आपल्या देशात पोळ्या अथवा चपट्या आपण रोजच्या जेवणामध्ये दोन्ही वेळेस खात असतो. आपले जेवण ठरलेले असते, भाजी, पोळी, वरण, भात. यात फक्त वरण आणि भाजी यातच काय रोज बदल दिसतो. बाकी भात आणि पोळी फिक्स असते. मात्र हेच रोज खाऊन कंटाळा आला की, आपण काही तरी वेगळे खाण्यासाठी भाकरी हा पर्याय निवडतो. आता आपल्या महाराष्ट्रात तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा अनेक धान्यांच्या भाकऱ्या केल्या जातात.
सर्वच धान्यांच्या भाकऱ्या या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. मात्र यात बाजरीची भाकरी जरा जास्त पोषक आहे. बाजरीमध्ये अनेक असे गुणधर्म आहेत, जे अनेक आजारांवर लाभदायक आहेत. महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात येते. ग्रामीण भागांमध्ये बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. ही बाजारी खाण्याचे फायदे अनेक आहेत. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. खासकरून म्हाताऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते.
बाजरीला बाजरा अथवा मिलेट्स या नावाने देखील ओळखले जाते. यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, लोह, जिंक, फायबर आणि अमिनो अॅसिडसारखे पोषक तत्व आढळतात. याशिवाय बाजरीमध्ये राबोफ्लेविन, फॉलिक अॅसिड आणि बिटा कॅरोटिन असतात. बाजरी केवळ थंडीतच नाही तर तुम्ही कोणत्याही हंगामात खाऊ शकता. पण थंडीत याला जास्त महत्त्व आहे.
बाजरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि अमिनो अॅसिड आढळते. पोषक तत्वांनी भरलेली हे बाजरीचे पीठ थंडीत अधिक प्रमाणात वापरण्यात येते. मात्र डाएटमध्ये याचा अधिक फायदा होता. बाजारीच्या पिठाने तुम्ही केवळ भाकरीच नाही तर खिचडी, दलियादेखील बनवू शकता. हिवाळ्यात बाजरीची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे.
बाजरी हिवाळ्यात शरीराला ऊब आणि ऊर्जा प्रदान करते. हिवाळ्यात बाजरीची रोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीर उबदार राहते, पचन सुधारते, वजन नियंत्रित करण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. गव्हाच्या तुलनेत, ते भरपूर पोषक आणि आरोग्यासाठी चांगले आहे. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत, त्यातील काही प्रमुख फायदे जाणून घेऊया.
शरीराला उष्णता देते
हिवाळ्यात शरीराला उर्जा आणि उबदारपणाची जास्त गरज असते. बाजरी ही नैसर्गिक उष्णता निर्माण करणारे धान्य आहे, जी शरीरात उष्णता निर्माण करते. याच्या सेवनाने हिवाळ्यात शरीर आतून उबदार राहते आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही बचाव होतो.
पाचक प्रणालीसाठी उत्तम
बाजरीत भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे आतड्याची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी होतात. हिवाळ्यात आतड्यांसंबंधी समस्या अनेकदा वाढतात, परंतु बाजरीची भाकरी या समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करते.
हृदयासाठी फायदेशीर
बाजरी ओमेगा- ३ फॅटी ऍसिडस् आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे बाजरी ही हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. शिवाय उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास देखील बाजरी फायदेशीर आहे. त्यामुळे तिच्या सेवनामुळे हृदयरोगाचा धोका कमी करते. हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात, परंतु बाजरीच्या भाकरीच्या सेवनाने त्यांना निर्बंध लागतात.
वजन नियंत्रित राहते
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना बाजरी हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरात जास्त कॅलरीज राहत नाहीत आणि भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. हिवाळ्यात जास्त भूक लागते. मात्र बाजरीचे सेवन केल्यास यावर प्रतिबंध करते.
कर्करोगापासून बचाव
बाजरीत अँटिऑक्सिडंट्सचा चांगला डोस असतो, जो शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतो. कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, बाजरीत फायटोकेमिकल्स असतात जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात.
मधुमेही व्यक्तींसाठी उपयोगी
बाजरी ही डायबिटीससाठी उपयोगी मानली जाते. बाजरीत असणारे पोषक तत्व हे मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी वरदान आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये बाजरी उपयुक्त आहे.
PCOD साठी वरदान
ज्या महिलांना पीसीओडीची समस्या आहे त्या महिलांसाठी बाजरीची भाकरी नक्कीच वरदान ठरते. मासिक पाळीच्या दिवसात अथवा नियमित याचे सेवन केल्यामुळे पोटातील दुखणे कमी होते. याशिवाय बाजरीचा फायदा पीसीओडीची समस्या कमी करण्यासाठीही होतो.
कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण
बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.
जळजळ थांबविण्यास उपयुक्त
बाजरी उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे तिच्या सेवनामुळे जळजळ होण्याची शक्यता असते असे अनेकांना वाटते. पण थंडीत तुम्हाला जळजळ कमी करण्यासाठी नक्कीच बाजरीची उपयोग करून घेता येतो. मात्र प्रमाणात याचे सेवन करा. याबरोबर लोणी अथवा तूप नक्की खा.
शरीराच्या चांगल्या पोषणासाठी
बाजरीची भाकरी चवीला उत्तम असते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. लहान मुलांनी आणि अगदी मोठ्या माणसांनीही बाजरीची भाकरी दुधात कुस्करून खाल्ली तर शरीराला अधिक चांगले पोषण मिळते आणि लहान मुलांची तब्बेतही सुधारते.
हाडांना मजबूती
बाजरीचे नियमित सेवन केल्याने हाडांना चांगली मजबूती मिळते आणि तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहता. विशेषतः थंडीच्या दिवसात तुम्ही बाजरी खायला हवी. बाजरी खाण्याचे फायदे अनेक आहेत. तसंच केवळ भाकरीच नाही तर बाजरीचे अनेक पदार्थ तुम्हाला घरच्या घरी तयार करता येतात. पण जेवणात याचा समावेश करून घेणे गरजेचे आहे.
बाळंतीण महिलांसाठी उपयुक्त
बाळंतीण झालेल्या महिलांसाठी तर बाजरी हे धान्य वरदान आहे. महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आणि पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालविण्यासाठी बाजरी लाभदायक ठरते. जेवणात बाजरीची भाकरी आणि सकाळी उपाशीपोटी जर बाजरीच्या पिठाचा घाटा घेणे फायदेशीर असते. बाळंत झाल्यानंतर शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा बाजरीतून मिळते.
- याशिवाय बाजरीमध्ये ग्लूटेन नसते. त्यामुळे बाजरी खाणे ग्लूटेन फ्रीप्रेमींसाठी चांगला पर्याय आहे. बाजरीमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, जे गव्हापेक्षा अधिक पोषण प्रदान करतात. बाजरीचे सेवन केवळ पोटासाठीच नाही तर त्वचा, केस, हाडे आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि हिवाळ्यात संक्रमणास प्रतिबंध करते.