शनिवार १४ डिसेंबर २०२४ रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी दत्तात्रयांची मनोभावे पूजा केली जाते. असे सांगितले जाते की, दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते.
श्री दत्तात्रयांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचे सांगितले जाते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गांव आहे. माहूर गांवाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्रीरेणुकादेवीचे स्थान असून दुसर्या शिखरावर श्री दत्ताचा जन्म झाला आहे. महर्षी स्त्री आणि त्यांची पत्नी अनुसया यांच्या पोटी भगवान दत्तांचा जन्म झाला. दत्ताची सेवा करणारा विशिष्ट वर्गाला ‘दत्त संप्रदाय’ म्हटले जाते.
जिथे दत्तांचा उल्लेख होतो तिथे ओघाने गुरुचरित्राचा देखील उल्लेख होतोच. श्री दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र खूप मोठा आणि महत्वाचा ग्रंथ समजला जातो. या ग्रंथाला पाचव्या वेदाची देखील मान्यता देण्यात आली आहे. अतिशय प्रसिद्ध आणि दैवी शक्तींनी परिपूर्ण असा हा ग्रंथ वाचण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते. या ग्रंथामधून मनुष्याला पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तर अगदी सुटसुटीत पद्धतीने देण्यात आली आहे. या ग्रंथाचे दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक घरांमध्ये पारायण केले जाते. गुरुचरित्राचे पारायण करणे मोठी भाग्याची बाब आहे. या पारायणामुळे आपल्या आयुष्यावर अनेक सकारत्मक परिणाम होतात. चला जाणून घेऊया या गुरुचरिताच्या पारायणाबद्दल अधिक माहिती.
आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार, भगवान दत्तांचा जन्मोत्सव दत्त जयंतीच्या सात दिवस आधी अर्थात एकादशीपासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत चालतो. या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण विधी केले जाते. अनेक घरांमध्ये तर दत्त जयंतीच्या आधी पारायण करण्याची मोठी परंपरा असते.
श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक ग्रंथ आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र – वाचनाची पद्धत आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या एकूण ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय देखील आहेत. या ग्रंथात असलेल्या अध्यायांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले.
घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण,करिअर, आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह-नक्षत्रे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात.
या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यासाठी काही महत्वाच्या बाबी, नियम लक्षात घेऊन मगच त्याचे पारायण केले पाहिजे. नियमात राहून जर आपण या ग्रंथाचे पारायण केले तर नक्कीच त्याचे आपल्याला इच्छित फळ मिळते. मग हा ग्रंथ वाचण्याचे, त्याचे पारायण करण्याचे कोणते नियम आहेत ते आपण जाणून घेऊया.
– श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे.
– श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैव्यद्य खाऊ घालावा.
– श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करावी. त्यानंतर गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पारायण सुरु करताना आधी नेहमी श्री गणपती अथर्वशीर्ष वाचावे.
– श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे.
– श्री गुरुचरित्र पारायणाच्या काळात परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हाताचे अन्न खावे. या काळात उपवास करू नये. सकाळ आणि संध्याकाळी एक धान्य जेवण करावे. काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही.
– श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतः च्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रम्हचर्य पाळावे.
– श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे.
– सप्ताह कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैव्यद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे.
श्री गुरुदत्तांची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेती नेती शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ 2 ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ 2 ॥