Home » Thackeray cousins patch-up : पुन्हा भाऊबंदकी, पुन्हा एकीचे बळ!

Thackeray cousins patch-up : पुन्हा भाऊबंदकी, पुन्हा एकीचे बळ!

by Team Gajawaja
0 comment
Thackeray cousins patch-up
Share

नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार, ही चर्चा पुन्हा पुन्हा डोके वर काढते. पूर्वी या दोन पक्षांच्या एकत्र यायची चर्चा होत असे, आता दोन्ही पक्षांचे बळ एवढे खालावले आहे, की पक्षांऐवजी उद्धव आणि राज ठाकरे या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याचीच चर्चा होत असते. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होतो आणि काही दिवसांच्या चर्चांनंतर पुन्हा ही कढी शिळी होते.
उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही चुलत भाऊ वेगळे झाले त्याला पुढील वर्षी दोन दशके पूर्ण होतील. या काळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढली, एकमेकांवर यथेच्छ टीका केली. राज यांनी 2006 पासून उद्धव यांच्या राजकीय यशात खोडा घालण्याचे अनेक प्रयत्न केले, ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले. जेव्हा राज यांची ताकद संपली तेव्हा मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, अशा शेलक्या शब्दांत उद्धव यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी मनसेची संभावना केली होती. (Thackeray cousins patch-up)

परंतु मागील अडीच वर्षांत घडामोडी अशा घडल्या, की दोन्ही भावांना एकत्र येण्याची निकड भासू लागली आहे. राज यांच्याच शब्दांत म्हणजे ठाकरे ब्रँड कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी अलीकडे आडूनआडून विधाने करून याचे संकेत द्यायला सुरूवात झाली. महेश मांजरेकर यांना १९ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीत “आपसातील मतभेद विसरून मराठी माणसांसाठी एकत्र येणे कठीण नाही,” असे म्हणून राज यांनी या चर्चेला तोंड फोडले. त्यानंतर उद्धव यांनी “क्षुल्लक भांडणे” दुर्लक्ष करण्याची तयारी दाखविली. मात्र महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या कोणाशीही संबंध ठेवता कामा नये, अशी अटही घातली. त्यांचा रोख एकनाथ शिंदे व भाजपकडे होता. (Political News)

Thackeray cousins patch-up

आता परत राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी संभाव्य युतीच्या वाढत्या अटकळींना बळ पुरविले आहे. माध्यमांच्या वक्तव्यांमुळे युती होत नाही. जर काही ठोस घडायचे असेल तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी थेट बोलावे, असे ते म्हणाले. कोविड-१९ महामारीच्या काळात उद्धव हे मुख्यमंत्री असताना राज यांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच उद्धव यांनीही त्यात भर घातली. “महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडेल. आमच्या मनात किंवा आमच्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही गोंधळ नाही. त्यांच्या (मनसे) मनातही कोणताही गोंधळ नाही. आम्ही कोणताही संदेश पाठवणार नाही – आम्ही थेट बातमी देऊ,” असे ते म्हणाले.(Thackeray cousins patch-up)

शिवसेना व मनसे यांच्या नात्याकडे पाहिले तर ही गोष्ट किती अवघड आहे, हे लक्षात येईल. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आपण युतीसाठी तयार आहोत, परंतु त्यासाठी शिवसेनेला काँग्रेसशी सोडचिठ्ठी घ्यावी लागेल, अशी अट राज यांनी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या खऱ्या असतील तर या युतीच्या पहिल्याच घासाला खडा लागला असे म्हणावे लागेल. (Political Update)

याला कारण संजय राऊत यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत अत्यंत इर्षेने आघाडी घडवून आणली होती. ती सोडण्यासाठी उद्धव ठाकरे कदापि तयार होणार नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव यांना जे यश मिळाले, ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतपेढी असलेल्या अल्पसंख्यक मतांमुळे मिळाले होते. राज यांच्यासाठी त्यांनी आघाडीशी फारकत घेतली, तर त्यांची ही मते जाणार हे नक्की. दुसरीकडे ही मते भरून काढण्याची शक्ती राज यांच्यात आता राहिलेली नाही. तेव्हा त्या अल्पसंख्यक मतांची उणीव कशी भरून काढणार, हा प्रश्न उद्धव यांच्यासमोर असेल.(Thackeray cousins patch-up)

