Home » शहीद भगत सिंग यांची क्रांतिकारी आई विद्यावती कौर !

शहीद भगत सिंग यांची क्रांतिकारी आई विद्यावती कौर !

by Team Gajawaja
0 comment
Vidyavati Kaur
Share

भारताच्या इतिहासात असे फार कमी पराक्रमी पुरुष आहेत, ज्यांच्या योगदानाचं श्रेय त्यांच्या आईलासुद्धा मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ माँसाहेब हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. पण भगत सिंग यांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री विद्यावती कौर यांच्याबाबत फार कमी जणांनाच माहित आहे. मुळात भगत सिंग यांच्या घरातून क्रांतीचा आणि स्वातंत्र्याचा लढा त्यांचे आजोबा अर्जुन सिंग यांच्यापासूनच सुरू झाला होता. यानंतर त्यांचे वडील सरदार किशन सिंग, काका अजित सिंग आणि स्वर्ण सिंग हेसुद्धा स्वातंत्र्यकार्यात होते. ही कहाणी भगत सिंग यांच्या क्रांतीकारी आईची आहे. आई मुलाच्या क्रांतिकारी नात्याची आहे. भगत सिंग यांच्या आईची काहणी जाणून घेऊया. (Vidyavati Kaur)

आता पूर्ण कुटुंबाने स्वत:ला या लढ्यात झोकून दिलं असेल, तर त्या कुटुंबाच्या स्त्रिया तरी का मागे राहतील. यामध्ये सर्वात मोठं योगदान भगत यांच्या आई विद्यावतीजी यांनी दिलं होतं. त्यांचा जन्म १८८६ चा आणि निधन १९७५ सालचं त्यांच्या इच्छेनुसारच भगत सिंग यांच्या शेजारीच हुसैनीवाला येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांचं माहेरचं नाव इंदर कौर, वयाच्या ११ व्या वर्षी सरदार किशन सिंग यांच्यासोबत लग्न झालं. पहिलं मुलं जगत सिंग १९०४ साली जन्माला आलं, पण ते लवकर दगावलं. किशन, अजित आणि स्वर्ण हे तिघे स्वातंत्र्यलढ्यात असल्यामुळे काही न काही कारणामुळे फरार असायचे, अशावेळी विद्यावती कौर, अजित सिंग यांच्या पत्नी हरनाम कौर आणि स्वर्ण सिंग यांच्या पत्नी हुकम कौर यांनी घर सांभाळलं. घरातल्या क्रांतिकार्याच्या वातावरणाशी स्वत:ला जोडून घेतलं. (Social News)

गदर पार्टीचे क्रांतिकारी असो किंवा इतर, ब्रिटिशांपासून त्यांना आपल्या घरात लपवण्यासाठी विद्यावतीजी यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. यामध्ये रासबिहारी बोस, सूफी अंबाप्रसाद, करतार सिंग सराभा, सच्चिंद्रनाथ संन्याल, भाई परमानंद असे कित्येक क्रांतिकारी होते. भगत सिंग यांचं घर म्हणजे सुरक्षित स्थळ असच त्यांना वाटायचं. आपल्या पोटचं मूल म्हणून त्यांना नेहमीच भगत सिंगांची काळजी वाटायची. मात्र त्यांनी भगत सिंग यांना कोणत्याही गोष्टीसाठी रोखलं नाही. त्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठीही आईंनीच पुढाकार घेतला होता. त्या भावनिक होत्या, पण आपल्या आसपास जे घडतंय आणि त्यासाठी खरच परिवर्तन हवंय, याची जाणीव त्यांनी होती. (Vidyavati Kaur)

पार्लीमेन्ट बॉंबिंगनंतर भगत सिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केलं होतं. यानंतर दोघांना स्ट्रेचरवर कोर्टात आणलं गेलं. पण आपल्या मुलाला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांच्या भावना कोलमडल्या होत्या आणि त्या तिथेच बसून खूप रडल्या. अजून एक प्रसंग सांगितला जातो, जो विरेन्द्र संधू यांनी लिहून ठेवला आहे. एकदा जेलमध्ये असताना भगत सिंग यांच्या आई त्यांना भेटायला आल्या होत्या. त्यावर भगत सिंगांनी थट्टा-मस्करी करत त्यांना विचारलं, ‘बेबेजी आप भी जेल मे आ जाइए. यहा साथ मे ही रहेंगे, आपको चल कर नहीं आना पडेगा. यावर आईंनी उत्तर दिलं. ‘कैसे आ जाऊ बेटा ? लेक्चर मुझे देना नहीं आता. पिकेटींग (आंदोलन) करके आऊ क्या ? भगत सिंग म्हणाले, ‘नहीं वह हमारा काम नहीं है ! यावर आईंनी उपहासात्मक उत्तर दिलं, ‘तो किसी को ढेला मारकर आऊ ?’ यावर भगत सिंग पोट धरून हसू लागले. इतिहासाने आई आणि तिच्या क्रांतिकारी मुलाला असा आनंद व्यक्त करताना कदाचित पहिल्यांदाच पाहिलं असेल. (Social News)

