डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये कोरोना नावाच्या नवीन आजाराचा रुग्ण आढळला. या आजाराचं लक्षण सामान्य होतं, ताप, खोकला आणि क्वचित प्रसंगी धाप लागणे. पण सोबत रुग्णाला घसा खवखवणे आणि गंध कमी होणे ही लक्षणे होती. सुरुवातीला साधारण वाटणा-या या आजाराचे भीषण रुप लवकरच समोर आले. कोरोना हा साधारण आजार नव्हता तर एका महामारीला घेऊन येणारा आणि सर्वदूर पसरणारा रोग होता. बघता बघता या रोगानं हातपाय पसरले.अवघ्या जगाला आपल्या विळख्यात अडकवले.लाखो लोकांचा कोरोनाच्या महामारीमध्ये मृत्यू झाला. जवळपास दोन वर्ष या कोरोनाच्या महामारीनंतर आता कुठेसं जग सावरु लागलंय.कोरोनानं फक्त आरोग्यावरच घाव घातला असे नाही तर त्यानं सर्व जगाची आर्थिक घडीही विस्कटली. या सर्वातून आता कुठे बाहेर पडायला सुरुवात झाली असतानाच पुन्हा एकदा चीनमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येन धडकी भरली आहे. गेल्या आठवड्यात चीनमध्ये जवळपास सर्व प्रांतात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये वाढलेल्या या कोरोना रुग्णांमुळे जगभरात पुन्हा धोक्याची घंटी वाजली आहे.
चीनमध्ये कोविड रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत 49 शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. जवळपास 412 दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत. एकाच दिवसात चीनमध्ये दोन वर्षानंतर पहिल्यांदाच 31,454 नवीन रुग्ण आढळले. कोरोना कालावधीतील हा उच्चांक मानला गेलाय. यापूर्वी एप्रिलमध्ये सर्वाधिक २८ हजार रुग्ण आढळले होते. चीनमधील नॅशनल हेल्थ ब्युरोच्या आकडेवारीनुसार चीनमधील सरासरी कोरोना रुग्णांची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. यामुळे चिनी प्रशासनाने झेंगझोऊ आणि त्याच्या आसपासच्या 8 जिल्ह्यांमधील 6.6 दशलक्ष नागरिकांवर लॉकडाऊनचे बंधन टाकले आहे. मात्र यापूर्वीही या भागातील 2 लाख लोकसंख्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहे. त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही, ही चितांजनक परिस्थिती आहे.
लॉकडाऊन जिथे जाहीर झाले आहे, त्या क्षेत्रात आयफोन सिटीचाही समावेश आहे. येथे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमकही झाली. अॅपल कर्मचार्यांशिवाय जवळपासच्या इतर कारखान्यांमध्येही लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनानं हे आंदोलन दडपून कोरोनाला अटकाव आणण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सांगितले आहे. नागरिकांचा वाढता विरोध बघून या संपूर्ण भागात कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत आणि स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी मिळेपर्यंत लोकांना त्यांचा परिसर सोडता येणार नाही, असेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील लाखो लोक त्यांच्या घरात बंद झाले आहेत.
बीजिंग ते चोंगकिंग आणि ग्वांगझू या प्रमुख शहरांमध्येही कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. जवळपास दोन वर्षानंतर पुन्हा चिनमध्ये काही भागात तात्पुरती रुग्णालये बांधण्यावर भर दिला जात आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्यानं त्याचा परिणाम व्यवसायावरही पडला आहे. मोठ्याप्रमाणात लॉकडाऊन जाहीर झाल्यानं व्यवसायावर पुन्हा मंदिचे सावट आले आहे. मुख्य व्यापारी शहर म्हणून ओळखल्या जाणा-या शांघायमध्येही लॉकडाऊनमुळे उद्यागामध्ये पुन्हा मंदिचे वारे येतील अशी भीती व्यक्त होत आहे. येथील शिनजियांग आणि तिबेटमध्ये अनेक महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. तेथील उद्योगव्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे.
========
हे देखील वाचा : सौदी अरेबियात व्यक्तीचे शीर तलवारीने कापून दिली जाते मृत्यूची शिक्षा
=======
मात्र ही मंदिची शक्यता दूर ठेवत चिनमधील सरकारनं लॉकडाऊनचे कडक नियम लादले आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यानंतर या भागात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात कोरोना बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळेच चीनमध्ये राजधानीत सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी 48 तास आधी निगेटिव्ह पीसीआर कोविड चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता नागरिकांना शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, सरकारी कार्यालयात जाण्यासाठी कोविड रिपोर्ट दाखवावा लागेल. यासोबतच नागरिकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चीनचे सर्वात व्यस्त शहर असलेल्या बीजिंगमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. हा धोका पाहता चीन सरकारने बीजिंगमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद केल्या आहेत. शासनाने शाळांना ऑनलाईन अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.
चीनच्या चाओयांग प्रांतातही वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पुन्हा एकदा चीनमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये पर्यटन स्थळे, जिम आणि पार्क बंद करण्यात आले आहेत. मैफिलीसारखे मोठे कार्यक्रमही रद्द करण्यात आले. जेणेकरुन नागरिक एकत्र येणार नाहीत. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या रुग्णांनी पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनाही सतर्क झाली आहे. जगभरात आता कुठे सर्व सुरळीत सुरु झाले असताना हा धोका पुन्हा एकदा जाणवू लागल्यानं जगभरात धाकधूक वाढली आहे.
सई बने