मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबापुरीची ओळख म्हणून पहिलं जे नाव पुढे येतं ते म्हणजे, मुंबईची लोकल. अवघी मुंबई या लोकल ट्रेनवर अवलंबून असते. १६ एप्रिल १८५३ रोजी पहिल्या रेल्वे मार्गावर ट्रेन धावली. मुंबई उपनगरीय रेल्वेची ही सुरुवात मुंबईला एक वेगळी ओळख देऊन गेली. मुंबईपासून ३४ किमी अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत ही पहिली ट्रेन धावली. तेव्हा ट्रेन म्हणजे, एक अजूबाच होता. पण आता हिच लोकल ट्रेन मुंबईची मुख्य व्यवस्था झाली आहे. जरा पाऊस पडला आणि ट्रेनचा खोळंबा झाला की अवघी मुंबई घरी बसते. या लोकल ट्रेनची सुरुवात ब्रिटीशांनी केली. त्यामुळे ब-याच रेल्वे स्टेशनची नावं ब्रिटीश अधिका-यांवरुन ठेवलेली आहेत.
ब्रिटीश भारतातून गेले. भारत देश स्वतंत्र झाला. पण त्यांनी दिलेली नावं मात्र अद्यापही मुंबईमधील रेल्वे स्थानकांना आहेत. आता त्यांची नावंही मुंबईकरांच्या अंगवळणी पडली आहेत. आता या इंग्रजाळलेल्या नावांना बदलण्याचा निर्णय महराष्ट्र राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबई परिसरातील सात लोकल रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकांची पूर्वी असलेल्या नावांमागे असलेल्या कथाही उत्सुकतापूर्ण आहेत. (Mumbai Railway Stations)
मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधान परिषदेने मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार करी रोड स्थानकाचे नाव लालबाग, स्टेशनसँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी, मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नी रोडचे गिरगाव, कॉटन ग्रीन चे नाव काळाचौकी, डॉकयार्ड रोडचे नाव माझगाव आणि किंग्ज सर्कलचे तीर्थंकर पार्श्वनाथ असे करण्यात येणार आहे. यातील काही नाव ब्रिटीश कालीन आहेत.
ज्या ब्रिटीश अधिका-यांचा समावेश मुंबईच्या आणि रेल्वे मार्गाच्या जडणघडणीमध्ये होता, त्यांची नावं संबंधिक रेल्वे स्थानकांना देण्यात आली होती. मात्र आता ब्रिटीश राज्य संपले तरी त्यांचीच नावं आपण का वापरतो, असी विचारणी होत होती. लोकभावनेचा मान ठेवत राज्य सरकारनं या नावांना बदलले आहे. (Mumbai Railway Stations)
या सात स्थानकांची नावे कशापद्धतीनं ठेवली होती, हे जाणून घेऊया. यात पहिलं येतं ते करी रोड स्थानक. मध्यरेल्वेवर असलेलं हे महत्त्वाचे स्थानक आता लालबाग रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. करी रोड हे नाव एका ब्रिटीश अधिका-याच्या नावावरुन घेण्यात आले आहे. ब्रिटीश रेल्वे अधिकारी चार्ल्स करी याच्या नावावरुन करी रोड स्थानक हे नाव पडले होते. हे स्थानक ब्रिटीशांनी त्याकाळी फक्त घोड्यांसाठी बांधले होते, हे ऐकून आश्चर्य वाटेल. करीरोड स्थानकावर घोड्यांना उतरण्यासाठी एक उताराचा रस्ता आहे. पुणे आणि लोणावळा येथून घोड्यांना ट्रेननं आणलं जायचं. त्यानां करीरोड स्थानकात उतरवून पुढे रेसकार्स पर्यंत नेण्यात येत असे.
सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी स्थानक होणार आहे. या सॅंडहर्स्ट नावाचा ब-याचवेळा अपभ्रंश केला जातो. बोली भाषेत या स्थानकाला संडासरोड असे म्हटले जाते. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सॅंडहर्स्ट यांच्यावरुन हे नाव देण्यात आले होते. मुंबईत आलेल्या मलेरियाच्या साथीत त्यांनी चांगले काम केले होते. त्यामुळे बक्षिस म्हणून त्यांचे नाव रेल्वे स्थानकाला आणि एका रस्त्याला देण्यात आले होते. आता ही दोन्हीही नावं बदलण्यात आली आहेत. यापुढे मरीन लाईन्सचे नाव मुंबादेवी देवीच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. (Mumbai Railway Stations)
19व्या शतकातील ब्रिटीश मरीन बटालियनच्या काही इमारतींचे हवाई दलाच्या सैनिकांसाठी क्वार्टरमध्ये रूपांतर करण्यात आले. त्यावरुनच रेल्वे स्थानकाला मरीन लाईन्स हे नाव मिळाले. आता मुंबईची ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबादेवीच्या नावानं हे स्थानक ओळखलं जाणार आहे. चर्नीरोड या प्रसिद्ध स्थानकाचे नाव गिरगाव होणार आहे. त्याकाळी मुंबईमध्ये हिरवाई मोठ्या प्रमाणात होती. मात्र या हिरवळीवर चरणा-या गुरांसाठी ब्रिटीश अधिकारी त्यांच्या मालकांकडून कर वसूल करत असत. याविरोधात नाराजी होती. त्यामुळे सर जमशेटजी जीजीभॉय यांनी परिसरात जनावरे चरण्यासाठी मोठा भूखंड विकत घेतला. तेव्हापासून हा परिसर चर्नीरोड म्हणून ओळखला जाऊ लागला. तेच नाव या स्थानकाला मिळाले. (Mumbai Railway Stations)
====================
हे देखील वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणे १ एप्रिल पासून महागणार, १८ टक्क्यांनी वाढणार टोल
====================
आता हे स्थानक गिरगाव म्हणून ओळखले जाणार आहे. कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव काळाचौकी होणार आहे. यामागची कहाणी आश्चर्यचकीत करणारी आहे. सेंट थॉमस चर्च आणि त्याभोवती मोठी झाडी असा हा परिसर होता. या जवळच असलेल्या बंदरावर मोठ्या प्रमाणात कापूस आलेला असायचा. या सर्वाचा मेळ होऊन स्थानकाला कॉटन म्हणजेच कापूस आणि परिसर हिरवा म्हणजेच ग्रीन असे कॉटन ग्रीन नाव मिळाले.
अशीच कथा डॉकयार्ड नावामागे आहे. ब्रिटीश काळात येथील डॉकयार्डचा वापर जहाज बांधणी आणि दुरुस्तीसाठी केला जात असे. तेच नाव रेल्वेस्थानकला देण्यात आले. आता हे स्थानक माझगावच्या नावानं ओळखलं जाणार आहे. यातील शेवटचे रेल्वे स्थानक आहे किंग्ज सर्कल. याच स्थानकाच्या परिसरात किंग जॉर्ज पंचमची बोट ठेवलेली होती. त्यामुळे राजाचा मान ठेवत रेल्वे स्थानकाचे नाव किंग सर्कल ठेवण्यात आले. आता हे स्थानक तीर्थंकर पार्श्वनाथ म्हणून ओळखले जाणार आहे. (Mumbai Railway Stations)
सई बने