Thackeray cousins patch-up

यामुळेच “दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, परंतु मी २०१४ आणि २०१७ मध्ये हे पाहिले आहे,” असे अमित ठाकरे म्हणाले. त्याला कारणही तसेच आहे. राज व उद्धव हे एकत्र येण्याबद्दल चर्चा सर्वात आधी २०१२ मध्ये झाली होती. उद्धव आणि राज यांची हातमिळवणी व्हावी, अशी इच्छा स्वतः दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतरही या दोन भावांमध्ये एकी व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. विशेषतः त्यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. (Political News)

त्याच काळात, संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये उद्धव यांची एक महामुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी स्वतःहूनच राज ठाकरे युती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी थाप मारून त्यावर आपले मत काय, असा प्रश्न उद्धव यांना केला होता. राऊत यांच्या त्या प्रश्नावर “एका हाताने टाळी वाजत नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू,” असे उत्तर उद्धव यांनी दिले होते. थोडक्यात म्हणजे आम्हाला प्रस्ताव पाठवा, असे उद्धव सुचवू पाहत होते. “टाळी अशी वृत्तपत्रात मुलाखत देऊन वाजत नसते. राजकीय वाटाघाटी कशा होतात, हे आधी समजून घ्यायला हवे,” अशा शब्दांत राज यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला होता. तो टाळीचा विषय तेव्हा गाजला होता. अमित ठाकरे जे बोलले ते त्याच वाक्याची नवी आवृत्ती आहे.

==================

हे देखील वाचा : Chatrapati Shivaji Maharaj : महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाबद्दलची रंजक तथ्ये

==================

त्यानंतर २०१४ तर आणखी पुढचे पाऊल पडले. त्यावेळी “शिवसेना नेत्यांनी आमच्याशी संपर्कच न साधल्याने ही युती होऊ शकली नाही,” असा गौप्यस्फोट स्वतः राज यांनी केला होता. राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप युती तुटली होती. त्यादिवशी शिवसेनेसोबत एकत्र येण्याबद्दल माझी उद्धवसोबत फोनवरून चर्चा झाली होती. आपण चर्चा करावी, सभांमध्ये एकमेकांवर टीका करायची नाही आणि बाकीचे निवडणुकीनंतर बघू, असे तीन मुद्दे त्यांनी माझ्याकडे मांडले. यावर मी सहमती दर्शवली होती. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तर शिवसेनेकडून अनिल देसाई व अन्य एक नेता यांच्यात चर्चा होणार असेही आमच्यात ठरले होते. त्याप्रमाणे नांदगावकरांनी अनेक वेळा अनिल देसाईंना फोन करून भेटण्याविषयी विचारले. मात्र व्यग्र असल्याचे सांगत ते भेटण्याची वेळ पुढे-पुढे सरकवत राहिले. दुपारपर्यंत आम्ही शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट बघितली, मात्र तरीही त्यांच्याकडून कोणताही फोन न आल्याने आम्ही आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन टाकले,” असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते. (Thackeray cousins patch-up)

आता पुन्हा एकत्र येण्याची चर्चा जारू सुरू असली तरी शिवसेना आणि मनसे यांचं एकत्र येणं कसं होईल याबाबत भविष्य सांगणं कठीण आहे, पण युती होण्यासाठी दोन्ही पक्षांना सामंजस्य आणि समझोत्याची आवश्यकता आहे. जर त्यांच्यात एकी झाली, तर त्यांचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या दोघांच्या एकत्र येण्याने ठाकरे ब्रँड आणखी मजबूत होईल. आगामी महानगरपालिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद महत्त्वपूर्ण ठरू शकते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.