आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू समाज हा अल्पसंख्याक आहे. या अल्पसंख्याक हिंदू समाजावर पाकिस्तानमध्ये होणारे हल्ले हा चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानमध्ये राहणा-या हिंदू तरुणींची अवस्था तर अतिशय बिकट आहे. अनेक अल्पवयीन तरुणींना पळवून त्यांचे जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करण्यात येत आहे. शिवाय लहान वयातील या मुलींचे लग्नही जबरदस्तीनं करण्यात येत आहे. (Pakistani Tulsi Meghwar)
या अत्याचाराबाबत नुकताच पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. ही बातमी जेव्हा आली, तेव्हाच पाकिस्तानातील एका धाडसी मुलीचीही चर्चा सुरु झाली आहे. ही 21 वर्षीय तरुणी हिंदू आहे. तिचं नाव आहे तुलसी मेघवार. या हिंदू तुलसीच्या नावाची चर्चा सध्या सगळ्या पाकिस्तानमध्ये चालू आहे. कारण या तुलसीनं पाकिस्तानचे नाव आंतराष्ट्रीय क्रीडा प्रकारात उज्ज्वल केले आहे.
पाकिस्तानमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांची चर्चा होत असतांना दुसरीकडे तुलसी मेघवार या 21 वर्षीय तरुणीनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुलसी ही एक बेस बॉल खेळाडू आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खेळून तुलसीनं आपल्या देशाचे म्हणजे, पाकिस्तानचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशाला अनेक आयाम आहेत. (Pakistani Tulsi Meghwar)
कारण ज्या पाकिस्तानमध्ये मुस्लिम तरुणींवर अनेक बंधने आहेत, तिथे एका हिंदू कुटुंबातील मुलींनी पुढे येऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तुलसी मेघवार ही पाकिस्तानची पहिली हिंदू महिला खेळाडू ठरली आहे. तुलसी ही बेस बॉल आणि सॉफ्ट बॉल खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ती यशस्वी झाली आहे. सध्या तुलसी पाकिस्तानी बेस बॉल आणि सॉफ्टबॉल संघामध्ये खेळत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघाचा भाग असलेली तुलसी, संघात महत्त्वाची खेळाडू आहे.
तुलसी ही पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या हिंदू समाजातील मेघवार या समाजातील आहे. मेघवार समाज हा मुलींच्या शिक्षणाबाबत अत्यंत कठोर धोरण ठेवत असलेला समाज मानण्यात येतो. त्यातच पाकिस्तानात राहत असलेल्या हिंदू तरुणींना घराबाहेर पाठवण्यास पालक नाखूश असतात. या तरुणींचे कधीही अतिरेक्यांकडून अपहरण होईल, अशी भीती असते. (Pakistani Tulsi Meghwar)
त्यामुळे या सर्व समस्यांवर मात करत तुलसीनं आपल्या देशासाठी मोठे यश संपादन केले आहे. तुळसीचा जन्म सिंध प्रांतातील कोत्री येथील साधू पारो परिसरात झाला आहे. हा परिसर सिंधू नदीच्या काठावर आहे. तुलसीचे वडील हरजी लाल हे पत्रकार असून एका सिंधी वृत्तपत्रासाठी काम करतात. तुलसीच्या या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
मेघवार समाजातील अनेकांनी तुलसीच्या शिक्षणावार आक्षेप घेतला होता. हरजी लाल यांच्या कुटुंबातही त्यांना मुलीच्या शिक्षणावरुन विरोध झाला होता. पण हरजी लाल यांनी तुलसीला शिक्षणासाठी प्रवृत्त केले आणि तिच्या खेळातही तिला साथ दिली. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार पाहून अनेक कुटुंबानी मुलींचे शिक्षण बंद केले आहे. पण या अत्याचाराविरोधात हरजी लाल खंबीरपणे उभे राहिले. (Pakistani Tulsi Meghwar)
===========
हे देखील वाचा : युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाच्या पत्नीवरच विषप्रयोग
===========
त्यामुळे शालेय जीवनापासून तुलसी अभ्यासाबरोबर खेळातही पुढे होती. 2016 मध्ये सहावीतील तुलसीनं एका राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा शिबिरात भाग घेतला. त्यात तिचा खेळ पाहून तिची प्रशिक्षणासाठी निवड झाली. तेथूनच तुलसीचा प्रवास सुरु झाला. आतापर्यंत तुलसीने सहा वेळा नॅशनल गेम्स आणि तीन वेळा आशियाई गेम्स खेळले आहेत. सध्या ती पाकिस्तानच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्याची तयारी करत आहे. तिचे यश बघितल्यावर आता तिच्या शिक्षणावर आक्षेप घेणारा मेघवार आणि हिंदू समुदाय तिच्या बाजुनं भक्कमपणे उभा राहीला आहे. (Pakistani Tulsi Meghwar)
तुलसीनं जेव्हा बेसबॉलचा सराव करायला सुरुवात केली तेव्हा तिला मैदान उपलब्ध झाले नव्हते. मैदानात जेव्हा सराव करायची संधी मिळाली, तेव्हा तिथे मुलांचे प्रमाण जास्त असायचे. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मुली खेळाडू म्हणून सराव करत असत. सुरुवातीला खेळतांना अडचण वाटत असे. पण नंतर या सर्वांवरुन लक्ष काढून तिनं आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केले आणि यश मिळवले.
सई बने