Home » ‘सरदार’ ऑफ स्पिन – नाबाद  ७५

‘सरदार’ ऑफ स्पिन – नाबाद  ७५

by Correspondent
0 comment
Bishan Singh Bedi | K Facts
Share

नुकताच एक व्हिडीओ पाहण्यात आला. हा व्हिडीओ होता भारताच्या एका अलौकिक क्रिकेटरने दुसऱ्या एका भारतीय क्रिकेटच्या सरदाराला दिलेल्या मानवंदनेचा. निमित्त होते ‘सरदार’च्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे. तुम्ही ओळखले असेल की तो अलौकिक खेळाडू होता कपिल देव तर उत्सवमूर्ती होता सरदार बिशनसिंग बेदी.

२५ सप्टेंबरला बेदीचा (Bishan Singh Bedi) ७५वा वाढदिवस साजरा झाला. १९६०च्या दशकाचा मध्य ते १९७० चे संपूर्ण दशक गाजवणाऱ्या प्रसन्न, चंद्रशेखर, वेंकट राघवन, बेदी या भारताच्या फिरकी चौकडीतील ‘राजा माणूस’. छोटीशी  लयबद्ध धाव आणि डाव्या हाताने आरामात चेंडू टाकण्याच्या शैलीने भल्या भल्या फलंदाजांची निंद हराम करणारा फिरकीचा एक अवलिया जादूगार.

या जादूगाराचे भारतीय कसोटी क्रिकेटच्या रंगमंचावर पदार्पण झाले ते ३१ डिसेंबर १९६६या दिवशी कलकत्ता येथे गॅरी सोबर्सच्या बलाढ्य विंडीज संघाविरुद्ध. कसोटी पदार्पणाच्या हिशोबाने पाहिल्यास फिरकी चौकडीतील हे शेंडेफळ होते पण कामगिरीने तो या चौकडीतील ‘दादा माणूस’ होता.

Bishan Singh Bedi
Bishan Singh Bedi

बेदीने आपल्या ६७ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत २६३ विकेट्स मिळवल्या त्या आपल्या जादुई फिरकीचे जाळे पसरून. १४ वेळा त्याने एका डावात पाच वा अधिक बळी घेतले तर १३ वेळा एका डावात चार विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने भारताव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड या सर्व देशात यश मिळवले.

देशांतर्गत स्पर्धेत सुद्धा दिल्ली आणि उत्तर विभागाचे नेतृत्व करताना त्याने सर्वप्रथम रणजी तसेच दुलीप ट्रॉफी जिंकून दिली.

त्याने एकाच सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला तो ऑस्ट्रेलियात १९७७-७८ च्या पर्थ कसोटीत. पर्थची खेळपट्टी ही त्या काळात जगातली सर्वात वेगवान समजली जात असे आणि या ठिकाणी एका फिरकी गोलंदाजाने एवढे यश मिळवणे ही स्पृहणीय कामगिरी होती.

बेदी चेंडूला उंची द्यावयाचा आणि त्यातच फलंदाज फसायचे. तो चेंडू आत तसेच बाहेर वळवण्यात वाकबगार होता. त्याचा आर्म्ड चेंडू फार खतरनाक असायचा. मला १९७४च्या इंग्लंड दौऱ्यात ओल्ड ट्राफोर्डला माईक दिनेसला त्याने कसा बकरा केला ते अजूनही आठवते.

आदल्या चेंडूला माइकने बॅक फूट पंच मारून चौकार मिळवला होता. पुढचा चेंडू बेदीने तसाच टाकला पण चेंडूच्या गतीत सूक्ष्म बदल केला त्यात माईक फसला आणि त्रिफळाचित झाला.

बेदी अत्यंत बुद्धिमान गोलंदाज होता. त्याच्या गोलंदाजीवर धावा काढणे सहजसाध्य नव्हते. तो अनेक निर्धाव षटके टाकीत असे त्यामुळे एका षटकामागे त्याने सरासरी फक्त २.१८ धावा दिल्या.

बेदीने एकूण २२ कसोटीत भारताचे नेतृत्व केले. त्यातील ६ सामन्यात भारताला विजय मिळाला तर १० सामन्यात भारताचा पराभव झाला. विंडीजमध्ये १९७६ मध्ये त्रिनिदाद कसोटीत भारताने ४०६ धावांचे विजयी लक्ष्य साध्य करून इतिहास रचला तो बेदीच्याच नेतृत्वाखाली.