भगत सिंग जेव्हा आपल्या कुटुंबाची अखेरची भेट घ्यायला आले होते, तेव्हा ते आईकडे पोहोचले. आई त्यांना पाहून रडू लागली आणि म्हणाली, ‘ भगत तू इतनी कम उम्र में हमे छोड कर चला जाएगा ? यावर भगत सिंग म्हणाले, बेबे, मैं देश में एक ऐसा दिया जला रहा हूं, जीसमे न तो तेल है और न ही घी. उसमें मेरा रक्त और विचार मिले हुए है. अंग्रेज मुझे मार सकते है, लेकिन मेरी सोच व मेरे विचारों को नही. और जब भी अन्याय और भ्रष्टाचार के खिलाफ जो भी शख्स तुम्हें लढता हुआ नजर आए, वह तुम्हारा भगत होगा ! (Vidyavati Kaur)

‘बेबे तू रो मत, अगर तू रोएगी तो मैं भी रोऊंगा. और फिर लोग कहेंगे भगत सिंग डर से रो रहा है. तू मेरी लाश लेने मत आना. तुम बेहोश हो जाओगी तो सब तूम्हें देखेंगे. मुझे कोई नहीं देखेगा, तुम कुलबीर को भेज देना. यानंतर त्यांची आई म्हणाली, ‘एक आखरी बार इन्कलाब जिंदाबाद जरूर बोलना ! आपण ज्या मुलाला ९ महीने पोटात वाढवलं, तो आपल्या लवकर हे जग सोडून जाणार, हे दु:ख तिने पचवलं आणि आपल्या मुलाला असं फासाच्या तख्तावर धाडलं, जसं एक आई आपल्या सैनिक मुलाला आशीर्वाद देऊन युद्धभूमीवर धाडतेय. (Social News)

विचार करा, किती यातना झाल्या असतील त्या मातेच्या जीवाला, पण तिने धीर सोडला नाही. कारण तिला माहीत होतं. आपलं मूल या देशाला गुलामगिरीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी फासावर चढतोय. भगत सिंग यांनी आपल्या आईचा विचार कधीच केला नाही, असं नव्हतं. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कदाचित आईवरच जास्त प्रेम असावं. भगत सिंग यांच्या हौतात्म्यानंतरही विद्यावतीजी यांच्या वाट्याला अनेक दुःखाचे प्रसंग आले. स्वर्ण सिंग १९१० सालीच गेले. अजित सिंग यांचा अजूनही पत्ता नव्हता. १९३९-४० दरम्यान ब्रिटिशांनी त्यांचे दोन पुत्र कुलबीर आणि कुलतार यांना अटक केलं. किशन सिंग यांना लकवा मारला. ज्यावेळी आपलं संपूर्ण कुटुंब जवळपास उध्वस्त होण्याचा मार्गावर होतं त्यावेळी त्यांनी लाहोरमध्ये मोरी गेटजवळ एका सभेचं नेतृत्व केलं होतं आणि पुढेही क्रांतिकारकांना त्या मदत करत राहिल्या. (Vidyavati Kaur)

वीरेंद्र संधू सांगतात, विद्यावतीजी यांना अनेकदा भगत सिंग यांचे स्वप्न पडायचे आणि त्या दचकून उठायच्या. आपल्या पोराची आठवण त्यांनी ४४ वर्ष उराशी ठेवली होती. १९७५ ला त्यांनी जीव सोडला. भगत सिंग २३ वर्ष, ५ महिने, २६ दिवस जगले. पण असंख्य आठवणी त्या आपल्या आईकडे सोडून गेले, ज्या नंतर त्यांच्या आईंमुळे त्या आठवणी, ते प्रसंग, तो इतिहास आपल्यासारख्यांपर्यंत पोहोचल्या. आज अनेकांना माहीत नाही की, भगत सिंग यांच्या हयात असलेल्या ४ खऱ्या फोटोंपैकी एक आपल्या पुण्याच्या नूतन मराठी या शाळेत आहे. हा फोटो इथे कसा आला, यामागेही एक कथा आहे. (Social News)

मराठी लेखिका मृणालिनी जोशी यांनी भगत सिंग यांच्या आयुष्यावर ‘इन्कलाब’ हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी मृणालिनी या पंजाबमध्ये भगत सिंग यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी विद्यावतीजी यांच्याकडून बरीच माहिती गोळा केली. यानंतर जेव्हा मृणालिनी भगत सिंग यांच्या घरातून निघत होत्या, त्यावेळी भगत सिंग यांची बहीण धावत त्यांच्याजवळ आली आणि सांगितलं, ‘बेबेने तुम्हाला हे भेट म्हणून दिलं आहे.’ तो भगत सिंगचा पगडीवरचा फोटो होता. (Vidyavati Kaur)

======

हे देखील वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार !

======

हा फोटो मृणालिनी यांनी पुण्याच्या नूतन मराठी या शाळेला कायमस्वरूपी भेट म्हणून दिला आहे. विद्यावतीजी यांच्या पोटी जन्मलेलं ते पोर आज देशभरातल्या युवकांना प्रेरणा देतंय. भगत सिंग यांचं कार्य केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरतं सीमित नव्हतं. तर राजकारण, शेती, कामगार, समाजव्यवस्था, धर्मरचना, साहित्य या सर्वांमध्ये त्यांचं अतुलनीय योगदान आहे. पण भगत सिंगसुद्धा क्रांतीच्या शिखरापर्यंत यामुळेच पोहोचू शकले, कारण त्यांच्या मागे ‘विद्यावती कौर’ नावाची महान स्त्री आईच्या रुपात उभी होती. धन्य ती माता जिने भगत सिंग यांच्यासारखा वीर पुत्र घडवला. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.