Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशात धुमधडाक्यात साजरा केला जातो. या सणाचे हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा ‘मकर संक्राती’चा सण साजरा केला जातो. या दिवशी लाखो भाविक गंगा आणि अन्य पवित्र नदीकाठी स्नान आणि दान करतात.
पुढील वर्षात मकर संक्रातीचा सण पौष महिन्यात म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्णांनी म्हटले होते जो व्यक्ती या दिवशी आपल्या देहाचा त्याग करेल त्याला मोक्ष प्राप्त होईल. हिंदू धर्मातील सर्व राज्यात मकर संक्राती साजरी केली जाते. पण संक्रातीच्या सणाची नावे आणि पद्धत थोडी वेगळी असते. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात मकर संक्रातीच्या सणाला दानाचे पर्व म्हटले जाते. अशी मान्यता आहे की, मकर संक्रातीपासून पृथ्वीवर उत्तम दिवसांची सुरूवात होते. मकर संक्रातीनिमित्त स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी गंगा घाटावर जत्रेचे आयोजन केले जाते.
पंजाब आणि हरियाणा
पंजाब आणि हरियाणामध्ये 15 जानेवारीच्या एक दिवस आधी संक्राती साजरी केली जाते. या ठिकाणी संक्रातीला लोहरी असे म्हटले जाते. लोहरीच्या दिवशी अग्निदेवाची पूजा करत तीळ, गुळ, तांदूळ आणि भाजलेल्या मक्याची आहुती अग्नीत दिली जाते.लोहरीचा सण नववधू आणि नवजात मुलांसाठी खास असतो. या दिवशी एकमेकांना मिठाई देत सण साजरा केला जातो.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये या पर्वाच्या दिवशी गंगासारच्या येथे मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते. या दिवशी स्नान केल्यानंतर तीळ दान करण्याची प्रथा आहे. असे म्हटले जाते की. या दिवशी यशोदेने श्रीकृष्णाच्या प्राप्तिसाठी व्रत ठेवले होते.
बिहार
बिहारमध्ये मकर संक्रांतीचा सण खिचडी पर्व म्हणून ओखळला जातो. येथे उडदाची डाळ, तांदूळ, तीळ आणि उबदार वस्र दान करण्याची परंपरा आहे. बिहारमध्ये मकर संक्रातीचा सण अत्यंत खास असतो. (Makar Sankranti 2024)
आसाम
आसामध्ये या सणाला माघ बिहू आणि भोगली बिहूच्या नावाने ओळखले जाते. तर तमिळनाडूमध्ये हा सण चार दिवस साजरा केला जातो. येथे पहिला दिवस ‘भोगी पोंगल’, दुसरा दिवस ‘सूर्य पोंगल’, तिसरा दिवस ‘मट्टू पोंगल’ आणि चौथा दिवस ‘कन्या पोंगल’च्या नावाने ओखळला जातो.
(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)