Bishan Singh Bedi

बेदी निर्भीड कर्णधार होता. १९७६च्याच दौऱ्यात जमेका कसोटीत विंडीजच्या शरीरवेधी गोलंदाजीचा निषेध म्हणून त्याने सहा गडी बाद झाल्यावर डाव घोषित केला तर दुसरा डाव पाच विकेट्स पडल्यावर सोडून दिला कारण उरलेले खेळाडू जखमी होते.

१९७६मध्ये भारतात इंग्लंडच्या जॉन लिव्हरच्या वेगवान स्विंग माऱ्याला तोंड देताना भारतीय फलंदाजी कोसळली होती. बेदीच्या लक्षात आले की लिव्हर चेंडूला व्हॅसलिन लावत होता. त्याने ताबडतोब पंचांकडे आक्षेप नोंदवला.

१९७८चा पाकिस्तान दौरा अतिशय खडतर होता. एका एकदिवसीय सामन्यात भारत विजयाच्या समीप आलेला असताना सर्फराज नवाझने लागोपाठ चार बॉऊन्सर्स टाकले पण पंचानी ते ‘वाईड’दिले नाहीत म्हणून बेदीने निषेध म्हणून सामना सोडून दिला.

फलंदाज म्हणून बेदीची नेहमी एका चेंडूचा धनी अशी चेष्टा होत असे. पण वेळ आली तर तो एक बाजू लावून धरत समोरच्या प्रथितयश फलंदाजाला साथ देत असे. १९६९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली कसोटीत इंजिनियर, मंकड लागोपाठ बाद झाल्यावर ‘नाईट वॉचमन’ म्हणून आलेल्या बेदीने वाडेकरला दोन तास साथ देताना २० धावा काढल्या आणि भारताला विजयपथावर नेण्यास हातभार लावला.

त्याचा कोनोलीने त्रिफळा उडवला तेव्हा वि. वि. करमरकरांनी म्हटले होते की स्वतः त्रिफळाबाद होण्यापूर्वी बेदीने पाहुण्यांच्या नीतिधर्याचा त्रिफळा उडवला होता. बेदीने कसोटीतील आपले एकमेव अर्धशतक (नाबाद ५०) न्यूझीलंडविरुद्ध कानपुर येथे नोंदवले.

बेदी क्षेत्ररक्षक म्हणून फारसा नावाजलेला नव्हता पण १९७६च्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याने जॉन पार्करचा गली मध्ये छान झेल घेतला होता. १९७४ मध्ये मुंबई कसोटीत लॉईडचा जोरदार स्ट्रेट ड्राईव्ह झेलण्याचा प्रयत्न करताना त्याची बोटे मोडली आणि हा झेल सुटल्यावर लॉईडने द्विशतक मारले. त्यावेळी बेदीवर खूप टीका झाली पण दुसरा कोणी गोलंदाज असता तर त्याने मध्ये हात घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला नसता.

Bishan Singh Bedi

बेदी स्पष्टवक्ता असल्याने त्याने बरेच वेळा वाद ओढवून घेतले होते. १९७४ मध्ये शिस्तभंग केला म्हणून त्याला विंडीजविरुद्धच्या बंगलोर कसोटीतून वगळण्यात आले होते. १९९० मध्ये भारतीय संघाचा व्यवस्थापक असताना आपली नाराजी व्यक्त करताना त्याने ‘या संघाला समुद्रात बुडवून टाकले पाहिजे’ असे विधान केले होते.

बेदीने १९६९ मध्ये ऑस्ट्रेलियन ग्लेन माइल्सशी विवाह केला होता. आपल्या पहिल्या मुलाचे नाव त्याने ‘सुनील गवास इंदरसिंग’ असे ठेवले होते. प्रसिद्ध नट अंगद बेदी हा त्याच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. बेदीने काही काळ स्टेट बँकेत नोकरी केली.

त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ बघताना व्हील चेअर वर असहाय्य स्थितीत बसलेल्या बेदीला पाहून फार वाईट वाटले. आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना ‘पॅरलाईज’ करणाऱ्या या महान गोलंदाजावर आलेली ही वेळ पाहून मदन लाल, कीर्ती आझाद वगैरे खेळाडूंना दुःख झाले होते.

त्याच्या ७५तरी निमित्त शुभेच्छा देतानाच त्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करणे एवढेच आपल्या हातात आहे.

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.