Home » पांडवांनी बांधलेल्या ‘या’ मंदिराची गिनीज बुकमध्ये आहे नोंद

पांडवांनी बांधलेल्या ‘या’ मंदिराची गिनीज बुकमध्ये आहे नोंद

by Team Gajawaja
0 comment
Pandav Temple
Share

महाभारत काळात पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ ही आजच्या दिल्ली येथे होती, असे मानले जाते.  त्याच दिल्लीमध्ये पांडवांनी अनेक मंदिरांची (Pandav Temple) स्थापना केली होती.  पांडवांनी इंद्रप्रस्थ राजधानी झाल्यावर पाच मंदिरांची प्रथम उभारणी केली.  यात  दक्षिण दिल्लीतील कालीमंदिर, कुतुबमिनारजवळील योगमाया मंदिर, पुराण किलाजवळील भैरव मंदिर निगम बोध घाट येथे असलेले नीली छत्री महादेव मंदिर आणि कॅनोट प्लेस येथील हनुमान मंदिर यांचा समावेश आहे.  या हनुमान मंदिरात बाल हनुमानाची मुर्ती आहे.  त्यामुळे त्याला प्राचीन बाल हनुमान मंदिर असे म्हटले जाते.  या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  त्यपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे, 1 ऑगस्ट 1964 पासून या मंदिरात श्री राम, जय राम, जय जय राम मंत्राचा 24 तास जप केला जात आहे.   त्यामुळे या मंदिराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.  या मंदिराचे जगभर भक्त आहे,  यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश आहे.  ओबामा जेव्हा भारतात आले होते, तेव्हा त्यांनी या बजरंगबलीचे दर्शन घेतले होते. (Pandav Temple)

नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेसच्या बाबा खरग सिंग मार्गावर हे हनुमान मंदिर आहे.  या मंदिराला कॅनॉट प्लेसचा हनुमान असेही म्हटले जाते.  ज्याप्रमाणे भारतातील अनेक मंदिरांवर मुघल शासकांनी हल्ले केले आणि त्यांची तोडफोड केली,  त्याचप्रमाणे या हनुमान मंदिरावरही हल्ले झाले.  पण हल्लेखोर बाल हनुमानाच्या मुर्तीला इजा करु शकले नाहीत. आक्रमणकर्त्यांनी उध्वस्त केलेल्या हनुमान मंदिराचे नुतनीकरण 1724 साली जयपूर संस्थानाचे महाराज जयसिंह यांनी केले.  त्यानंतर या मंदिराला आत्ताचे भव्य स्वरुप प्राप्त झाले.  या मंदिराचे पुजारी हे परंपरागत आहेत.  गेल्या 33 पिढ्यांपासून या पुजा-यांची पिढी  बाल हनुमानाची सेवा करत आहेत.  (Pandav Temple)

मुघल सम्राट अकबर हा सुद्धा या बाल हनुमानाचा भक्त होता. अकबरानं पुत्रप्राप्तीसाठी या मंदिरात येऊन प्रार्थना केली आणि त्याला मुलगा प्राप्त झाला.  त्यानंतर अकबरानं कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराच्या शिखरावर इस्लामिक चंद्र आणि मुकुट कलश अर्पण केला. यानंतर मात्र मुस्लिम आक्रमकांनी कधीही या मंदिरावर हल्ला केला नाही. या मंदिरात हनुमानजींच्या बालपणाचा काळ दाखवण्यात आला आहे. अशाप्रकारे बाल हनुमानाचे स्वरुप दाखवणारे हे देशातील एकमात्र मंदिर असावे.  येथील हनुमानाची मुर्तीही वेगळी आहे. बाल हनुमानाच्या एका हातात खेळणी आहे आणि दुसरा हात छातीवर आहे.  वास्तुकलेसाठीही हे हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे.  मंदिराच्या मुख्य दरवाजाची रचना रामायणात वर्णन केलेल्या कलेनुसार आहे. मुख्य दरवाजाच्या खांबांवर संपूर्ण सुंदरकांड कोरण्यात आले आहे.  गोस्वामी तुलसीदास 16 व्या शतकात दिल्लीत आले, तेव्हा त्यांनीही या मंदिराला भेट दिली होती.  हे मंदिर पाहिल्यावरच त्यांना हनुमान चालीसा लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे सांगण्यात येते.  (Pandav Temple)

या मंदिराच्या एका बाजूला गुरुद्वारा बांगला साहिब आहे आणि थोड्याच अंतरावर मशिदी आणि चर्च आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मंदिरात चोळा अर्पण करण्याची विशेष परंपरा आहे. चोळ अर्पण करतांना भाविक तूप, सिंदूर, चांदीचे काम आणि अत्तराच्या बाटल्या वापरतात.  देवाला सुगंधी अत्तर दिल्यावर असाच सुगंध भक्तांच्याही आयुष्यात दरवळतो, अशी त्यामागची भावना आहे.  या मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात,  त्यापैकी आणखी एक आख्यायिका म्हणजे, येथे साक्षात हनुमानजी सुमारे दहा वर्षांनी आपले कपडे सोडतात आणि आपल्या प्राचीन रूपात परत येतात.  त्यामुळे हे मंदिर अत्यंत जागृत मानण्यात येते. या बालहनुमानाची पूजा करतांना मोदक आणि लाडवांचा नैवेद्य अर्पण केला जातो.  (Pandav Temple)

===========

हे देखील वाचा : विमानाच्या इंजिनवर ‘या’ कारणास्तव फेकल्या जातात कोंबड्या

===========

याशिवाय वर्षतील चार दिवशी या मंदिरात मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो.  दिवाळी, हनुमान जयंती, जन्माष्टमी आणि शिवरात्रीच्या दिवशी येथे विशेष सजावट केली जाते. या दिवशी देवाला सोन्याने सजवले जाते. यावेळी जगभरातून मोठ्या संख्येने भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात.  तसेच मंगळवार आणि शनिवार हे हनुमानाच्या उपासनेचे दोन विशेष दिवस आहेत. या दिवसांमध्ये मंदिर 24 तास खुले असते.  मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून अखंड ज्योतही चालू आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.