Home » Pahalgam Attack : आधी धर्म विचारला मग गोळ्या झाडल्या…

Pahalgam Attack : आधी धर्म विचारला मग गोळ्या झाडल्या…

by Team Gajawaja
0 comment
Pahalgam Attack News
Share

“हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं पहलगामचा बैसरन हा डोंगराळ भाग .. ही जागा म्हणजे पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. 22 एप्रिल 2025 ची दुपार… काही पर्यटक फोटो काढत होते, काहीजण पिकनिकचा आनंद घेत होते, तर काही घोड्यावरून काश्मीरचे सुंदर डोंगर पाहण्यात मग्न होते. पण अचानक फटाके फुटण्याचा आवाज आला. खरंच काही पर्यटकांना वाटलं की फटाके फुटत आहे. पण अचानक पळा पळा हे शब्द आणि किंकाळ्या ऐकू आल्या. काही बंदूकधारी दहशतवादी बाहेर आले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. काही क्षणांतच तिथे आनंदाचं वातावरण भीती आणि रक्तपातात बदललं. हल्लेखोर प्रत्येकाला विचारत होते, तुझं नाव काय? धर्म काय? आणि मग त्यांच्यावर गोळ्या झाडत होते.’ या क्रूर हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.” गेल्या दोन दशकातील काश्मीर वर झालेला सर्वात भयानक हल्ला आहे. हा हल्ला कसा झाला? हा हल्ला का करण्यात आला आहे? या मागे कोण आहे? हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून… (Pahalgam Attack News)

22 एप्रिल 2025 च्या दुपारी साधारण 2:30 वाजता, पोलिसांच्या खाकी वर्दीत चार दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन भागात प्रवेश केला. हे ठिकाण पहलगामपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि फक्त पायी किंवा घोड्यावरूनच इथे पोहोचता येतं. दहशतवाद्यांनी रायफल्स आणि छोट्या शस्त्रांचा वापर करून पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, हल्लेखोरांनी काही पर्यटकांचे धर्म आणि नावं विचारली आणि विशेषतः हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्याने तिथे उपस्थित सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. स्थानिकांनी आणि सुरक्षा दलांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवलं, पण अनेकांचे प्राण वाचवता आले नाहीत. (Pahalgam Attack News)

या हल्ल्यात एकूण २६ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, यामध्ये काही भारतीय पर्यटक, दोन स्थानिक आणि दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. परदेशी नागरिकांमध्ये UAE आणि एक नेपाळी नागरिक होता. याशिवाय, भारतीय नौदलाचा 26 वर्षीय अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. ते हरियाणाचे रहिवासी होते आणि नुकतंच 16 एप्रिलला त्यांचं लग्न झालं होतं. तर मंजुनाथ, जे कर्नाटकमधील शिमोगा येथील रहिवासी होते, त्यांचा हल्ल्या पूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते डल लेकवर शिकाऱ्यात बसून आनंदाने या टूरसाठी ‘थँक यू’ म्हणत होते. कोणाला ठाऊक होतं की हा त्यांचा शेवटचा आनंदाचा क्षण असेल? जेव्हा मंजुनाथ यांच्या पत्नीने पल्लवीने मंजुनाथ यांंना रक्ताच्या थारोळ्यात पाडलेलं पहिलं, तेव्हा त्यांनी दहशतवाद्यांना मला सुद्धा मारा अशी विनंती केली. तेव्हा एक दहशतवादी म्हणाला,”तुला सोडतोय जा मोदीला सांग.” याशिवाय, कर्नाटकातील एक पर्यटक शालिंदर कल्पिया यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. इतर मृतांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे, महाराष्ट्रातील डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले, पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे आणि दिलीप डिसले या पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. (Pahalgam Attack News)

हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने पावलं उचलली. बैसरन परिसर सील केला आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली. भारतीय सेनेच्या चिनार कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि CRPF च्या विशेष पथकांनी संयुक्त कारवाई सुरू केली. जखमींना हेलिकॉप्टर आणि स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने श्रीनगरला भेट देऊन उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचं आयोजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, पर्यटकांच्या मदतीसाठी 24/7 हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह जागतिक नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा दर्शविला. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत पहलगाम येथे candle मार्चचे आयोजन केलं. या मार्चच्या माध्यमातून त्यांनी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. (Pahalgam Attack News)

===============

हे देखील वाचा : Historical Buildings : भारतातील महिला शासकांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू 

===============

हा हल्ला ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ TRF या दहशतवादी संघटनेने केला असल्याचं बोललं जात आहे. TRF ही पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तय्यबा’ची उपशाखा मानली जाते. त्यांनी हा हल्ला जम्मू-काश्मीरमध्ये ‘बाहेरुन येणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या डोमिसाइल प्रमाणपत्रांविरोधात केला आहे. पर्यटक म्हणून लोक इथे येतात डोमिसाइल मिळवतात. त्यानंतर तिथे जमीन ताब्यात घ्यायला सुरुवात करतात. हा हल्ला याचं आरोपाखाली केल्याचं म्हटलं आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर अशा संघटनांनी आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. त्याशिवाय अमरनाथ यात्रेची तयारी सुरू झाल्याने आणि पहलगाम हे यात्रेचं मुख्य केंद्र असल्याने, दहशतवाद्यांचा उद्देश या यात्रेला धक्का पोहचवून काश्मीरचं अर्थचक्र डळमळीत असू शकतो. असंसुद्धा बोललं जातं आहे. (Pahalgam Attack News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं आहे. सरकारने दहशतवादाविरुद्ध ‘कठोर कारवाई’ची हमी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांना हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काश्मीर ज्याला भारताचं स्वर्ग म्हटलं जातं या हल्ल्यांमुळे नरकात रुपंतरीत होतंय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. सुट्टीत आपल्या आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पल्लवीसारख्या अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं. त्या सर्वांना शांती लाभो…


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.