Home » कसा ‘अमूल दूध ब्रँड’चा यशस्वी प्रवास?

कसा ‘अमूल दूध ब्रँड’चा यशस्वी प्रवास?

by Correspondent
0 comment
Share

आपल्याला आजही घराघरात ‘अमूल’ दूध पहायला मिळतं. लहान असल्यापासून टी.व्हीवर अमूलची एकच जाहिरात आपण बघतोय. अगदी आजही अमूलच्या जाहिरातीची तीच टॅगलाईन. ‘अमूल दूध पिता है इंडिया’. त्यामुळे तोंडपाठच झाली आहे म्हणा. पण तुम्हाला माहितेय का अमूल दूध घरी पोहचवण्यात सिंहाचा मोठा वाटा कोणाचा आहे? कसा सुरू झाला ‘अमूल दूध’ ब्रँडचा प्रवास?

भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीज कुरियन यांचा आज स्मृतीदिन.

अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता. ‘ ऑपरेशन फ्लड’ सुरू करणार्‍या कुरियन यांनी अमूल डेरी उत्पादन घराघरात पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.आणि अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला.

 शाम बेनेगल यांच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने ‘मंथन’ हा चित्रपटातून त्यांच्या कार्याचा गौरव केला.विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा बेनेगल यांच्यासह कुरियन यांनीही लिहिली होती, तर ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांची पटकथा होती. कुरियन यांच्या ‘आय टू हॅड अ ड्रीम’ या आत्मचरित्राचा सुजाता देशमुख यांनी ‘माझंही एक स्वप्न होतं’ या नावाने अनुवाद केला आहे.

जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये दुधाचा प्रमुख स्त्रोत हा गायीपासून येतो. भारतात मात्र परिस्थिती भिन्न आहे. आपल्याकडे म्हशीचे प्रमाण खूप आहे. यामुळे शिल्लक दुधापासून भुकटी तयार करणे शक्य होते. मात्र यासाठी लाभणारे तंत्र विकसित झाले नव्हते. इकडे न्यूझिलंड, हॉलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दुग्ध उत्पादनातील अग्रेसर देशांमधील शास्त्रज्ञांनीही म्हशीच्या दुधापासून भुकटी बनविणे अशक्य असल्याचे जाहीर केले होते. मात्र डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करून जगाला चकीत केले.

अत्यंत कुशाग्र बुध्दीच्या कुरियन यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते तेव्हा त्यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. याप्रसंगी झालेल्या मुलाखतीत एका परिक्षकाने त्यांना ‘पाश्‍चरीकरण म्हणजे काय?’ हा प्रश्‍नविचारला. यावर त्यांनी ‘ही प्रक्रिया म्हणजे दुधाचे निर्जंतुकीकरण करून त्याला दीर्घ काळापर्यंत टिकवणे’ असे अचूक उत्तर दिले. यामुळे कुरियन यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली. मात्र त्यांना एक अट टाकण्यात आली. या अंतर्गत त्यांना मिशिगन विद्यापीठात दुग्ध विकास आणि दुग्ध उत्पादनाचा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत रूजू व्हावे लागेल. त्यांनी भारतात परतल्यावर शासकीय सेवा न केल्यास दंड म्हणून ३० हजार रूपयांची परतफेड करण्याची अटही शिष्यवृत्तीच्या करारनाम्यात टाकण्यात आली होती. अर्थात त्या काळात ही रक्कम खूप मोठी असल्याने अमेरिकेतून पदवी मिळाल्यानंतर २८ वर्षांचा हा युवक गुजरातमधील आणंद येथे येऊन पोहचला.

मुंबईसारख्या शहराच्या दुधाची गरज गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील दुध उत्पादक पुरवत होते. यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र या व्यवहारातील सर्व नफा हा ‘पोल्सन’ या खासगी कंपनीच्या घशात जात होता. पेस्टनजी एडुलजी हा पारशी व्यापारी यातून गबर झाला असला तरी गरीब दुध उत्पादकांच्या पदरात फार काही पडत नव्हते. यामुळे सरदार पटेल आणि मोरारजी देसाई यांच्या प्रेरणेने त्रिभुवनदास पटेल यांनी १९४६ साली आणंद येथे देशातील प्रथम सहकारी दुग्ध उत्पादन संस्था सुरू केली. तत्कालीन ब्रिटीश शासनाकडून या चळवळीला सहकार्य मिळाले नाही. इकडे पोल्सन कंपनीनेही आडमुठी भूमिका घेतली. यामुळे या कंपनीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी खेडा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी १५ दिवस आंदोलन करून अखेर ‘पोल्सन’ला नमती भूमिका घ्यावी लागली.

शेतसारा प्रकरणी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच खेडा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या प्रकरणी आपल्यातील लढावू प्रवृत्ती दाखवून दिली. दरम्यान, स्वातंत्र्य मिळाले अन् याच कालखंडात डॉ. कुरियन हे आणंद येथे पोहचले. त्यांच्यातील चमक त्रिभुवनदास पटेल यांची तात्काळ जोखली. यामुळे सहकारी चळवळीचे नेतृत्व पटेल यांचे तर प्रशासकीय व्यवस्थापक कुरियन अशी अफलातून जोडी जमली. या जोडगोळीने खेडा जिल्हाच नव्हे तर देशाच्या दुग्ध उत्पादनाला एक नवीन दिशा दिली.

लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची (NDDB) स्थापना केली व डॉ. कुरियन यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. देशाच्या कानाकोपर्‍यात हा कार्यक्रम राबवला गेला आणि श्वेतक्रांती झाली. या कार्यक्रमांतर्गत स्किम मिल्क, कंडेस्ड मिल्क गायीच्या दूधाऐवजी म्हैशीच्या दूधापासून बनवायला सुरूवात केली आणि दोन दशकातच डॉ. कुरियन आणि त्यांच्या टीमने भारताला दूध आयात करण्याच्या देशाच्या रांगेतून काढून दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची निर्यात करणार्‍या देशांच्या पंक्तीत नेवून ठेवले.

मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण (इ.स. १९९९), जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.