उत्तरप्रदेशच्या वाराणसी शहरात एक अनोखे शहर उभारण्यात आले आहे. वाराणसीच्या गंगानदीच्या किना-यावरील रेतीमध्ये हे शहर उभारले आहे. हे आहे तंबूंचे शहर (Tent City)…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहराचे उद्घाटन केले आणि उत्तरप्रदेशच्या पर्यटन व्यवसायाला आणखी एक सोनेरी कमान जोडली गेली. 15 जानेवारीपासून या तंबूंच्या शहरात पर्यटक येऊ लागले असून पुढच्या काही महिन्यांसाठी हे शहर बुकही झालं आहे. यात परदेशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. या अनोख्या तंबू शहराचे (Tent City) उदघाटन झाल्यानंतर या शहराला पाहण्याची स्पर्धा लागली होती. संध्याकाळी या परिसरात केलेली विद्युत रोषणाई पर्यटकांचे मन मोहून टाकते.
काशीतील या तंबूनगरीत धर्म आणि अध्यात्मासोबत पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. हे तंबू शहर 100 हेक्टरमध्ये बांधले आहे आणि यामध्ये 5 तारांकित हॉटेलसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात 4 प्रकारच्या कॉटेज आहेत. त्याचे भाडे 8 हजार रुपयांपासून सुरू असून ते 51 हजार रुपयांपर्यंत आहे. येथे एकावेळी 300 पर्यटक बसू शकतात. सर्वात महागडा ‘गंगा दर्शन व्हिला’ तंबू शहरात आहे. यात 200 पर्यटकांची क्षमता आहे. गेल्या काही वर्षात काशीला भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2022 मध्ये 7 कोटी पर्यटक काशीला आले आहेत. अशा परदेशी पर्यटकांसाठी हे तंबू शहर (Tent City) अधिक सुखदायी ठरणार आहे. त्यामुळेच बाबा विश्वथांची नगरी काशीमध्ये पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. पर्यटक येथे राहून गंगा आरती देखील पाहू शकणार आहेत.
या तंबूनगरीत मांस आणि दारूवर पूर्ण बंदी आहे. येथे स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हे तंबू शहर एखाद्या चांगल्या हॉटेलपेक्षा कमी नाही. तंबूंचे हे शहर (Tent City) काशी आणि पूर्वांचलच्या पर्यटनाला चालना ठरणार आहे. यासाठी बुकिंग ऑनलाइन आणि ऑफलाइनही करता येणार आहे. बुकिंगसाठी नमो घाटावर एक काउंटरही तयार करण्यात आला आहे. तंबू शहरात (Tent City) येणा-या पर्यटकांसाठी अप्रतिम योग केंद्रही बांधण्यात आले आहे. येथे पर्यटक गंगेच्या काठावर बसून योग आणि ध्यान देखील करू शकणार आहेत. या शहरात पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा आहेत. त्याचे भाडे 8,000 ते 51,000 रुपयांपर्यंत आहे. यासाठी बनारसच्या रविदास, नमो घाटावर बुकिंग काउंटरची सुविधा आहे. ऑनलाईन बुकींसाठी tentcityvaranasi.com ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइटला भेट देऊन, तुम्ही बुकिंगची सर्व माहिती मिळवू शकता आणि तुमचे तिकीट बुक करू शकता.
गुजरातमधील जैसलमेर आणि कच्छच्या रणामध्ये असलेल्या तंबू शहरापासून प्रेरणा घेऊन वाराणसीत हे अनोखं तंबू शहर (Tent City) उभारण्यात आले आहे. वाराणसी विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अभिषेक गोयल यांनी टेंट सिटीमुळे पूर्वांचलच्या पर्यटन उद्योगात नवा अध्याय जोडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीचा संगम असलेल्या गंगेच्या काठावर उभारण्यात आलेली ही तंबूनगरी म्हणजे पर्यटनाचा एक नवीन अध्याय आहे. येथे पूर्वांचलची अनेक उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत. जगप्रसिद्ध बनारसी साडीची प्रतिकृतीही सजावटीसाठी वापरण्यात आली आहे. दुसरीकडे चटई नगरी असलेल्या भदोहीच्या मंडपांमध्ये सुंदर गालिचे टाकण्यात आले आहेत. यामुळे पूर्वांचलच्या उत्पादनांना नवीन बाजारपेठ आणि रोजगारही मिळणार आहे.
========
हे देखील वाचा : महाराष्ट्रात Rapido ची सर्विस बंद करण्याचे बॉम्बे हायकोर्टाचे आदेश, नेमके काय आहे प्रकरण?
========
बनारसच्या शहरी कोलाहलापासून दूर असलेल्या या तंबू शहराचे (Tent City) सौदर्य पर्यटकांना सुखावणारे आहे. या तंबू शहराची लोकप्रियता आत्ताच एवढी वाढली आहे की, 20 जानेवारीपर्यंत, टेंट सिटीमधील सर्व 125 कॉटेजपैकी 75% बुकिंग झाले आहेत. यामध्ये डिलक्स एसी, प्रीमियम एसी, काशी सूट आणि सर्वात आलिशान गंगा दर्शन व्हिला कॉटेज या 4 श्रेणी पर्यटकांनी बुक केल्या आहेत. सर्वाधिक बुकिंग दक्षिण भारतीयांकडून 55% आणि यूएसए, जर्मनी, कॅनडा आणि यूकेमधून 30% करण्यात आल्या आहेत. प्रवेग टेंट सिटी आणि निरॉन टेंट सिटी या दोन खासगी कंपन्यांनी तंबू शहराची रचना केली आहे. या तंबू नगरीत बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट, स्पोर्ट्स एरिया, दुकाने, ओपन एरिया कॅफे, गेस्ट रूम, लाईव्ह म्युझिक शो आदी सुविधा आहेत. यासोबतच श्रीकाशी विश्वनाथ दर्शन, सारनाथ सहल, घाट आणि बीएचयू कॅम्पस व्हिजिट यांचाही या सर्वांचा पॅकेजमध्ये समावेश असणार आहे. या तंबूंच्या शहरात (Tent City) सर्व 125 कॉटेजची रचना मंदिर आणि कॉटेज म्हणून करण्यात आली आहे. येथे एक बँक्वेट हॉल देखील आहे. तसेच पर्यटकांसाठी एक रेस्टॉरंट आणि कॅफेटेरिया देखील आहे. येथे स्थानिक संगीतकार पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. या तंबू शहरात असलेले रिसेप्शन रूम चित्रांनी सजवण्यात आले आहे. येथे लग्नसोहळेही करता येणार आहेत. यासाठी बँक्वेट हॉल बनवण्यात आले आहेत. एकूण उत्तर प्रदेश सरकारानं पर्यटनाच्या वाढीसाठी अनेक प्रकल्प केले आहेत. त्यात गंगा विलास क्रूझ आणि आता या तंबू शहराचा समावेश झाला आहे.
सई बने