भारताचे भाग्य इतके थोर आहे की माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, जयंत नारळीकर यांसारखे अनेक प्रतिभावंत शास्त्रज्ञ या देशाला लाभले. या देशात होऊन गेलेल्या अशाच एका असामान्य शास्त्रज्ञाविषयी आम्ही आज माहिती देणार आहोत. ते शास्त्रज्ञ म्हणजे ‘शंकर आबाजी भिसे (Shankar Abaji Bhise)’.
भारताचे एडिसन ओळखले जाणारे ‘शंकर आबाजी भिसे’ यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ मध्ये झाला. “संशोधन करून एखादं मशीन तयार करण्याचे ज्ञान भारतीय शास्त्रज्ञांकडे नाही. फार फार तर ते मशीन चालवू शकतील, यापलीकडे भारतीय शास्त्रज्ञांची स्वतःची अशी वेगळी ओळख नाही आणि ती निर्माण करणं त्यांना जमणार नाही.” असे युरोपियन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांविषयी केलेले वक्तव्य वाचून भिसे यांनी शास्त्रज्ञ व्हायचे ठरविले.
विज्ञानातील प्रयोग हा त्यांचा आवडीचा विषय. असे म्हणतात की, लहानपणी एकदा भिसे साखर आणायला वाण्याकडे गेले. त्यावेळी वाण्याने धुर्तपणे कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी वाण्याला विचारलं असता, ”माझ्या काट्यावर विश्वास नसेल, तर आपोआप वजन करणारं नवं यंत्र शोधून काढ.” असं त्या वाण्याने त्यांना म्हणलं. त्यावेळी “एक दिवस तुला असे यंत्र देईन,” असं त्यांनी त्याला छतीठोक पणे नुसते सांगितले नाही तर ते प्रत्यक्षात आणले देखील.
१८९७ मध्ये ‘इन्व्हेन्टर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड’ या मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली तेव्हा भिसे यांनी ‘स्वयंमापन यंत्र’ म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाईकाला हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र तयार करण्यासाठीचा आराखडा पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. लायनो, मोनो इत्यादी यंत्रांच्या रचना आणि कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी ‘भिसोटाइप’ या यंत्राचा शोध लावला व त्याचं प्रथम इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये पेटंटही घेतले.
हे देखील वाचा: शब्बास रे पठ्ठ्या! शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाला सुरुवात केली, आता कमावतोय वर्षाला कोटी रुपये
शंकरराव भिसे यांना स्वयंमापक यंत्राचे जनक म्हणून ओळखले जाते. १९१६ साली भिसे अमेरिकेला गेले होते. तेव्हा तिथे त्यांनी ‘युनिव्हर्सल टाइप मशीन’ या कंपनीच्या विनंतीनुसार ‘आयडियल टाइप कास्टर’ हे यंत्र शोधून काढले आणि अमेरिकेत त्याचं पेटंट घेतलं. या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी ‘भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापन करून १९२१ मध्ये पहिलं यंत्र विक्रीला आणलं.
ज्या इंग्रजांनी भारतीयांना पाण्यात पाहिले त्यांच्याच देशांत जाऊन शंकरराव आबाजी भिसे यांनी समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, जाहिराती दाखविणारं यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन करणारे यंत्र , एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले.
हे ही वाचा: ‘पाणीवली बाई’ म्हणून सर्वांना परिचित असलेल्या ‘या’ महिलेने थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता
त्यांच्या या मेहनतीचे फळ म्हणजे १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस. सी. ही पदवी बहाल केली. त्यांनतर भारताचे नाव साता समुद्रापार गाजविणाऱ्या धुळ्याच्या शंकरराव आबाजी भिसे (Shankar Abaji Bhise) यांना ‘भारताचे एडिसन’ असे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं.