भारतामधील अनेक मंदिरे ही केवळ धार्मिकस्थळ म्हणून पुजली जात नाहीत तर तेथील वास्तुशास्त्रही अभ्यासाचा विषय असतो. त्याची भव्यता आणि रचना एवढी भव्य असते की, या मंदिरांना एकदा भेट दिली तरी भक्तांचे मन भरत नाही. आपल्या देशात देवीच्या मंदिरांची खास अशी रचना केली जाते. त्यात महालक्ष्मीचे मंदिर (Mahalakshmi Temple) असेल तर ते त्याची भव्यता आणि त्यातील नक्षीकामावरुन नजर हटत नाही. देवी महालक्ष्मी ही धनाची, संपन्नतेची देवता मानली जाते. त्यामुळेच जिथे जिथे महालक्ष्मीची मंदिरे (Mahalakshmi Temple) आहेत, त्या मंदिरांची सजावट अत्यंत देखण्यापद्धतीनं केल्याचे आढळते. या सर्व देवींच्या मंदिरात तामिळनाडूच्या वेल्लोरमधील महालक्ष्मीचे मंदिर अत्यंत भव्य आणि सोनेरी आहे. वेल्लोर येथील महालक्ष्मीच्या मंदिराला सुवर्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. कारण या मंदिराच्या उभारणीमध्ये तब्बल 15,000 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या मंदिराला दक्षिण भारताचे सुवर्ण मंदिरही म्हणतात.
तमिळनाडूच्या वेल्लोरमधील मलाइकोडीच्या टेकड्यांवर वसलेले हे मंदिर भारतीय स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आहे. मंदिर हे फक्त भक्तीचे स्थळ नसते. तर तिथे समाजाला एक करुन त्यांच्या दुःखाचेही निवारण करण्यात येते. तसेच या वेल्लोरच्या मंदिराबाबत बोलता येईल. येथे भक्तांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येतोच शिवाय मंदिराच्या परिसरात भव्य असे आरोग्यकेंद्रही आहे. तेथे रुग्णांवर उपचारही करण्यात येतात. गोल्डन टेंपल म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर भगवान विष्णूची पत्नी माता लक्ष्मी नारायणी यांना समर्पित आहे. हे सुवर्ण मंदिर दक्षिण भारतातील तमिळनाडूमधील वेल्लोरपासून 8 किमी अंतरावर थिरुमलाई कोडी गावात आहे. हे गाव हिरव्यागार डोंगर रांगांच्या मधोमध वसलेले आहे. वेल्लोर शहरातील थिरुमलाई कोडी गावात मंदिर आणि आध्यात्मिक उद्यान बांधण्यात आले असून आकाशातून बघितले तर त्याचा आकार एखाद्या ता-यासारखा दिसतो.
या मंदिराचे बांधकाम वेल्लोरच्या चॅरिटेबल ट्रस्ट, श्री नारायणी पीडम यांनी केले आहे. श्री शक्ती अम्मा किंवा नारायणी अम्मा, एचए ट्रस्टच्या मुख्य आध्यात्मिक शिक्षिका आहेत. धार्मिक गुरु शक्ती अम्मा यांना ‘नारायणी अम्मा’ म्हणूनही ओळखले जाते. श्रीपुरम, वेल्लोरपासून 7 किमी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी सुमारे 100 एकर क्षेत्रात एक आध्यात्मिक केंद्र आहे. या संपूर्ण मंदिराच्या बांधकामात 15,000 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या संपूर्ण मंदिराचे कोरीव काम अप्रतिम असून हे सर्व बघण्यास दिवसही अपूरा पडतो. या मंदिराचा मार्ग ता-याच्या आकाराचा आहे. हा सर्व मार्ग 1.8 चौरस आहे. या ता-याच्या आकाराच्या मार्गातून चालत मंदिरात जाता येते. हा सर्व परिसर अतिशय सुरेखपणे सजवण्यात आला आहे. या सर्व मार्गावर धार्मिक कार्यक्रम होतात. धर्मग्रंथाचे वाचन केले जाते. (Mahalakshmi Temple)
मंदिरात 27 फूट उंचीची दीपमालिका देखील आहे. ही दीपमालिका प्रज्वलीत केल्यावर सर्व परिसर पवित्र अशा प्रकाशानं नाहून गेल्याचा भास होतो. या महालक्ष्मी मंदिराच्या (Mahalakshmi Temple) उभारणीचे काम 2000 मध्ये सुरू झाले आणि 24 ऑगस्ट 2007 रोजी मंदिर भाविकासाठी खुले करण्यात आले. हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. सोन्याच्या चकाकीमुळे हे मंदिर रात्री खूप सुंदर दिसते. या मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. या मंदिरात असलेली माता लक्ष्मीची मुर्तीही अतिशय देखणी आहे. भाविक मंदिरात दक्षिणेकडून प्रवेश करतात आणि संपूर्ण मंदिराला गोलाकर फिरत पूर्वेकडे येतात, तिथून मंदिराच्या आत भगवान श्री लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा दक्षिणेकडून बाहेर पडतात. या मंदिराचा प्रत्येक भाग वैदिक नियमांनुसार तयार करण्यात आला आहे. सुवर्णमंदिरात अतिशय सुंदर मूर्ती बनवण्यात आल्या आहेत, ज्यावर सोन्याचा थर चढवला आहे. मंदिराला आतून आणि बाहेरून सोन्याच्या थराने मढवलेले आहे. रात्रीच्या वेळी मंदिर उजळून निघावे यासाठी प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे रात्रीच्या वेळी या मंदिराचे सौंदर्य वाढते. दररोज पहाटे 4 ते 8 या वेळेत येथे विशेष पूजा केली जाते आणि त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. मंदिर रात्री आठ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. श्री नारायणी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर हे श्रीपुरम मंदिर परिसराजवळ स्थित एक सामान्य रुग्णालय आहे आणि ते ‘श्री नारायणी पेडम’ चॅरिटेबल ट्रस्टद्वारे देखील चालवले जाते.
========
हे देखील वाचा : आतापर्यंत या कलाकारांनी साकारल्या आहेत हनुमानाच्या भूमिका!
========
या महालक्ष्मी मंदिराला (Mahalakshmi Temple) भेट देणे हा एक नितांत सुंदर अनुभव आहे. त्यासाठी वेल्लोर कटम हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. येथून 120 चौरस किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. याशिवाय चेन्नईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील वेल्लोरपासून 145 किमी अंतरावर आहे. वेल्लोरचे कटपा रेल्वे स्थानक हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. श्री लक्ष्मी नारायणी मंदिर ते कातपाडी रेल्वे स्टेशनचे अंतर फक्त 7 चौरस आहे. याशिवाय वेल्लोर मार्ग दक्षिण भारतातील जवळपास प्रत्येक शहराशी जोडलेला आहे.
सई बने