ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत दुहेरी पदक मिळवून इतिहास घडविणाऱ्या मनु भाकर हिने नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले. यश मिळाल्यावर फारसे शिकता येत नाही, परंतु पराभवातून जेवढे शिकायला मिळते तेवढे अन्य कशानेही मिळत नाही, असे भाकर म्हणाली. भाकर हिचे हे विधान सध्या काँग्रेसला तंतोतंत लागू पडते. दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतल्यापासून केवळ आणि केवळ अपयश पाहणाऱ्या काँग्रेसने पराभवातून धडे घेतले. त्यातून दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी देशभरात पदयात्रा काढली आणि त्याची परिणीती 2024 मध्ये काँग्रेसला लोकसभेत स्वबळावर 99 आणि एक बंडखोर असे मिळून 100 खासदार निवडून आणण्यात पक्षाला यश मिळाले. म्हणजेच गेल्या दोन निवडणुकीत ज्या प्रकारे मानहानीकारक प्रभावाला सामोरे जावे लागले तशी परिस्थिती यंदा आली नाही. (Sangali)
काँग्रेस जवळजवळ नामशेष झालेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये पक्षाला नवसंजीवनी मिळाली. महाराष्ट्रात काँग्रेसचे 13 अधिक एक असे 14 खासदार निवडून आले. मात्र भाकरने म्हटल्याप्रमाणे, यश मिळाल्यावर फारसे शिकता येत नाही, असंच काहीस कॉंग्रेस पक्षा सोबत झाल्याचं दिसलं. लोकसभेच्या विजयामुळे आलेलं हुरूप विधानसभा निवडणुकांपर्यंत कॉंग्रेस नेते टिकवू शकले नाही. असं म्हणायचं कारण कॉंग्रेसमध्ये झालेली बंडखोरी. या बद्दलच जाणून घेऊया. आता राज्यातील शिवसेना आणि भाजपचे सरकार गेल्यात जमा आहेत आणि सत्ता जवळजवळ आपल्या हाती आली आहे, असं कॉंग्रेस नेत्यांचं वर्तन सुरू झालं. त्यातून काँग्रेसने महाविकास आघाडीतील आपल्या सहकारी पक्षांचाही उपमर्द करायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी जागावाटप करण्यात काँग्रेस नेत्यांनी प्रचंड घोळ घातला. तो एवढा कळसाला गेला की उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत नव्हते. वेगवेगळे फॉर्म्युले मांडत वेळ काढला जात होता. (Political News)
त्याचा परिणाम असा झाला की महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. त्यातही काँग्रेसला ज्या प्रकारे बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे, त्यातून एका मोठ्या नामुष्कीची पायाभरणी होत आहे. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसला अशाच प्रकारे बंडखोरीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी परस्पर ही जागा आपल्याकडे घेऊन चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचा गढ राहिलेल्या व वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा गढ असलेल्या सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांना हे रूचणारे नव्हते. या नेत्यांनी विशाल पाटील या बंडखोर उमेदवाराच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली. त्यातून पाटील हे विजयी झाले. नंतर दिल्लीत राहुल गांधी यांना भेटून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले, ही गोष्ट वेगळी. परंतु त्यातून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मिठाचा खडा पडला तो पडला. (Sangali)
यालाच पुढे सांगली पॅटर्न असे नाव पडलं आणि आता विधानसभा निवडणुकीत हा परवलीचा शब्द झाला आहे. राज्यात जिथे बघावे तिथे सांगली पॅटर्न हा शब्द ऐकू येत आहे. या बहुतांश ठिकाणी काँग्रेस नेत्यांनीच बंडाचे निशाण फडकवले आहे. एवढं कशाला, ज्या सांगलीतून हा शब्द उद्भवला त्या सांगलीतच त्या पॅटर्नची पुनरावृत्ती होत आहे. “मी निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला, सांगलीतील भाजपच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसचा उमेदवार करू शकत नाही, त्यामुळे आता अपक्ष असलेल्या जयश्री पाटील याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं जाहीर करतो,” अशा शब्दांत खासदार विशाल पाटील यांनी ही घोषणा केली आहे. वसंतदादा पाटील घराण्यावर काँग्रेस सातत्याने अन्याय का करतेय, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. (Political News)
या मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे उमेदवार आहेत. या पॅटर्नची लागण राज्यात इतरत्रही झाली आहे. एकट्या पुण्यात माजी नगरसेवक व सभागृह नेते आबा बागुल, माजी आमदार कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. राज्यात ठिकठिकाणी अशा बंडखोरीला काँग्रेस सामोरी जात आहे. सांगली जिल्ह्यातीलच मिरज, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि मुंबईतील धारावी येथे काँग्रेसचे उमेदवार उद्धवसेनेच्या उमेदवारांशी लढत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे काँग्रेसचे उमेदवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहेत. (Sangali)
