Home » चाफा बोलेना, चाफा चालेना असं कवी म्हणतात… पण हा चाफा तर चक्क बोलतोय!!!

चाफा बोलेना, चाफा चालेना असं कवी म्हणतात… पण हा चाफा तर चक्क बोलतोय!!!

by Correspondent
1 comment
Share

देवकुसुम चाफा

तसं तर त्या चाफ्याला त्या मोकळ्या अंगणात रुजून खूप वर्षं झाली. दोन-तीन पुरुष उंचीचा तो हिरवागार चाफा टुमदार घरापलीकडून चौफेर टुकूर टुकूर करत टुकटुकत राहायचा. ठाकुरांच्या त्या घरातल्या कित्येक सुखदुःखाच्या क्षणांमध्ये तो न्हाऊन निघाला.

कोलकत्याजवळील बोलपुरमध्ये मोठ्या ठाकुरांनी सुरू केलेल्या या लहानशा  शांतिनिकेतन आश्रमाला आता आकार येऊ लागला. अनेक बीजं रुजू लागली. त्या हिरव्यागर्द दुलईतल्या गोल छपराच्या घरात माणसांचा राबताही तसाच वाढता झाला.

अचानक एक दिवस चाफ्याला जाणवलं की, आपल्या पानांना, फांद्यांना बाळलेणी लगडली आहेत. चक्क ‘अक्षरांची बाळलेणी’.
चाफा जरा गोंधळला… ‘हे कोण चढतंय आपल्या अंगाखांद्यावर? कुणीतरी इवल्या पावलांचं, अवखळ, खेळकर… घुंगुरवाळे वाजवत. आपल्या पांढ-याशुभ्र पाकळ्यांच्या फुलामध्ये कोण लपून बसलंय.’ तो विचारांत पडला.

अल्लड हसण्याच्या आवाजाने चाफ्याला गुदगुल्या झाल्या. हसणं किती लाघवी असावं? त्या हसण्यामागोमाग आले लडिवाळ शब्द.. शब्दांनीही किती गोड असावं?

समज, मी झालो एक चाफ्याचं फूल,
फुललो गमतीने
त्या झाडाच्या उंच फांदीवर
हासत राहिलो वा-यावर
आणि नाचत राहिलो नव्या पानांवर
तर आई, तू मला ओळखशील का?
‘बाळ कुठे आहेस तू?’ तू हाक मारशील.

मी उत्तर देणार नाही काहीच
हासत बसेन फक्त स्वतःशीच,
मी हळूच उघडीन माझ्या पाकळ्या
आणि बघत राहीन तुझ्याकडे
तू काम करत असताना.

रवीन्द्रनाथांच्या शांतिनिकेतनमधील जुन्या घराचा भाग, समोरील चाफा

हळूहळू त्या चाफ्याच्या लक्षात आलं की, आपल्या फुलांच्या सुगंधात अनेक मोहक गंध मिसळले गेले आहेत. अंगणातल्या गायीचा, तिच्या दुधाचा, दुधावरच्या सायीचा, स्वयंपाकघरातल्या रवरवत्या भाताच्या पेजेचा, तिन्हीसांजेच्या तेलवातीचा, घरातल्या मायेचा या सगळ्या गंधांनी घडत गेली कविता.

दुपारच्या जेवणानंतर
खिडकीजवळ बसून तू रामायण वाचशील,
पडेल या झाडाची छाया
तुझ्या केसांवर नि मांडीवर,
तेव्हा मीही टाकीन माझी चिमुकली सावली
तुझ्या हातातील पुस्तकाच्या वाचत्या पानावर,
पण तुला कळणारच नाही
की ही सावली तुझ्या
छोट्या बाळाची आहे.

संध्याकाळ उलटल्यावर हातात दिवा घेऊन
तू गायींच्या गोठ्यात जायला निघशील
तेव्हा मी एकदम जमिनीवर उडी घेईन
आणि पुन्हा होऊन तुझा चिमुकला बाळ
तुला म्हणेन, ‘ आई, मला गोष्ट सांग’
तू विचारशील, ‘ लबाडा, कुठे गेला होतास इतका वेळ?’
मी म्हणेन, ‘मी तुला सांगणारच नाही.’

