकरीत्या घडणावळ आणि एकनिष्ठ ग्राहकवर्ग हे यांचे विशेष. ‘पीएनजी ज्वेलर्स’ चे मालक दाजीकाका गाडगीळ यांचा वडिलोपार्जित व्यवसाय पुढील पिढ्या सांभाळत आहेत. दाजीकाकांची ‘परंपरागत मूल्ये’ आजही शाबूत आहेत. हा वारसा असाच चालत राहो आणि पीएनजी ब्रँडची भरभराट होवो!

– सोनल सुर्वे


Share

Related Articles

1 comment

Sandesh Mundhekar September 11, 2020 - 2:49 pm

लेख खूप बारकाईने लिहिला आहे.धन्यवाद !

Reply

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.