एक काळ असा होता बजाज स्कुटर घरी असावी, हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न होते. भारतीय बाजारपेठेत बजाज स्कुटरला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. स्वातंत्र्याच्या आधी म्हणजेच २९ नोव्हेंबर १९४५ रोजी ही गाडी बाजारात आली आणि म्हणता म्हणता सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातलं एक स्वप्न बनून गेली.
बजाज उद्योगसमूहाची पायाभरणी करणाऱ्या जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांचा जीवनप्रवास रोमांचकारक आहे. त्यांनी त्यांच्या जगण्यातून एका उद्योगपतीने कसं असावं, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. जमनालाल बजाज यांचा जन्म राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यामधला. ४ नोव्हेंबर १८८९ रोजी म्हणजेच आपले माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्माच्या १० दिवस आधी यांचा जन्म झाला होता.
जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांचे कुटुंबीय सर्वसाधारण असल्यामुळे त्यांना फक्त चौथी पर्यंतच शिक्षण घेता आले. परंतु, नंतर जमनालाल बजाज यांना वर्धा येथील मारवाडी परिवाराने दत्तक घेतले. त्या परिवारातील प्रमुख सदस्याचे नाव शेठ बसराज असे होते. बसराज शेठ यांना अपत्य नसल्यामुळे त्यांनी जमनालाल यांनाच पुत्र मानले. बसराज शेठ यांचे वय वाढत चालले होते सोबतच संपत्ती पण मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे त्यांनी जमनालाल यांना दत्तक घ्यायचा निर्णय घेतला होता.
जमनालाल यांना लहानपणापासूनच साधे सरळ राहायची सवय होती. एकदा असे झाले की, ते त्यांच्या कुटुंबियांसोबत एका लग्नात जायला निघाले होते. त्यावेळी वडिलांनी त्यांना दागिने घालायला सांगितले. पण त्यांनी नकार दिल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर मात्र जमनालाल यांनी घर सोडले आणि सोबत संपत्तीवर असणारा हक्क पण सोडला. परंतु, त्यानंतर असे काही घडले की, त्यांना परत घरी यावे लागले.
जेव्हा त्यांचे वडील शेठ बसराज यांचे निधन झाले तेव्हा जमनालाल घरी परतले. त्यांनी घरी राहण्याचा आणि संपत्तीवर हक्क ठेवण्याचा घरच्यांचा निर्णय एका अटीवर मान्य केला. सर्वात आधी त्यांनी सगळ्या संपत्तीची बाजारभावाप्रमाणे किंमत काढली आणि त्यावरील व्याज समाजाला दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचे जानकीदेवींशी लग्न झाले आणि ते अध्यात्मिक मार्गाकडे वळले.
अध्यात्मिक वाटचालीसोबत सामाजिक कार्यात पण ते अग्रेसर होते. त्यांचे आणि लोकमान्य टिळकांचे विचार पटत नसतानाही त्यांनी केसरी वृत्तपत्रासाठी भरीव मदत केली होती. त्यानंतर काही दिवसांनी पहिल्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले गेले. त्यावेळी पण जमनालाल त्यांनी इंग्रजांना भरीव निधी देऊन मदत केली. तेव्हा त्यांना ‘रायबहादूर’ पदवीने गौरवण्यात आले. त्यांनी १९२१ साली महात्मा गांधीजींसोबत असहकार आंदोलनात उस्फुर्ततेने सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी गांधींजीनी सोबत कधी सोडलीच नाही.
महात्मा गांधींजींसोबत राहायला लागल्यापासून जमनालाल बजाज यांनी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. वर्ध्यामध्ये ते बायका मुलांसोबत राहत होते. त्यांनी गांधीजींना त्या ठिकाणी येऊन राहण्याची विनंती केली. जेव्हा १९ वे नागपूर काँग्रेस अधिवेशन झाले तेव्हा त्यांनी महात्मा गांधीजींना पिता म्हणून दत्तक घेण्याची विनंती केली गांधीजींनी ती मान्यही केली.
महात्मा गांधीजी यांना १६ मार्च १९२२ रोजी जमनालाल यांनी चिठ्ठी लिहून वर्ध्यात येऊन राहण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी त्यांचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांना पाठवले आणि ते बजाज परिवारासोबत राहायला लागले.
त्यानंतर त्यांनी हिंदी भाषेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. त्यांनी खादी आणि ग्रामोद्योग विकासासाठी मोठे कार्य केले. सोबतच गोसेवेलाही महत्व दिले. हरिजन समाजाला जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या. लोकांमध्ये बदल होण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतःचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले, विहिरी बांधून दिल्या. आपल्या कृतीतून समाजात बदल घडवण्याचा निर्णय घेतला.
=====
हे देखील वाचा : …आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले
=====
जमनालाल बजाज मोठ्या मनाचे आणि दिलदार स्वभावाचे होते. ज्या वकिलांनी स्वातंत्र्यलढ्यात उस्फुर्त सहभाग घेतला होता त्यांच्या कुटुंबाला एक लाखाची मदत केली. त्यांच्याकडे १९३७-३८ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची संधी चालून आली होती. परंतु, त्यांनी ती नाकारली. याचे कारण म्हणजे, त्याचवेळी सुभाषबाबू भारतात आल्यामुळे आपल्यापेक्षा ते योग्य पद्धतीने कारभार सांभाळू शकतील, असं म्हणून त्यांना अध्यक्षपद बहाल केले.
महात्मा गांधीजी जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांचे उदाहरण उद्योजकांना देत असत. ते त्यांना सांगत असायचे की, उद्योजक आणि श्रीमंत व्यक्तींनी संपत्तीवर हक्क ठेवण्यापेक्षा ट्रस्टी म्हणून राहावे, यासाठी आपण जमनालाल यांचे उदाहरण पाहू शकता. त्यांनी कायम साध्या राहणीला महत्व दिले.
जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांनी आयुष्यात ३ सिद्धांतांना प्रमाण मानले. एक म्हणजे व्यापारात होणाऱ्या लाभापेक्षा प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. आपण करत असलेल्या कामात त्यांनी सच्चाई आणि पारदर्शिकपणा ठेवला. तर, तिसरा म्हणजे, व्यक्तिगत लाभापेक्षा जास्तीत जास्त सार्वजनिक कार्य कसे होईल, याकडेच त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले.
====
हे देखील वाचा: महात्मा गांधींनी बाबा आमटे याना ‘अभय साधक’ पदवी का दिली होती? ही आहे त्यामागची कहाणी
====
जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांच्या मार्गदर्शनाखाली बजाज उद्योगसमूहाची वाटचाल मोठ्या दिमाखात झाली. गाड्यांमध्ये चेतक स्कुटरची विक्री उद्योगसमुहाच्या इतिहासात विक्रमी ठरली. दुर्दैवाने हे यश जमनालाल बजाज पाहू शकले नाहीत. ११ फेब्रुवारी १९४२ रोजी जमनालाल बजाज यांचा मृत्यू झाला. जमनालाल यांचे आयुष्य एक पथदर्शी आयुष्य होते. महात्मा गांधीजींच्या विचारांचे ते खरे वारसदार होते. आज स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर पण जमनालाल यांचे विचार बजाज उद्योगसमूहासाठी प्रेरणादायीच आहेत.