Home » America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !

America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

बर्फाचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या ग्रीनलॅंडवरुन सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात वादळ उठलं आहे. या वादळाला निमित्त ठरले आहेत, अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन शासित देश ग्रीनलॅंडला विकत घेण्याची इच्छा बोलून दाखवली. ट्रम्प हे बोलले आणि युरोपियन देशात खळबळ उडाली. फक्त युरोपियनच देशात नव्हे तर चीनमध्येही त्याचा पडसाद उमटले. बर्फाचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या या ग्रीनलॅंडमध्ये अपार असा खजिना दडला आहे. (International News)

या बर्फाखाली अनेक किंमती खनिजे आहेत. ही खनिजे जो देश बाहेर काढेल, तो जगावर कित्तेक वर्ष राज्य करेल हे गणित उद्योजक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना माहित आहे. शिवाय चीन आणि युरोपमधील देशांवर वर्चस्व ठेवायचे असेल तर ग्रीनलॅंड वरील ताबा महत्त्वाचा आहे, हेही राजकारणी असलेल्या ट्रम्प यांना माहित आहे. त्यामुळेच भविष्यात ग्रीनलॅंडला विकतच घेण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक पडसाद उमटत आहेत. (America)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प नव्या वर्षात शपथ घेणार आहेत. मात्र आत्तापासूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून देण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांनी आपल्या नव्या वक्तव्यांनी एक वाद निर्माण केला आहे. वर्षाचे बाराही महिने बर्फाच्या आवरणात राहणारा ग्रीनलॅंड हा देश आपल्या ताब्यात घेण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. अर्थात ट्रम्प यांनी 2019 मध्येही असेच विधान करत खळबळ उडवून दिली होती. मात्र आता ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत, अशावेळी त्यांनी थेट ग्रीनलॅंड खरेदी करण्याचे विधान केल्यामुळे त्याचे वादळी पडसाद उमटले आहेत. (International News)

या सर्वांसाठी ग्रीनलॅंड देशाची परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. ग्रीनलॅंड हा देश असला तरी तो डेन्मार्क राज्याचा भाग आहे. ग्रीनलँडच्या देशांतर्गत कामांवर डोन्मार्कचेच सरकार देखरेख करते. गृह व्यवहाराबरोबरच शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक संसाधने आणि कायद्याची अंमलबजावणीही याच डेन्मार्कच्या हातात आहे. डेन्मार्कची राणी मार्ग्रेट द्वितीय ही ग्रीनलँडची औपचारिक राज्य प्रमुख आहे. या ग्रीनलॅंडमध्ये अपार असा खनिज साठा आहे. (America)

बर्फाखाली असलेल्या या संपत्तीच्या जोरावर कुठलाही देश भविष्यात उत्तुंग भरारी घेऊ शकतो, याची ट्रम्प यांना कल्पना आहे. हा साठा शत्रू राष्ट्रांच्या हाती पडला तर तो अमेरिकेसाठी सर्वात मोठा धोका असणार आहे, याचीही कल्पना ट्रम्प यांना आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष म्हणून डेन्मार्कच्या नवीन राजदूतांची घोषणा केली. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलॅंडवर नियंत्रण गरजेचे असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे ग्रीनलॅंडमधील वक्तव्यावर युरोपिय देश नाराजी व्यक्त करत असले तरी तो युरोपचा भाग नाही. तर हा देश उत्तर अमेरिका खंडात आहे. त्यामुळेच त्याचे महत्त्व अमेरिकेला जास्त आहे. ग्रीनलँड समुद्राद्वारे आर्क्टिक महासागराशी थेट जोडलेला असल्यानं अमेरिकेसाठी तो महत्त्वाचा ठरतो. आर्क्टिकमध्ये तेल आणि वायुचे साठे मोठ्याप्रमाणात आहेत. त्यापाठोपाठ ग्रीनलॅंडमध्ये खनिजांचे साठे आहेत. (International News)

आंतरराष्ट्रीय पातळीवर जे एनजीओ असे तेलसाठे काढण्यासाठी विरोध करत आहेत, त्या एनजीओंना ट्रम्प यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. हे तेलसाठे काढून त्याचा मानवासाठी उपयोग झाले पाहिजे, या गोष्टीवर ट्रम्प ठाम आहेत. ग्रीनलँडमध्ये कोळसा, लोखंड, तांबे आणि जस्त यांचे साठे असून त्याचा फायदा करुन घेता आला पाहिजे, असे ट्रम्प यांनी काही वर्षापूर्वीही सांगितले आहे. ट्रम्पचा स्वभाव बघता ते अद्यापही या वाक्यावर ठाम आहेत. या सर्वात अमेरिकेला सर्वच क्षेत्रात स्पर्धा देण्यासाठी तयारी करत असलेल्या चीननंही ग्रीनलॅंडमध्ये उत्सुकता दाखवली आहे. चीनी अधिका-यांचे या भागातील दौरे वाढू लागले आहेत. (America)

======

हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !

शानदार नोएडा फिल्म सिटी

=======

चीननं याआधी अमेरिकेला दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या खाणी हव्या होत्या, त्यांचा ताबा मिळवला आहे. भविष्यात मोबाइल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रिक कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ खनिजांच्या खाणी ज्या देशाच्या ताब्यात, त्या देशाचे जगावर वर्चस्व राहणार आहे. या स्पर्धेत चीन सर्वांच्या पुढे आहे. चीनला थांबवायचे असेल तर ग्रीनलॅंडमधील खनिजांच्या खाणी ताब्यात घ्यायला हव्यात याची जाणीव ट्रम्प यांना आहे. जागतिक बाजारपेठेवर ज्याचे वर्चस्व त्याचे जगावर वर्चस्व, हा साधा नियम आहे. या स्पर्धेत चीन अमेरिकेचा प्रतिस्पर्धी आहे. चीनला हरवायचे असेल तर ग्रीनलॅंडमधील सर्वच खनिज खाणी अमेरिकेकडे आणल्या पाहिजेत, हे जाणणारे ट्रम्प ग्रीनलॅंड खरेदी कऱण्यासाठी आपले सर्व कसब पणाला लावणार आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.