भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ बरोबर फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताचे ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीमधले हे पहिले पाऊल आहे. भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती होते.
ब्राम्होस (BrahMos) पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते. जागतिक शस्त्रांच्या बाजारात याद्वारे भारतानं दमदार पाऊल ठेवलं आहे. यामुळे ब्राह्मोस बाबत भारतीयांच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्राह्मोस म्हणजे नेमकं काय, त्याची क्षमता किती याबाबत उत्सुकता वाढली आहे.
फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाबरोबर झालेला ‘ब्राह्मोस’ संदर्भातील करार म्हणजे संरक्षण निर्यात क्षेत्रात भारताची दमदार सुरुवात आहे.
फिलिपाईन्सनंतर अन्य देशही या क्षेपणास्त्रासाठी उत्सुक आहेत. ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या एनपीओ मशीनोस्ट्रायनिया आणि भारत सरकारच्या संयुक्त करारातून या क्षेपणास्त्राचा विकास करण्यात आला आहे. भारताकडून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्यावर ‘ब्राह्मोस (BrahMos)’ भारतीय सेना आणि नौसेनेच्या ताब्यात देण्यात आले. आत्तापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र म्हणून ब्राह्मोसचा उल्लेख करण्यात येतो. अर्थात त्यामुळे शस्त्रांस्त्रांच्या निर्मितीमध्ये भारताचा दबदबा वाढला आहे.
ब्राह्मोसचं वैशिष्ट्य म्हणजे रडारप्रणालीला चकवा देणारा वेग. ब्राह्मोस कमी उंचीवरुन वेगानं आपल्या लक्षाकडे झेपावते. त्यामुळे रडारवर त्याचा वेग पकडता येत नाही. जमीन, पाणी, हवा असा कुठूनही ब्राह्मोसचा मारा करता येऊ शकतो. आत्तापर्यंत अमेरिकेच्या ‘टॉम हॉक’ या क्षेपणास्त्राचा त्याच्या वेगामुळे दबदबा होता. मात्र ब्राह्मोसमधील आधुनिक प्रणालीनं अमेरिकेलाही मात दिल्यानं जगभरात त्याची चर्चा झाली.
या क्षेपणास्त्राचे ब्राह्मोस (BrahMos) हे नाव भारतातली ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मस्कवा नदी यांच्यावरुन ठेवले आहे.
याशिवाय ब्राह्मोसमध्ये मेनुवरेबल तंत्रज्ञान आहे. मेनुवरेबल तंत्रज्ञान म्हणजे एकदा क्षेपणास्त्राचे टार्गेट नक्की केल्यावर पुन्हा बदलण्याची क्षमता. क्षेपणास्त्राचे लक्ष प्रथम निश्चित करण्यात येते. आणि त्याच लक्षावर जाऊन ते वेध घेते. लेजरचाही लक्ष निश्चित करण्यासाठी उपयोग होतो. मात्र नक्की केलेले लक्ष बदलता येऊ शकत नव्हते. पण त्या लक्षाची निश्चित जागा नसेल, तर हा मारा फोल ठरु शकतो. अशावेळी ब्राह्मोसची मनुवरेबल प्रणाली कामी येते.
====
हे ही वाचा: भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांच्या सॅल्युट करण्याच्या आहेत वेगवेगळ्या पद्धती; ही आहेत त्याची कारणे
====
ब्राह्मोस (BrahMos) एकदा लक्षाकडे झेपावल्यावर जर त्या लक्षानं आपला मार्ग बदलला, तर ब्राह्मोसही आपला मार्ग बदलते आणि अचूक त्या लक्षाचा वेध घेते. दहा मिटर उंचीवरुन ब्राह्मोस जाते त्यामुळे या सर्वात ते रडार प्रणालीला चकवा देते. हे सर्व करतांना ब्राह्मोस १२०० युनिट उर्जा निर्माण करते आणि आपल्या लक्षाला पूर्णपणे उद्धवस्त करते.
आता पुढच्या दहा वर्षात दोन हजार ब्राह्मोस क्षेपणास्त्र बनवण्यात येणार आहेत. ही क्षेपणास्त्रे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान सुखोईवर लावण्यात येणार आहेत. यावरच भारतीय तंत्रज्ञ समाधानी नसून, ब्राह्मोस-2 नावाचे नवीन क्षेपणास्त्र बनवण्याचेही काम चालू आहे. ब्राह्मोस-2 सहा हजार किलोमीटर प्रती तासाच्या वेगानं २९० किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्षावर मारा करुन त्याचा भेद करु शकते. शत्रू देशात ब्राह्मोसची दहशत निर्माण झाली आहे.
====
हे ही वाचा: भारतामधील या ७ विचित्र कायद्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
====
१८ डिसेंबर २००९ रोजी ब्राह्मोसचे यशस्वी परिक्षण झाले. २९० किलोमीटर मारक क्षमता आणि ३०० किलोग्रॅम विस्फोटक सामग्री वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोसचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा तीनपट अधिक आहे. ब्राह्मोसच्या याच सगळ्या वैशिष्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय शस्त्रांच्या बाजारात त्याला मागणी वाढली आहे.
– सई बने