दो लफ़्ज़ों की है
दिल की कहानी
या है मोहब्बत
या है जवानी
दि ग्रेट गॅम्बलर चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि झिनत अमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं जेवढं ऐकण्यासाठी सुरेल आहे, तेवढंच ते सुंदरही आहे. कारण या गाण्याचे चित्रिकरण झाले आहे, इटलीतील व्हेनिस शहरात. हे व्हेनिस शहर कालव्यांचे (Venice Canal) शहर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या शहराला लाखो पर्यटक भेट देतात. कोरोनाची दोन वर्ष वगळता कुठलाही ऋतू असुदे…व्हेनिस शहरात पर्यटकांची भरपूर गर्दी असते. दिवस-रात्र पर्यटकांच्या गर्दीनं फुललेल्या या शहराचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील कालवे. बोटींचा प्रवास…पण आता या शहराच्या मुख्य आकर्षणालाच नजर लागल्यासारखे झाले आहेत. हे व्हेनिस शहर कोरडे पडले आहे. दिवस-रात्र पर्यटकांना घेऊन फिरणा-या बोटी आता चिखलात रुतलेल्या दिसत आहेत. व्हेनिस शहराला अशा चिखलाच्या गर्तेत बघून स्थानिक धास्तावले आहेत. कारण या कालव्यांवर या शहराचे अर्थकरण केंद्रीत झाले आहे. आता हेच कालवे कोरडे पडले तर व्हेनिसची (Venice Canal) ओळखच पुसली जाईल, अशी भीती त्यांना वाटत आहे.
उत्तर इटलीतील व्हेनेटो येथे असलेले व्हेनिस शहर लाखो पर्टकांचे आवडते स्थळ आहे. 150 हून अधिक कालवे असलेल्या या सुंदर शहराला भेट देण्यासाठी दरवर्षी सुमारे 2 कोटी पर्यटक येतात. मात्र, गेल्या 20 दिवसांतच व्हेनिसच्या कालव्यातील (Venice Canal) पाणी आटले आहे. पाणी आटल्यामुळे कालवे कोरडे होऊन आता तिथे चिखलाचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे ज्या छोट्या बोटी कालव्यावर चालत होत्या, त्या एका बाजुला उभ्या करण्याची वेळ बोटचालकांवर आली आहे.
व्हेनिस शहराचा स्वतंत्र इतिहास आहे. हे शहर सुमारे 1602 वर्षांपूर्वी वसवले गेले. पो आणि पियाव्ह या दोन नद्यांच्या जवळ हे शहर आहे. येथेच एक सरोवरही आहे. हे सरोवर म्हणजे समुद्राच्या काठावर तयार झालेले उथळ पाण्याचे क्षेत्र आहे. येथील गाळाच्या प्रक्रियेमुळे ते एड्रियाटिक समुद्रापासून वेगळे झाले आणि पुढे व्हेनेशियन खाडी बनले. कालांतराने लोक या भागात जाऊ लागले. तिथे वास्तव्य करु लागले. हळूहळू या भागात लोकवस्ती वाढली. या भागाचा विकास झाला आणि या ठिकाणाचे नाव व्हेनिस ठेवण्यात आले. म्हणजेच व्हेनिस हे सरोवरात वसलेले शहर आहे, म्हणून त्याला फ्लोटिंग सिटी किंवा समुद्राची राणी असेही म्हणतात.
सुरुवातीपासूनच हे शहर पर्यटकांना मोहवून घेत होते. कायम पाण्यात असलेल्या या व्हेनिसमध्ये (Venice Canal) 2019 या वर्षी पावसानंतर शहरात इतका पूर आला होता की, येथील इमारतींमध्ये सहा फुटांपर्यंत पाणी होते. तेव्हाच्या आलेल्या परिस्थितीनंतर पुन्हा कधी असा पूर या भागात आला नाही. कोरोनामध्ये पर्यटक नसल्यामुळे मोकळे असलेल्या या शहराचे सौदर्य टिपण्यासाठी काही फोटोग्राफर या कालव्यांमध्ये फिरले होते. हे फोटोही गाजले होते. गेल्याच महिन्यात 13 फेब्रुवारीला, व्हेनिसच्या स्थानिकांनी व्हेनिस कार्निव्हल साजरा केला. शहराचा सर्वात मोठा कालवा असलेल्या ग्रँड कॅनालमध्ये (Venice Canal) हा उत्सव साजरा करण्यासाठी लाखो पर्यटकही आले होते. मात्र त्यानंतर या शहराला नजर लागली….कारण आता काही दिवसानंतरच व्हेनिसचे कालवेच आटल्यानं स्थानिक चिंतीत झाले आहेत. तर पर्यटकही कालव्यात बोटींगचा आनंद घेता येत नसल्यामुळे नाराज झाले आहेत.
