आयशा मलिक (Ayesha Malik)! पाकिस्तानच्या मीडियामध्ये हे नाव सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. आपल्या शेजारी देशाचे, पाकिस्तानचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या भुवया ताणल्या जातात. अतिरेकी कारवाया, सीमेवर होणारे अतिरेकी हल्ले या गोष्टींमध्ये नेहमी पाकिस्तानचे नाव येत असते. याशिवाय महिलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याविषयीही पाकिस्तान चर्चेत आहे.
जिथे भारतात, प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी मिळते तिथे या आपल्या शेजारील देशात अद्यापही महिलांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. मात्र या सर्व नकारात्मक वातावरणातही एका महिलेनं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आयशा मलिक (Ayesha Malik) यांची नुकतीच नियुक्ती झाली. ही नियुक्ती झाल्यावर आयशा यांच्यावर महिला संघटनांनी कौतुकाचा वर्षाव केला
अर्थात हे सगळं छान आणि प्रगतीशील वाटत असलं, तरी पाकिस्तानमधील एका गटाला आयशा यांची नियुक्ती मान्य नाही. काही गटांनी या नियुक्तीला विरोध करत, आयशा यांना या महत्त्वाच्या पदावरुन दूर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या नियुक्तीला काही न्यायाधीश आणि वकिलांनी विरोध केला आहे. इतकंच नाही, तर आयेशा यांची सेवाज्येष्ठता तसेच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. हा विरोध असताना, दुसऱ्या बाजुला ‘वुमन इन लॉ इनिशिएटिव्ह-पाकिस्तान’ या संघटनेनं आयशा यांना पाठिंबा दिला आहे.
हा सर्व विरोध बाजूला ठेऊन आयशा यांची शैक्षणिक पात्रता आणि या क्षेत्रातील अनुभव पाहता त्यांची निवड ही अगदी योग्य असल्याची खात्री पटते. एका महिलेची सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून निवड केल्यानं अनेक देशांनी पाकिस्तानबरोबरचे कडवट संबंध बाजूला ठेऊन आयशा यांचे अभिनंदन केले आहे. अर्थात यात भारताचाही समावेश आहे.
पाकिस्तानसारख्या देशात एका महिलेला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची धुरा मिळणं, ही मोठी गोष्ट आहे. शालेय जीवनापासून अत्यंत हुशार असलेल्या आयशा यांचा सर्व प्रवास कौतुकास्पद आहे. १९६६ रोजी जन्मलेल्या आयशा मलिक यांचे प्राथमिक शिक्षण कराचीच्या ग्रामर स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी कराची येथील ‘गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’ इथून पदवी मिळवली. याच दरम्यान कायदेशीर शिक्षणाकडे त्यांचा कल वाढला आणि लाहोरच्या कॉलेज ऑफ लॉ मधून पदवी घेतली. नंतर अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या ‘हार्वर्ड स्कूल ऑफ लॉ’ या कॉलेजमधून एलएलएम (मास्टर्स ऑफ लॉ) चे शिक्षण पूर्ण केलं.
१९९८-१९९९ मध्ये आयशा यांची ‘लंडन एच गॅमन फेलो’ म्हणून निवड झाली. आयशा मलिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात कराचीतील फखरुद्दीन ‘जी इब्राहिम अँड कंपनी’ या कंपनीसोबत केली. १९९७ ते २००१ अशी चार वर्षे त्यांनी इथे प्रॅक्टीस केली. या दहा वर्षात आयाशा यांच्या नावाचा दबदबा झाला.
सन २०१२ मध्ये आयशा मलिक यांची लाहोर उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. आता या आयशा यांच्याकडे नव्यानं जबाबदारी आली आहे. पाकिस्तानच्या न्यायिक आयोगानं आयशा मलिक (Ayesha Malik) यांच्या नावाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी मंजुरी दिली. आता संसदीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर मलिक या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतील. एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचणं, हे पाकिस्तानमधील प्रत्येक स्त्रीसाठी स्वप्नवत गोष्ट आहे.
हे ही वाचा: मारीओ मिरांडा बद्दल या विशेष गोष्टी तुम्हाला माहीत आहेत काय ?
मंदीरा बेदीची ‘ती’ साडी ठरली होती वादग्रस्त ! ही चूक पडली महागात!
आयशा या महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या मानल्या जातात. त्यांनी एक नवा इतिहास कायम केल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानी लेखिका बीना शाह यांनी व्यक्त केली. सत्ताधारी तकरीक-ए-इंसाफ या पक्षाच्या खासदार मलिका बुखारी यांनी, हा आपल्या देशासाठी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक निर्णय असून एक शानदार वकील आणि अभ्यासू व्यक्ती किस्तानच्या सुप्रीम कोर्टात पहिली महिला जज होणार आहे. “रवायतें टूट रही हैं”, अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा: कोरोना महामारीचा भयानक परिणाम! भारताच्या शेजारचा ‘हा’ देश झाला आहे कर्जबाजारी!
तीन मुलांची आई असलेल्या आयशा यांनी महिला न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्षपदही भुषविले आहे. याशिवाय आयशा यांनी न्यायिक अधिकारी महिला पर्यवेक्षक समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. पर्यावरणविषयक बाबी हाताळण्यासाठी न्यायालयांना सुविधा व्हावी या दृष्टीकोनातून आयशा यांनी पर्यावरणविषयक कायद्यांवरील एक पुस्तिकाही केली आहे. याशिवाय त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. लाहोरमधील हर्मन मेनर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना त्या इंग्रजी भाषेचे धडे देतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिली महिला जज म्हणून काम करताना आयशा यांच्यासमोर अनेक आव्हानं येणार आहेत. त्या सर्वांना आयशा समर्थपणे सामोऱ्या जातील, अशाच शब्दात त्यांना जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत.
– सई बने