महाविकास आघाडीतील जागावाटपाची रणधुमाळीसर्वाधिक विदर्भातील जागांवरून झाले होते. काँग्रेसच्या दृष्टीने हा प्रदेश जास्त जिव्हाळ्याचा. त्यात हा परिसर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा. त्यामुळे जागावाटपात जोरदार सौदेबाजी करण्यात नाना पटोले आघाडीवर होते. मात्र विदर्भामध्ये तर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. येथील बंडखोरांनी महाविकास आघाडीचा खेळखंडोबा करण्याचे मनावर घेतलेले दिसते. येथील ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्या समर्थकांनी उमरेड, हिंगणा आणि रामटेक मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. रामटेकमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना स्वत: केदार यांनी पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांचा अर्ज दाखल करायला ते स्वतः उपस्थित होते. शरद पवार यांच्या पक्षासाठी सुटलेल्या काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख उमेदवार आहेत. परंतु तेथे युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी केली आहे.मराठवाड्यात जालना येथे अब्दुल हाफिज, परतूरमध्ये माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, हिंगोलीत भाऊराव गोरेगावकर इत्यादी काँग्रेसचे बंडखोर आहेत. (Political News)
आता काँग्रेसच्या नेत्यांना या वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्या सर्व बंडखोरांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली. परंतु अजूनही त्यातून धडा न घेता यामागे भाजपचा हात असल्याचं कॉंग्रेस नेत्यांचं म्हणण आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे देखील शुक्रवारी असंच म्हणाले. पक्षातील काही घटकांकडून होणारी बंडखोरी हे आव्हान आहे, मात्र भाजपने आमच्या गटात खरोखरच बंडखोरी केली आहे का, हा आमच्यासाठी संशोधनाचा विषय असे ते म्हणाले. (Sangali)
जिथे बंडखोरांचा उपद्रव नाही तिथेही काँग्रेसची अवस्था काही वेगळी नाही. दैव देते आणि कर्म नेते अशी काँग्रेस नेत्यांनी अवस्था केली आहे. याचं प्रमुख उदाहरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतं. तिथे आधी शिवसेनेशी जोरदार सौदेबाजी करून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी तो मतदारसंघ मिळविला. तिथे उमेदवारीवरून बराच घोळ घालण्यात आला. अखेर मधुरिमाराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी उमेदवारी दाखलही केली, परंतु त्यांच्या अगोदर उमेदवारीवर हक्क सांगणारे राजेश लाटकर यांनी बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी तर आणखीच वेगळे नाट्य घडले आणि मधुरिमाराजे यांनी ऐन वेळेस आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर घडलेल्या घडामोडी आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झाल्या आहेत. (Sangali)
=====
हे देखील वाचा : ठाण्यात नेमकी कोणती गणितं चालणार?
========
मात्र यातून झाले काय की कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा उमेदवारच उरला नाही. शेवटी बंडखोरी करणाऱ्या राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पुढे करण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली. त्यातही काँग्रेसने हा मतदारसंघ आम्हाला सोडला असता तर आम्ही उमेदवार दिला असता, असे सांगून संजय राऊत यांनी जखमेवर मीठ चोळले. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते तसेच सर्वात अनुभवी असलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नंतर, आधी महायुतीला हरविणे हे आमचे ध्येय आहे हे वारंवार सांगितले आहे. परंतु महाविकास आघाडीतील बाकीच्या दोन पक्षांना मात्र हे तितकेसे मान्य नसावे असे दिसते. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून आपली नजर हटवायला उद्धव ठाकरे तयार नाहीत, दुसरीकडे आपली माणसे अधिकाधिक निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांची हडेलहप्पी सुरू आहे. त्यामुळेच जून महिन्यात यशाच्या मार्गावर दिसणारी महाविकास आघाडी आता विखुरलेल्या स्वरूपात दिसू लागली आहे. (Political News)