Home » ट्रामला बाय बाय

ट्रामला बाय बाय

by Team Gajawaja
0 comment
Tram service
Share

कोलकाता शहराची शान असा ज्या ट्राम सेवेचा गौरव करण्यात यायचा ती ट्राम सेवा तब्ब्ल 150 वर्षानंतर बंद झाली आहे. 24 फेब्रुवारी 2023 रोजी कोलकात्याच्या ट्राम सेवेला 150 वर्षे पूर्ण झाली. पण सध्याच्या काळात ही ट्राम सेवा अडचण होत असल्याचे स्पष्ट करत कोलकाता सरकारनं ती बंद करण्याच निर्णय घेतला. फक्त ट्रामचे आकर्षण असलेल्या पर्यटक आणि स्थानिकांसाठी मैदान ते एस्प्लानेड हा एकमेव हेरिटेज मार्गावर ट्राम सेवा सुरु रहाणार आहे. ट्राम सेवा ही मुंबईसह देशाच्या अनेक प्रमुख ठिकाणी होती. मात्र काळाच्या ओघात ती बंद पडली तरी कोलकाता या देशातील एकमेव शहरात ट्राम सेवा सुरु होती. आता ती सेवाही फक्त कागदावर उपलब्ध असणार आहे. ट्राम सेवा म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. ट्राम सेवा ही छोट्या ट्रेनसारखी असते. (Tram service)

ट्राम रस्त्यावर टाकलेल्या रुळांवर ओव्हरहेड वायर्सने चालते. प्रदूषण कमी करण्यासाठी ट्राम सेवा ही सर्वात चांगला पर्याय आहे. कोलकात्यात ट्राम सेवा १८७३ मध्ये सुरू झाली. सुरुवातीला या ट्राम घोड्यांद्वारे चालवल्या जात होत्या. नंतर त्या वाफेवर आणि 1900 मध्ये नंतर विजेवर चालू लागल्या. तेव्हापासून कोलकता आणि ट्राम हे समीकरण तयार झाले होते. मात्र आता याच ट्राम वाहतुकीसाठी अडसर ठरु लागल्यामुळे बंद कराव्या लागल्या आहेत. मुख्य म्हणजे, ट्रामची गती ही थोडी कमी असते. या धीम्या गतीच्या ट्राममुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. शिवाय त्यांचा वेगही कमी असल्यामुळे त्यांना स्थानिकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. त्यामुळेच कोलकाता शहराचा वारसा म्हणून गौरविलेली ट्राम सेवा बंद करावी लागली आहे. (Social News)

कोलकातामध्ये आता ही ट्राम सेवा गैरसोयीची ठरत होती. ट्राममुळे वाहतूक कोंडीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात जाण्यासाठी उशीर होत होता, यासंदर्भात वाहतूक शाखेकडे अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. शिवाय ट्राम चालवण्याचा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन यामध्येही मोठी तफावत होत असल्यानं ट्राम सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र कोलकातामध्ये आलेल्या पर्यटकांना या ट्राम सेवेचे आकर्षण असते. त्यांच्यासाठी हेरिटेज ट्राम मैदान आणि एस्प्लेनेड दरम्यान ट्राम चालवल्या जाणार आहेत. यासंदर्भात कोलकाताचे परिवहन मंत्री स्नेहशिष चक्रवर्ती माहिती दिली. मात्र कोलकातामध्ये ट्रामप्रेमींचीही संख्या खूप आहे. त्यांनी ट्रामसेवा बंद करायला विरोध करत यासंदर्भात कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोलकाता सरकारनं ट्रामसेवा बंद केली असली तरी न्यायालय जो काही आदेश देईल, तो आम्ही पाळू असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोलकाता ट्राम वापरकर्ते संघटना आहे. या संघटनेने सरकारच्या निर्णयवार आंदोलन सुरु केले आहे. (Tram service)

त्यांच्यामते जगभरातील लोक ट्राम बघण्यासाठी कोलकात्याला पोहोचतात. ट्राम ही कोलकात्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे ती चालू ठेवण्यासाठी या संघटनेनं आंदोलनही सुरु केले आहे. भारतातील ट्राम ब्रिटीशांनी सुरू केल्या. ही ट्राम सेवा पाटणा, चेन्नई, नाशिक आणि मुंबईसारख्या शहरात सुरु झाली. पण एवढ्या दिर्घ काळासाठी फक्त कोलकतामध्येच ट्रामसेवा सुरु राहिली. 1874 मध्ये प्रथम ट्राम घोडागाडी पुढे लावून ओढली जायची. मुंबईतही ही घोडागाडी ट्राम प्रसिद्ध होती. मुंबईत कुलाबा ते पायधोनी मार्गे क्रॉफर्ड मार्केट आणि बोरी बंदर ते पायधोणी या मार्गावर ट्राम सेवा सुरु झाली. त्यानंतर ट्राम नाशिकमध्येही 8 किलोमीटर अंतरावर सुरु झाल्याची माहिती आहे. 1886 पर्यंत पाटणा, बिहारमध्येही या घोडागाडी ट्राम सेवा प्रसिद्ध झाल्या. पण नंतर घोडागाडी ट्राम घोड्यावर होणा-या अतिरिक्त ताणामुळे बंद करण्यात आल्या. (Social News)

======

हे देखील वाचा : बापरे कोट्यधीचे पेंटिंग चोरीला

======

कोलकातामध्ये मात्र लॉर्ड रिपनने 1880 साली ट्रामला वाफेवर चालणारे इंजिन जोडला. यामुळे ट्रामचा वेग वाढला. मात्र प्रदूषणही वाढले. कारण ट्राम ज्या ज्या मार्गावरून जात असे, त्या मार्गावर धूराची दाट रेषा ओढलेली दिसू लागली. 1895 मध्ये, तेव्हाचे मद्रास आणि सध्याच्या चेन्नईमध्ये देशातील पहिली इलेक्ट्रिक ट्राम धावली. या ट्रामचा आवाजही कमी होता आणि त्यातून प्रदूषणही कमी होत असे. 1902 पर्यंत कोलकतामध्ये सर्वच ट्राम इलेक्ट्रिक ट्राम झाल्या. त्यानंतरही कानपूर, दिल्ली आणि मुंबईमध्ये ट्रामसेवा वाढवण्यात आली. पण ही ट्राम या शहरातील वाढत्या वेगाबरोबर स्पर्धा करु शकली नाही. त्यामुळे पटनामध्ये 1903 मध्ये, 1933 मध्ये नाशिक आणि कानपूर, 1953 मध्ये मद्रास, त्यानंतर 1963 आणि 1964 मध्ये अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईत ट्राम सेवा बंद झाली. तरीही कोलकातामध्ये ट्राम अधिक जोमानं सुरु होती. पण त्याच कोलकातामध्ये आता या ट्राममुळे वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी 150 वर्षाची ट्राम सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Tram service)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.