झुचिनी म्हणजेच Zucchini या भाजीची माहिती तुम्हाला माहिती आहे का? अतिशय चांगल्या पोषक घटकांनी परिपूर्ण असलेली ही भाजी म्हणजे सर्व जीनवसत्व एकाचवेळी मिळवण्याचे साधन आहे. ही भाजी साधारण लांब, काकडीच्या आकारातली असते. काहीवेळा काकडी म्हणूनही तिला घेतले जाते. काकडीसारखाच तिचा रंग असतो. पण यासोबत झुचिनी (Zucchini) पिवळ्या रंगातही मिळते. झुचिनी ही अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे. जी मंडळी डाएट सांभाळतात, त्यांच्यासाठी तर ही भाजी वरदान आहे. कारण ही भाजी अत्यंत कमी तेल वापरुन केली जाते. शिवाय ती फार शिजवायचीही गरज नसते. अनेकवेळा त्याला बारीक सोलून तिच्यावर गरम तेल करुन फोडणी टाकण्यात येते. कोशिंबीर किंवा नूडल्स आणि पास्ता सारख्या पदार्थांमध्ये झुचिनीचा (Zucchini) मोठ्या प्रमाणात वापर होतो. उत्तम अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेल्या या भाजीचा आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल पासून ते केस गळण्यापर्यंतच्या अनेक समस्या दूर सारता येतात.
झुचिनी (Zucchini) या भाजीची माहिती अनेकांना असते. पण त्यातील गुणधर्माची माहिती फारशी नसते. नेहमीच्या भाज्यांचा कंटाळा आला असेल तर या भाजीचा नक्की उपयोग करावा. अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश असलेली झुचिनी ही गुणकारी भाजी आहे. आपण नेहमी वेगळ्या आणि चवदार भाज्यांच्या शोधात असतो. तीच तीच चव नकोशी वाटते. पण या सगळ्यात उपयुक्त प्रथिने असलेली भाजी कुठली हा प्रश्न पडतो. यासाठी झुचिनी (Zucchini) हा चांगला पर्यांय आहे. हिरव्या, पिवळ्या रंगात उपलब्ध असलेली ही भाजी अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त असलेली आहे. काही ठिकाणी या झुचिनीची ओळख तोरी, तुराई अशीही करण्यात येते. त्याचा रंग कुठलाही असला तरी त्याची जीवनसत्त्वे ही कायम उपयोगी अशीच असतात. झुचिनीमध्ये अ, क, के, फायबर, पोटॅशियम आदी जीवनवसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात.अनेक रोगांवर ही भाजी औषधासारखी उपयोगी पडते.
झुचिनीचा (Zucchini) वापर आहारात नेहमी केला तरी त्याचा फायदा हाडांच्या मजबूतीसाठी होतो. तसेच या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रक्तामधील वाढलेला वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी झुचिनीचा वापर होतो. अनेकवेळा फक्त तेलावर ही भाजी सलॅडसारखी खाल्ली जाते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी झुचिनीचा उपयोग होतो. झुचिनीमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी असते. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.
झुचिनी (Zucchini) ही नेदरलॅंड, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात मोठ्याप्रमाणात होत असे. मात्र अलिकडील काही वर्षात ही भाजी जगभर पसरली आहे. भारतातही अगदी निवडक मॉलमध्ये झुचिनी मिळायची. श्रीमंतांची भाजी म्हणून तिचा उल्लेख होत होता. पण आता ही झुचिनी सर्वत्र दिसू लागली आहे. तसेच तिची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. झुचिनी जशी काकडीसारखी असते, तशीच तिची चवही काकडीसारखी लागते. काहीवेळा झुचिनीची चव कडवट असू शकते. त्यामुळे तिचा वापर करण्यापूर्वी थोडा तुकडा कापून चव बघण्याचे सांगण्यात येते. जर चव कडू असेल तर अशी झुचिनी अपायकारक ठरु शकते.
==========
हे देखील वाचा : चीन देश बेरोजगारीच्या दिशेने…
==========
झुचिनीचा (Zucchini) मुळ फायदा म्हणजे, ही भाजी कशीही खाल्ली जाऊ शकते. शिजवून, उकडून तसेच अनेकवेळा ग्रील्समध्येही झुचिनीचा वापर केला जातो. ज्यांना बार्बेक्यू पदार्थ खायची आवड असते. त्यांच्यासाठी झुचिनी (Zucchini) हा योग्य पर्याय आहे. ब्रेड किंवा केकमध्येही झुचिनीचा वापर होतो. काकडीचे जसे अनेक पदार्थ होतात, तसेच काकडीसारख्या दिसणा-या या भाजीचे अनेक प्रकार होतात. मुळात झुचिनीला स्वतःची अशी चव नसते. त्यामुळे त्याला ज्या मिश्रणात मिसळले जाते, त्याची चव झुचिनीला येते. काही ठिकाणी या झुचिनीची पिवळी फुलेही आहारात वापरली जातात. या फुलांमुळे शरीरातील टॉकसीन बाहेर टाकले जातात असे सांगितले जाते.
साधारण उष्ण हवामानात झुचिनीची (Zucchini) लागवड होते. भारतात अलिकडे ग्रीनहाऊसमध्ये या झुचिनीच लागवडीवर भर देण्यात येत आहे. झुचिनीला बाजारात मोठी मागणी असल्यामुळे शेतकरी झुचिनी लागवडीकडे वळला आहे.
सई बने