Home » बापरे! भविष्यात बुलेट ट्रेनने होणार चंद्राची सफर

बापरे! भविष्यात बुलेट ट्रेनने होणार चंद्राची सफर

by Team Gajawaja
0 comment
Bullet Train To The Moon
Share

झुकझुकगाडी म्हणजेच आपली ट्रेन….या ट्रेननं कुठेही जायचं म्हणजे धम्माल मस्ती असते…धुरांच्या रेषा हवेत सोडत मामाच्या गावाला नेणारी ही झुकझुक गाडी आता चंदामामाच्या गावालाही घेऊन जाणार आहे. चंदामामा म्हणजेच चांदोबा, चंद्र. जपानच्या एका विद्यापिठामध्ये चंद्रावर जाण्यासाठी ट्रेनच्या पर्यायावर संशोधन सुरू आहे. बुलेट ट्रेनच्या या देशामधलं हे चंद्रावर जाण्याचं संशोधन यशस्वी झालं तर अगदी तिकीट काढून कोणीही चंद्रावर प्रवास करू शकणार आहे.(Bullet Train To The Moon)

जपान देश सुपरफास्ट ट्रेन आणि बुलेट ट्रेनसाठी ओळखला जातो. तंत्रज्ञानात जगात अव्वल असलेल्या जपानमध्ये आता चक्क चंद्रावरच्या ट्रेन मोहीमेची तयारी सुरू झाली आहे. फक्त चंद्रच नाही तर मंगळग्रहावरही ट्रेनने जाण्याचा हा मास्टर प्लॅन जपान तयार करीत आहे. पृथ्वी-चंद्र-मंगळ अशी चालणारी ही इंटरप्लॅनेटरी ट्रेन म्हणून ओळखण्यात येणार आहे. जपानच्या क्योटो विद्यापीठाच्या संशोधकांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. विद्यापीठाने या इंटरप्लॅनेटरी प्रोजेक्टसाठी काजिमा कन्स्ट्रक्शन कंपनीबरोबर करार केला आहे. यात इंटरप्लॅनेटरी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम तयार करण्यावरही काम करण्यात येईल. या गाडीला Hextrack म्हटले जाईल. हे वाहन लांबचा प्रवास करताना पृथ्वीच्या पृष्ठभागाप्रमाणे गुरुत्वाकर्षण निर्माण करेल. काचेची षटकोनी आकाराची ही गाडी असेल. षटकोनी आकाराच्या या काचेच्या डब्याची उंची सुमारे 1300 फूट असेल आणि रुंदी 328 फूट असेल. याशिवाय चंद्रावर जाणाऱ्या या गाड्यांमध्ये षटकोनी आकाराचे हेक्सा कॅप्सूल नावाचे कॅप्सूल आणि मध्यभागी एक हलणारे उपकरण देखील असेल. असे दोन प्रकारचे कॅप्सूल तयार केले जातील, एक पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यासाठी आणि दुसरे पृथ्वीवरून मंगळावर जाण्यासाठी.(Bullet Train To The Moon)

जपानमध्ये ट्रेनचा वेग हा वाऱ्यालाही भेद देईल असाच असतो. याचा पुढचा टप्पा म्हणून या इंटरप्लॅनेटरी ट्रेनवर काम करण्यात येणार आहे. विशिष्ट अशा काचेपासून तयार केलेल्या या डब्यात पृथ्वीसारखे वातावरण आणि गुरुत्वाकर्षण शक्ती असेल. त्यामुळे अंतराळात राहणे सोपे होणार आहे. विद्यापीठाच्या योजनेअंतर्गत, काचेच्या आणि आंतर-ग्रहांच्या गाड्यां प्रत्यक्षात येण्यासाठी 30 वर्षे लागतील, मात्र एकदा या गाड्या तयार झाल्या की, चंद्रासोबत मंगळावरही जाता येणे शक्य असणार आहे.

====

हे देखील वाचा – केवळ ३ लोकांच्या लोकसंख्येने बनलाय ‘हा’ देश

====

हे देखील वाचाकाचेच्या या विशिष्ट डब्यामध्ये कृत्रिम गुरुत्वाकर्षणाबरोबर झाडे, पाणी आणि जेवण्याचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. पृथ्वीवरील सर्व सुविधा अवकाशात निर्माण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला चंद्रावरील लुनाग्लास आणि मंगळावरील मार्सग्लास असे नाव देण्यात आले आहे. ह्युमन स्पेस सायन्स सेंटरच्या मते, पृथ्वी स्टेशनला टेरा स्टेशन म्हटले जाईल. हा सर्व प्रकल्प स्वप्नवत वाटत आहे. आता याची कल्पना मांडण्यात आली आहे. आणि अत्यंत प्राथमिक स्वरुपात काम सुरू झाले आहे. ही योजना अस्तित्वात येण्यासाठी कमीतकमी 30 वर्षे लागणार आहेत. किंवा त्यापेक्षाही अधिक काळ लागू शकतो. अर्थात आपल्याला ही ट्रेन पृथ्वीवरील कोणत्याही गावाला घेऊन जाणार नाही, तर ती थेट आपल्याला चंद्रावर आणि नंतर मंगळावर घेऊन जाणार आहे.(Bullet Train To The Moon)

आता जरी या योजनेची खिल्ली उडवण्यात येत असली तरी विज्ञानात कशालाही नाही बोलत नाहीत. आणि काहीही अशक्यप्राय मानण्यात येत नाही. एकेकाळी ट्रेन चालू झाली तेव्हाही त्याला जादू म्हटले गेले होते. आताही ट्रेन थेट चंद्रावर गेली तर ती जादूच असेल…आणि त्या जादूचा अनुभव घेण्यासाठी लाखो लोकं रांगेत उभे राहणार आहेत. कारण या योजनेवर ज्या विद्यापिठात संशोधन सुरू आहे, ते तंत्रज्ञानातासाठी अतिशय प्रगत असे विद्यापीठ आहे. जपानमधील क्योटो विद्यापीठ हे 2019 सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले 35व्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 1897 साली करण्यात आली. क्योटो विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. क्योटो विद्यापीठामध्ये तीन हजार संशोधक आपले संशोधनाचे कार्य करीत आहेत. जगभरात या विद्यापीठातील संशोधकांचा दबदबा आहे, त्यामुळे येथे शिकण्यासाठी अन्य देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. 110 देशांमधून विद्यार्थी या विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी येतात.(Bullet Train To The Moon)

आता अशा प्रख्यात विद्यापीठात चंद्रावर जाण्याच्या मोहीमेची आखणी आणि संशोधन चालू असल्यावर ते नक्की यशस्वी होईल असा विश्वास ठेवून त्यावर आत्तापासूनच गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांमध्ये उत्सुकता आहे.(Bullet Train To The Moon)

  • सई बने

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.