शांतिनिकेतन (कोलकता)

शांतिनिकेतन (कोलकता)

प्रत्येक पानाला, फुलाला, फांदीला अगदी जमिनीत खोलवर रुजलेल्या मुळांनाही गंधित करणा-या  निरंजनी अक्षरांच्या अशा अनेक कविता. तो चाफा  बिनमोसमाचा अधिकच बहरून आला.

एका झाडाने कविता होणं नि एका कवितेने झाड होणं… हे तेव्हाच घडतं, जेव्हा ते घडवून आणणारा ‘भावकवी रवीन्द्र’ स्वतःच एक ‘झाड’ होऊन ‘कविता’ लिहितो.
आजही तो चाफा तसाच उभा आहे … तशाच भारलेल्या अवस्थेत. त्या जगप्रसिद्ध ‘शांतिनिकेतन’च्या आवारात.

असाच एक चाफा अनेक वेळा भेटतो…

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने रेल्वेचा प्रवास करताना, चिंचपोकळी स्थानकात ट्रेन थांबली की, समोरचं दृश्य लक्ष वेधून घेतं. विशेषतः उन्हाळ्याच्या काहिलीत.

भोवताली पसरलेल्या कबरस्तानात मधोमध उभा असलेला, पर्णहीन पण शुभ्र फुलांनी डवरलेला, आपल्याच तंद्रीत हरवलेला ‘चाफा’. जेव्हा जेव्हा हे दृश्य दिसतं, तेव्हा तेव्हा वाटतं, शब्दांच्या कुंचल्यानं रेखाटावं याचं शब्दचित्र. कॅनव्हासवर रंगरेषांमध्ये बद्ध करावं ह्या  ‘श्वेतांबरा’ला.

परवा सहज याचं इंग्लीश नाव वाचनात आलं … ’टेंपल ट्री’. इंग्लीश असूनही ते मनाला खूप भावलं. खरंच ‘देवळातलं झाड’ की, ‘देवळाचं झाड’? कोकणात आणि दक्षिण भारतातही लहानथोर सगळ्याच देवळांतील पूजेची परंपरागत घराणेशाही मिळवल्याच्या थाटात  देवळांच्या अंगणात याचा ‘वास’ असतो. काळ्याशार, काहीशा गूढ वाटणार्‍या मूर्तींवर ही शुभ्रदळांची, मध्यभागी मांगल्यसूचक पिवळसर गाभा असणारी, मंद सुवासाची फुलं विराजमान झालेली पाहणं हा एकल मनाकरता जणू उत्सव असतो.

चिंचपोकळी स्थानकाजवळच्या कबरस्तानातील तो ‘वेडा पीर’ पाहत मी मनातच पुनरुच्चार केला… ‘टेंपल ट्री ‘ ..
खरं तर मृतदेहांच्या चिरनिद्रेचं ते स्थान. देवालयाइतकंच प्रगाढ शांतता बहाल करणारं.
माणसाचा ‘मी’पणा नष्ट करणारं.
म्हणूनच देवळाइतकंच पवित्र वाटतं. त्या शुचिर्भूत ठिकाणीही हा ‘श्वेतांबर’ उन्हापावसात उभा. त्या कबरींखाली गाडल्या गेलेल्या, माती झालेल्या अस्तित्वांची शुभ्र रूपं आपल्याच अंगाखांद्यावर ल्यायलेला. कायमच प्रेमात पाडणारा….. विरागी.

मनात येतं,
चाफा बोलेना, चाफा चालेना असं थोर कवी लिहून गेले.
पण… या देवकुसुम चाफ्यानं मात्र किती अक्षर-संवाद बहरून आणले.

संदर्भ —

रवीन्द्रनाथ टागोरांची ‘चाफा’ कविता — मराठी अनुवाद — कुसुमाग्रज.

– © डॉ. निर्मोही फडके.


Share

Related Articles

1 comment

Madhuri Gharpure July 21, 2020 - 7:06 am

आहा! शांती निकेतन मधल्या चाफ्या ला न भेटता घडले त्याचे दर्शन, ऐकले हितगुज तुझ्या सोबतचे, जाणवले की तुझ्यातल्या कवी,लेखिकेला या सगळ्यांची भाषा वाचता येत असल्याने, चाफा मूक राहू शकेल काय?
एक पर्वणी असते तुझे लेख वाचणे, तुझ्या विचारधारेत अलगद तरल होत होत वाहून जाते मी.👌👌👌

Reply

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.