मंडळी आपल्या भारतीय लोकांचे एक वैशिष्ट्य आहे. आपण काही व्यक्तींचा/क्षेत्रांचा ब्रँड ठरवतो आणि त्यापलीकडे बघायची आपली तयारी नसते. क्रिकेटचेच उदाहरण घ्या.
फिरकी गोलंदाजी म्हटले की आपण प्रसन्न बेदी, चंद्रशेखर, वेंकट यांचा ब्रँड बनवल्यावर त्यांच्या पूर्वीचे विनू मंकड, सुभाष गुप्ते यांना आपण सोयीस्करपणे विसरून जातो. मंकड, गुप्ते तर सोडाच कारण ते बिचारे आता हयातही नाहीत पण अगदी आत्ताचे अनिल कुंबळे, हरभजन यांना तरी आपण कुठे इतके महत्व देतो. दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये 1000 वर विकेट्स घेऊन सुद्धा त्यांना आपल्या कारकिर्दीत वारंवार स्वतःला सिद्ध करावे लागले. याच जोडीपैकी अनिल कुंबळे याचा आज १७ ऑक्टोबरला ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देतानाच त्याच्या असामान्य कर्तृत्वाचे स्मरण आपोआप होते.
अनिल कुंबळे (Anil Kumble) वयोगट स्पर्धेतून भारतीय संघात सामील झाला. शालेय जीवनात प्रथम मध्यमगती गोलंदाजी करणारा अनिल, भाऊ दिनेश याच्या सल्ल्यानुसार लेग स्पिन गोलंदाजी करू लागला. तो चांगला फलंदाजही होता. पण पुढे त्याने फक्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केल्याने त्याच्यातील फलंदाज मागे पडला.
अनिल प्रथम प्रकाशझोतात आला तो १९९० मध्ये ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेत त्याने पाकिस्तानच्या संघाला एक दिवसीय सामन्यात जखडून ठेवले तेव्हा. त्या कामगिरीच्या जोरावर त्याची १९९० च्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात निवड झाली. तो आणि त्याचा १९ वर्षाखालील संघातील सहकारी अजय जडेजा या दोघांची निवड त्यावेळी अनेकांना आश्चर्यकारक वाटली.
अनिलने ओल्ड ट्रॅफर्ड येथील दुसऱ्या सामन्यात कसोटी पदार्पण केले. अॅलन लॅम्बचा त्रिफळा उडवून त्याने कसोटीतील पहिली विकेट मिळवली. त्या दौऱ्यात हिरवाणी हा प्रथम पसंतीचा लेग स्पिनर असल्याने अनिलला केवळ एकच कसोटी खेळावयास मिळाली. पण एकदिवसीय मालिका भारताने जिंकली त्यात अनिलने आपली छाप सोडली.
१९९२ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी नवज्योत सिद्धूच्या पंजाब संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी सामन्यात शेष भारत संघाकडून खेळताना अनिलने सामन्यात १३ बळी मिळवून भारतीय संघात पुनरागमन केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत १८ विकेट्स घेताना जोहान्सबर्ग कसोटीत ५३ धावात ६ गडी बाद करून त्याने लक्षवेधी कामगिरी केली. यानंतर अनिल भारतीय संघाचा हुकमी एक्का बनला.
अनिलने १३२ कसोटीमध्ये २९.६५ च्या सरासरीने ६१९ विकेट्स घेतल्या आणि तो कसोटी इतिहासातील सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्यावेळपर्यंत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. अनिलने एकूण ३५ वेळा एका डावात ५ वा अधिक बळी मिळवले तर ८ वेळा सामन्यात १० वा अधिक गडी बाद केले. ३५ पैकी २० वेळा अनिलने भारताला जिंकून दिले तर १० सामने अनिर्णित राहिले. त्याने ३१ वेळा एका डावात चार बळी मिळवले. तो खऱ्या अर्थाने ‘मॅच विनर’ होता.
त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणजे त्याने १९९९ मध्ये दिल्लीच्या कोटला मैदानावर दुसऱ्या डावात ७४ धावात पाकिस्तानचे घेतलेले १० बळी. या अशा भीम पराक्रमानंतर भारत तो सामना जिंकला नसता तरच नवल. असा पराक्रम करणारा जिम लेकरनंतरचा तो दुसराच गोलंदाज होता. या डावात त्याने बळी घेताना जी विविधता दाखवली ती त्याच्या गोलंदाजीची प्रातिनिधिक झलकच होती. त्याने काही फलंदाजांना यॉर्क करून त्रिफळाबाद वा पायचीत केले. सलीम मलिकसारख्या कसलेल्या फलंदाजाला आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूलच्या मोहात अडकवून त्रिफळाचित केले तर काही फलंदाजांना गुगली व लेगस्पिनवर स्लिप तसेच शॉर्ट लेगवर झेलबाद करवले.
अनिल विलक्षण लढवय्या होता. २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अँटिगा कसोटीत जबड्याला फ्रॅक्चर झाले असताना बॅंडेज बांधून त्याने अत्यंत परिणामकारक गोलंदाजी करून लाराचा महत्वपूर्ण बळी मिळवला होता.
२००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या ब्रिस्बेन कसोटीत वगळल्यावर त्याने निराशा व्यक्त करताना गांगुलीला सांगितले की त्याला संघात स्थान मिळत नसेल तर तो निवृत्त व्हायला तयार होता. पण पुढील तीन कसोटीत २४ विकेट्स घेऊन जणू त्याने गांगुलीला उत्तरच दिले. हे त्याचे यश फार महत्वाचे होते कारण त्यापूर्वीच्या १९९९ च्या ऑस्ट्रेलियातील मालिकेत त्याला फक्त ५ विकेट्स मिळाल्या होत्या.
