Home » रघुवंशीयांची कुलदेवी असलेल्या ‘या’ देवीचे स्थान

रघुवंशीयांची कुलदेवी असलेल्या ‘या’ देवीचे स्थान

by Team Gajawaja
0 comment
Badi Devkali Devi Temple
Share

इश्वाकू कुळाचे संस्थापक, अयोध्येचे प्रथम महाराज आणि भगवान रामाचे पूर्वज महाराज इश्वाकू यांनी  उभारलेल्या माता बडी देवकाली मंदिराला नवरात्रामध्ये फुलांची आणि दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रघुवंशीयांची कुलदेवी असलेल्या या देवीचे स्थान सिद्ध असल्याचे सांगण्यात येते.  भगवान रामाचा जन्म झाल्यानंतर राजमाता कौशल्या, त्यांना प्रथम  देवकाली मातेच्या दर्शनासाठी घेऊन आल्या होत्या.  त्यामुळे या मंदिरात भगवान राम पाळणामध्ये विराजमान आहेत.  तसेच तेव्हापासूनच अयोध्येत बाळ जन्माला आल्यावर प्रथम देवीच्या मंदिरात आणण्याची प्रथाअसल्याचे सांगितले जाते. या ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळी मातेची पूजा करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येतात.  नवरात्रीमध्ये अहोरात्र मंदिरात भाविकांची गर्दी असते.     

अयोध्येच्या पश्चिमेला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर फैजाबाद शहरात देवकाली मातेचे मंदिर आहे. या प्रसिद्ध बडी देवकाली मंदिरात नवरात्रीमध्ये मोठा उत्सव करण्यात येतो. पहिल्या दिवशी देवीची पूजा देवी शैलपुत्रीच्या रुपात विधीपूर्वक पूजा करण्यात येते. या त्रेतायुगीन मंदिरात एकाच खडकात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महा सरस्वती या तीन  देवी भक्तांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत.   

महाकाली सर्व दुःखांपासून आणि शत्रूंपासून रक्षण करते, महा सरस्वती विद्या देते आणि महालक्ष्मी संपत्ती, वैभव देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे मानले जाते की देशभरात मातेची अशी दोनच मंदिरे आहेत जिथे एका खडकात तीन देवी वास करतात. पहिले मंदिर माँ वैष्णो देवी मंदिर आणि दुसरे माँ बडी देवकाली मंदिर अयोध्या.  येथे आईची उपासना केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे भाविक सांगतात.  

रामजन्मभूमीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर हे बडी देवकाली मंदिर आहे. श्रीरामाच्या कुलदेवीचे मंदिर असल्याने श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक आधी देवकाली मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतात. या मंदिरात बाळरुपातील श्रीरामांना बघता येते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या लहानग्या श्रीरामांसाठी पाळणा आणला होता. त्यातच श्रीरामांच्या बाळरुपातील मूर्ती ठेवण्यात आली आहे. हे बाळरुपातील श्रीराम बघण्यासाठीही भक्तांची गर्दी होते.   

महाराज इश्वाकू यांनी स्थापन केलेल्या देवकाली मंदिराची वेळोवेळी पुर्नबांधणी करण्यात आली. महाराज रघु यांनीही मंदिरात सुधारणा केल्या. महाराज रघू देवकालीदेवीचे भक्त होते. ते नित्यनियमानं या मंदिरात देवीच्या पुजेसाठी यायचे, असे स्थानिक सांगतात.

या मंदिराची रचना भक्तांना आकर्षित करते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला दोन सिंह बसलेले आहेत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुमारे 20 मीटर अंतर गेल्यावर मंदिराचा मुख्य दरवाजा येतो.  मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोठी जड पितळी घंटा देखील टांगलेली आहे. ही घंटा पूरातन असल्याचे सांगण्यात येते. देवीचे संपूर्ण मंदिर संगमरवराचे आहे. गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महा सरस्वती या मातेच्या तीन रूपांच्या मूर्ती एकत्रितपणे विराजमान आहेत. मंदिराचे गर्भगृह गोलाकार असून त्याच्या छतावर घुमट आहे. त्यावर लाल झेंडा आहे.   

=======

हे देखील वाचा : अयोध्येतील रामलीलेत कलाकारांची मांदियाळी….

=======

नवरात्रामध्ये हे संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले जाते. तसेच त्यावर विद्युत रोषणाईही केली जाते. सध्या या मंदिरात दिवसरात्र भक्तांची गर्दी असून दिवसा फुलांची आकर्षक सजावट व रात्री नयनरम्य अशी विद्युत रोषणाई भक्तांना पहाता येते. मंदिर पहाटे चार वाजता भक्तांसाठी उघडण्यात येते. प्रथम मंगला आरती होते त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. रात्री 8 वाजता देवीच्या आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद होतात.  

या मंदिराचा उल्लेख रामायणातही आढळतो. श्रीरामांच्या विवाह प्रसंगामध्येही माता बडी देवकाली मंदिराचा उल्लेख आहे. आता नवरात्रात अयोध्येत भक्तांची संख्या वाढली आहे. श्रीरामाची देवी म्हणून भाविक माता बडी देवकाली मंदिराला भेट देत आहेत.  या भक्तांना मंदिरातर्फे भंडाराही दिला जातोय.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.