भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. याच भारतात जय जवान जय किसानचे नारे दिले जातात. तर अनेकजण याच शेती किंवा शेतकरी विषयाचे भांडवल करून आपली राजकीय पोळी भाजतात.
अनेकांनी तर शेकऱ्यांच्या नावाने आपला स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढून राजकारणात कायमच स्थानही मिळवलेलं आपल्याला पहायला मिळत. पण शेती आणि शेतकरी हा विषय राजकीय मंडळींसाठी फक्त निवडणुकी पुरताच मर्यादित असलेला आपल्याला पहायला मिळत.
पण आपल्या महाराष्ट्रात असा एक नेता होऊन गेला की ज्याने स्वतः मुख्यमंत्री असूनही आपल्या काळ्या आईच आणि शेतकरी बांधवांच नात कधी तोडलं नव्हतं. इतकंच काय तर त्यांच्या मृत्यू नंतरही त्यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रात कृषी दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
अर्थातच कृषी दिनावरून तुमच्याही लक्षात आले असेलच की आज आपण नक्की कोणत्या नेत्या विषयी बोलणार आहोत. हा नेता म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त हा खास लेख.
वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाजवळ असणाऱ्या गहुली या छोट्याशा गावी दि. १ जुलै १९१३ रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. पुढे त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि आपला वकिली व्यवसाय सुरू केला.
वकिली व्यवसायाने त्यांची परिस्थिती तर सुधारलीच पण सोबत त्यांची समाजात प्रतिष्ठाही वाढली. मग पुढे त्यांची पाऊले राजकारणाकडे वळली. आणि त्यांनी राजकारणतूनच आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
वसंतराव नाईक (Vasantrao Naik) हे सर्वात पहिल्यांदा पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. पुसद नगरपालिकेच्या अध्यक्ष पदानंतर ते हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे अध्यक्ष होते. त्यांनी १९४६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली.
काँग्रेस प्रवेशानंतर पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. तर पुढे ते यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले. १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री झाले.
१९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते. पण दुर्दैवाने पुढे कन्नमवारांचा मृत्यू झाला. पण या मृत्यूनंतर वसंतरावांना मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली. ते १९६३ साली मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांनी थेट ११ वर्ष महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतीविषयक अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते.
तसेच हरितक्रांतीचे शिल्पकार, महाराष्ट्रातील विज प्रकल्पाची निर्मिती करणारे, धरणाची निर्मिती करणारे, रोजगार हमी योजनेचे जनक म्हणूनही वसंतराव नाईकांची ओळख होती.
त्यांना शेती आणि शेतकऱ्यांविषयी प्रचंड आस्था होती. ते मुख्यमंत्री असताना १९६५ साली त्यांनी “जर दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन.” असे निक्षून सांगितले होते.
एके दिवशी वसंतरावांनी आपला मित्र लक्ष्मणरावांना संकरित ज्वारी पेरायला सांगितली. त्याकाळी संकरित बियाणे कोणीही पेरत नसे. पण वसंतरावांनी सांगितलेला हा संकरित ज्वारीचा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याचा आनंद वसंतरावांना चेहऱ्यावर मावत नव्हता.
पुढे वसंतरावांनी आपला मित्र लक्ष्मणरावांना केळी आणि मिरची लावण्याचा सल्ला दिला. त्यातही लक्ष्मणरावांना भरघोस नफा मिळाला. यादरम्यान वसंतराव आपल्या मित्राच्या शेतात जायचे. त्यांच्या पिकांची पाहणी करायचे. मित्राच्या वडिलांसोबत पोत्यावर बसून सर्व शेतकऱ्यांशी मनसोक्त शेतीविषयी गप्पा मारायचे.
या प्रसंगावरून आपल्या लक्षात आलेच असेल की वसंतरावांना शेती विषयी किती आस्था होती. पुढे ११ वर्षानंतर वसंतरावांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. आणि पुन्हा मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले.
अशा या शेतकरी नेत्याचे म्हणजेच वसंतराव नाईक यांचे १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे निधन झाले.
आज त्यांची जयंती त्यानिमित्त टीम क-फॅक्टस तर्फे विनम्र अभिवादन…!
– निवास उद्धव गायकवाड