Home » गुप्त काळातील पंचमुखी शिवलिंग…

गुप्त काळातील पंचमुखी शिवलिंग…

by Team Gajawaja
0 comment
Shivling
Share

हे शहर राजस्थानमधील कोटा कोचिंग इन्स्टिट्यूटसाठी प्रसिद्ध आहे.  देशभरातून लाखो विद्यार्थी या शहरात आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी जातात.  मात्र यापेक्षाही कोटाची ओळख तेथील मंदिरामध्ये आहे. या कोटामध्ये गुप्त काळीतील पंचमुखी शिवलिंग आहे. हे शिवलिंग (Shivling) असलेले मंदिर अतिशय पुरातन असून या मंदिरात पुजा करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. कोटामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत.  यातील बहुतांश मंदिरे अतिशय प्राचीन आहेत.  त्यापैकी चारचोमा येथील पंचमुखी, अद्वितीय शिवलिंगाची आणि त्या महादेव मंदिराचीही ख्याती आहे.  येथे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भक्तांची धारणा आहे.  

सध्या चालू असलेल्या अधिक महिन्यात आणि त्याच्यापुढे येत असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त या पंचमुखी महादेव मंदिरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  गुप्त काळातील हे मंदिर आजही उत्तम स्थितीत आहे. या मंदिराच्या वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मंदिरात जिज्ञासूंची गर्दी असते.  

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील चारचोमा गावात भगवान शंकराचे मंदिर तेथील पंचमुखी पिंडीसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर काली सिंध नदीच्या पश्चिम काठावर आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा दिला आहे. यावरुनच या मंदिरातील वास्तुशास्त्राची कल्पना येते. हे मंदिर गुप्त काळातील आहे.  या मंदिराच्या परिसरात गुप्त लिपी असलेले दोन ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत. या भागात सोलंकी शासक होते.   सोलंकी घराण्यातील राजाला वारस नव्हता. राणीनं मुलगा होण्यासाठी भगवान शंकराची आराधना केली. राणीला मुलगा झाल्यावर राजानं हे भगवान शंकराचे पंचमुखी मंदिर उभारल्याची कथा सांगितली जाते. मंदिर स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. संपूर्ण मंदिर दगडांनी बांधले आहे. चौकोनी व्यासपीठावर उभारलेल्या या मंदिराचे बहुतांशी काम हे दगडाचे खाचे एकमेकांत अडकवून झाले आहे.  मंदिराच्या गर्भगृहाच्या छताला चार खांबांनी आधार दिला आहे.  हे खांब फुला-पानांच्या नक्षीनं सजवण्यात आले आहे.  गर्भगृहात भव्य असे पंचमुखी शिवलिंग आहे. त्याच्यामागे  काळ्या पाषाणात देवी शक्तीची मूर्ती आहे.  या मंदिराजवळ एक अप्रतिम पायरी विहीर आहे. या नक्षीकाम केलेल्या विहिरीतील पाण्यानं या पंचमुखी महादेवाचा अभिषेक करण्यात येतो.  गुप्त काळातील या मंदिराची 18 व्या शतकात मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.  सकाळी 6: 30 पासून मंदिरात भाविकांची लगबग सुरु होते.  सायंकाळी 7.30 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असते.  (Shivling)

चारचोमा येथील हे शिवमंदिर कलाकुसरीने सजवलेले आहे. या मंदिरातील प्रत्येक खांब आणि भिंत ही कोरीव काम करुन सजवलेली आहे. त्यामध्ये हिंदू धर्मातील पवित्र अशा चिन्हांचा समावेश आहे. त्यामुळेच धर्म आणि कलेचे प्रतीक म्हणून चारचोमा येथील शिवमंदिराची ख्याती आहे.  या मंदिरात असलेल्या पंचमुखी शिवलिंगाचेही (Shivling) वैशिष्ट्य आहे.  पंचमुख शिवलिंगाला शिवाच्या पाच रुपात पहाण्यात येते. तत्पुरुष (पूर्व)अघोर (दक्षिण)सद्योजात (पश्चिम) आणि वामदेव (उत्तर).  अशी त्याची विभागणा केली आहे.  म्हणजे हे शिवलिंग हे चार दिशांचे आणि आकाशाचे प्रतीक मानण्यात येते. काळ्या कसौटी दगडापासून बनवलेले, हे शिवलिंग अतिशय तेजस्वी आहे.  सुमारे 75 सेमी उंचीच्या या शिवलिंगाच्या (Shivling) चारही बाजुंनी भगवान शंकराचा चेहरा दिसतो.  यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव आणि केशरचना अतिशय सुबकरित्या केलेली आहे.  तसेच भगवान शंकराच्या चेह-यावर जटा,  कर्ण कुंडल, चंद्र आणि कपाळावरील टिका कोरलेला आहे.  याच शिवपिंडीच्या मागे देवी सतीचीही भव्यमुर्ती आहे.  या शिवपार्वतीच्या रुपाला बघण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत आहे. (Shivling)  

=========

हे देखील वाचा : इस्लाम धर्मात बहुविवाह प्रथा नाही, शरियत आणि संविधान काय म्हणते पहा

=========

मंदिराच्या परिसरात सापडलेले दोन ब्राह्मी लिपीतील शिलालेख हे मंदिर गुप्त काळात बांधल्याचे सांगत असले तरीही मंदिराची नेमकी उभारणी केली याबाबत स्थानिकांमध्ये दुमत आहे.  काहींच्या मते भगवान शंकराची उपासना करण्यासाठी खुद्द येथे रामभक्त हनुमानानंही उपासना केली होती.  तसेच विभीषणानेही याच मंदिरात भगवान शंकराची आराधना केल्याची माहिती स्थानिक सांगतात.  तसेच या मंदिरात माता लक्ष्मीनंही तपस्या केल्याची माहिती आहे.  त्यामुळेच या मंदिरात पंचमुखी भगवान शंकराची पूजा केल्यास शंकरासोबत माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो, अशी धारणा स्थानिकांमध्ये आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.