वास्तविक, व्हेनिसच्या कालव्यातील (Venice Canal) पाण्याचा स्त्रोत म्हणजे समुद्र आणि त्याच्या मुखाजवळून वाहणाऱ्या दोन नद्या, शिवाय पाऊसही. मात्र गेल्या उन्हाळ्यापासून पाऊस न झाल्यामुळे येथील नद्या आणि जलाशयांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात येथे लेगंबियंट ही पर्यावरण संस्था मोठ्या प्रमाणात कार्य करते. या संस्थेनंही बदलत्या हवामानाबाबत चिंता व्यक्त केली आहे. इटलीतील सर्वात लांब नदी पो मधील पाणी सध्या सामान्यपेक्षा 61% कमी आहे. नदीतील पाणी कमी असल्यामुळे आणि पाऊस नसल्याने कालव्यातील पाणी कमी झाल्याचे या लेगंबियंट संस्थेनं स्पष्ट केलं आहे. या संस्थेच्या अहवालानुसार 2022 चा दुष्काळ इटलीच्या 70 वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळ होता. गेल्या वर्षीच्या दुष्काळाचा हा आफ्टर इफेक्ट असून येत्या काही महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या हिवाळ्यात आल्प्स पर्वतरांगांमधील हिमवर्षाव निम्म्यावर आला आहे. हा बर्फ वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात वितळून नद्यांमध्ये मिसळत असे. यंदा कमी बर्फवृष्टीमुळे तो कमी झाला आहे. त्यामुळे यावेळी नद्यांमध्ये फारच कमी पाणी पोहोचले आहे. त्यामुळे व्हेनिसचे कालवे कोरडे पडत आहेत, ही परिस्थिती कायम रहाण्याची शक्यता या पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच या शहराचे सौदर्य आणि त्यामुळे असलेली पर्यटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
========
हे देखील वाचा : दोन महाशक्तीमध्ये आता स्पेस वॉर…
========
व्हेनिस शहराची निर्मिती ही लुटारुंपासून वाचण्यासाठी करण्यात आली होती. 452 मध्ये हूणांच्या आक्रमणामुळे रोम पूर्णपणे नष्ट झाला होता. हूणांचे आक्रमण टाळण्यासाठी लोकांनी पुन्हा सरोवरातील बेटांवर आश्रय घेण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे येथे लोकसंख्या वाढू लागली. लोकसंख्या वाढली तेव्हा येथे मूलभूत व्यवस्थांची निर्मिती झाली. व्हेनिस 10 व्या शतकापर्यंत एक प्रमुख सागरी शक्ती बनले होते. व्हेनिसच्या व्यापाऱ्यांनी अरब, इजिप्त आणि ब्रिटनशी येथे व्यापारी संबंध वाढवले होते. व्हेनेशियन जहाजे पूर्वेकडून मसाले आणि रेशीम इंग्लिश चॅनेलच्या बंदरांवर घेऊन जात असत आणि तेथून लोकर आणि वाइन आणत. 1800 पूर्वी, व्हेनिस बंदर एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात होते. व्हेनिस (Venice Canal) चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. सुरुवातीला येथे तात्पुरती निवासस्थाने बांधण्यात आली होती जी फार काळ टिकू शकली नाहीत. त्यातूनच अनेक प्रयोग करण्यात आले, त्यात लाकडी प्लॅटफॉर्म तयार केल्यानंतर त्यावर बांधकाम सुरू झाले. आजही येथील घरे आणि इमारती या लाकडांच्या आधारावर उभ्या आहेत. अल्डर लाकूड पाण्यात कुजत नाही आणि शतकानुशतके पाण्यात बुडून राहू शकते. जेव्हा घरे बांधली गेली तेव्हा शहराच्या आत कालवे बांधले गेले. या कालव्यांच्या मदतीने लोक एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाऊ लागले. या वास्तुविशारदामुळे येथे बांधलेली घरे पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून येते. आता वर्ल्ड इंडेक्सच्या अहवालानुसार व्हेनिस हे जगातील सर्वात सुंदर शहर आहे. याच सुंदर शहराला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
सई बने