अनिल हा पारंपरिक लेग स्पिनर नव्हता, पण त्याने स्वतःची खास शैली विकसित केली. तो चेंडूच्या गतीत सूक्ष्म बदल करून फलंदाजाला चकवत असे. तसेच टप्पा पडल्यावर त्याचे चेंडू अत्यंत वेगात येत असत. मार्क वॉ ने म्हटले आहे की कुंबळे सातत्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असल्याने त्याला फटका मारणे फार अवघड होते. अनिलच्या जास्तीत जास्त विकेट्स या त्रिफळा,पायचीत आणि स्लिप/शॉर्ट लेग वर झेलबाद अशाच आहेत. १९९३ मध्ये भारतात इंग्लंडच्या ब्लँक नावाच्या फलंदाजाचा त्याने त्रिफळा उडवला तेव्हा चेंडू यष्ट्याना केव्हा लागला हे फलंदाजाला कळलेच नाही.
एक दिवसीय सामन्यात सुद्धा त्याने ३३७ विकेट्स काढल्या. १९९३ च्या हिरो कप च्या अंतिम सामन्यात त्याने १२ धावात वेस्ट इंडिजचे ६ गडी बाद करून भारताला विजयी केले होते.
कुंबळेने फलंदाजीत सुद्धा खूप उपयुक्त खेळ्या केल्या. त्याने एकूण २५०६ धावा काढल्या. २००७ मध्ये ओवल मैदानावर त्याने आपले एकमेव कसोटी शतक नोंदवले. हॉकीत एखादा खेळाडू जसा सूर मारून स्टिकने चेंडू गोलजाळ्यात ढकलतो तसेच अनिलने सूर मारून स्टम्पच्या बाजूने जाणाऱ्या चेंडूला बॅटने ढकलले आणि आपली शतकी धाव घेतली.
कुंबळे भारताला पराभवापासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असे. २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध बेंगळुरू कसोटी व २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी वाचवण्यासाठी त्याने जीवाचा आटापिटा केला पण दुसऱ्या बाजूने कुठल्याही तळाच्या फलंदाजांची साथ न लाभल्याने तो निराश झाला व त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.
राहुल द्रविडने कप्तानपद सोडल्यावर कुंबळे भारताचा कप्तान बनला. कुंबळेने १४ कसोटीत भारताचे नेतृत्व केले. त्यातील तीन सामने भारत जिंकला तर सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला. गौतम गंभीर तसेच इतर अनेक खेळाडू खाजगीमध्ये कबूल करतात की कुंबळे त्यांचा सर्वोत्तम कर्णधार होता.
२००७-०८ च्या वादग्रस्त ‘मन्कीगेट’ने गाजलेल्या ऑस्ट्रेलियातील मालिकेत त्याचा कस लागला पण त्यावेळी त्याने अत्यंत संयमाने आणि परिपकवतेने परिस्थिती हाताळली. सिडनीच्या दुःखदायक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीवर टीका करताना तो म्हणाला की मैदानात फक्त एकच संघ क्रिकेट खेळत होता. कुंबळेने आपण परदेशात भारताचे राजदूत आहोत या भावनेतून कुठेही देशाला कमीपणा येईल असे एकही विधान वा कृती केली नाही. या मालिकेत त्याने भारतातर्फे सर्वाधिक २० बळी मिळवले.
ऑस्ट्रेलियाचा संघ २००८ मध्ये भारतात आला तेव्हा पूर्ण मालिकेसाठी त्याच्याकडे नेतृत्व सोपवले होते. पण दुर्दैवाने तो जखमी झाला. परंतु हा बहाद्दर हात प्लास्टर मध्ये असताना सुद्धा मैदानात उतरला आणि कसोटीतील आपली शेवटची विकेट घेताना काही अंतर मागे धावत जाऊन त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर जॉन्सनचा झेल पकडला.
दिल्लीच्या तिसऱ्या कसोटीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.
शिक्षणाने इंजिनियर असलेल्या कुंबळेने निवृत्तीनंतर क्रिकेट प्रशासनात सुद्धा महत्वाची भूमिका बजावली. तो काही काळ कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्यानं नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुखपदही काही दिवस सांभाळले. तो भारतीय क्रिकेट संघाचा २०१६-१७ या कालावधीत मुख्य प्रशिक्षक होता पण त्याची शिस्तप्रियता संघाला भावली नाही. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉउंसिलच्या तांत्रिक समितीचा अध्यक्ष आहे.
तब्बल १८ वर्षे भारताच्या वतीने विकेट्सचे ढिगारे रचून सुद्धा त्याची तुलना त्याचा समकालीन लेगस्पिनर शेन वॉर्नशी केली गेली आणि कुंबळेला स्पिनर म्हणावे का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले हे त्याचे दुर्दैव. काही पत्रपंडितांनी तर कुंबळेचा चेंडू वळणार नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची भाषा करून त्याला हिणवले पण मितभाषी कुंबळेने आपल्या अजोड कर्तृत्वाने त्यांची तोंडे गप्प केली.
अनिल हा एकमेव द्वितीय असा होता त्यामुळे अनिल कुंबळे या नावाला प्रचंड ब्रँड वॅल्यू निर्माण झाली पण त्याचा फिरकी गोलंदाज म्हणून ब्रँड निर्माण झाला नाही ही भारतीय क्रिकेटची शोकांतिका म्हणावी लागेल आणि त्याचीच परिणती म्हणजे एकही दुसरा कुंबळे अजून तरी निर्माण होऊ शकलेला नाही. भले पत्रपंडित त्याला फिरकी गोलंदाज मानत नसतील, पण आपल्या परिणामकारक गोलंदाजीच्या बळावर त्याने भारतीय तसेच जागतिक क्रिकेट विश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे हे निर्विवाद.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.