‘प्रत्येक कथाकथनाला एक शैली असावी लागते. त्यातूनच एका लेखकाचे काम दुस-या लेखकापेक्षा वेगळे ठरत असते. पण आपल्या चित्रपटांना आणि त्यांच्या दिग्दर्शकांना काहीच फरक पडत नाही. व्यक्तिगत शैलीच्या अभावामुळे एक चित्रपट दुस-या चित्रपटासारखाच वाटतो. भारतीय चित्रपटांची सुरुवात होऊन आता काही वर्षं झाली आहेत; पण मूठभर चित्रपट हाताशी येतात, ज्यात आपल्याला दिग्दर्शकाच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आणि शैलीची चुणूक दिसते.’
(‘हिंदुस्तानी सनत ए फिल्मसाज़ी पर एक नज़र’/ बाॅलीवूडने काय करायला हवे?’)
सआदत हसन मंटोने आपल्या लेखात भारतीय चित्रपट दिग्दर्शकांची ऐशीतैशी करत रोखठोक मतं मांडली आहेत. भारतीय बोलपटाला जेमतेम अडीच दशकं झालेली असताना मंटोने केलेली टीकाटिप्पणी अति परखड आहे असं वाटतं. परंतु मंटोच्या लेखनाची ती शैली होती. स्पष्टवक्तेपणाला सखोल अभ्यासाची जोड होती. भारतीय दिग्दर्शकांवर टीका करताना तो हाॅलिवूडमधील दिग्दर्शकांच्या व्यक्तिगत शैलींची अनेक उदाहरणं देतो. परंतु त्याच वेळी भारतीय दिग्दर्शकांमधील देवकी बोस आणि व्ही. शांताराम, प्रभात कंपनी यांचं मुक्त शब्दांत कौतुक करतो. त्यांच्या कामगिरीची नोंद घेताना मंटो लिहितो.
‘राजरानी मीरा, पूरन भगत, आफ्टर दि अर्थक्वेक आणि विद्यापती या सगळ्या चित्रपटांत बोस यांची स्वप्नाळू दृष्टी तुम्हांला दिसते. तसेच, भव्यतेचे आकर्षण आणि विविध संदर्भांना एकत्र बघणे या शांताराम यांच्या दोन लाडक्या संकल्पना आपण कायमच बघत आलेलो आहोत. जो चित्रपट हे दोन्ही न थकता दाखवतो, तो प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट आहे, असे आपण लगेच ओळखू शकतो. म्हणूनच ते आपले सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक आहेत. नितीन बोस या यादीत नाहीत; कारण ख-या अर्थाने ते दिग्दर्शक नाहीत तर भपकादार शोमन आहेत.’
(‘हिंदुस्तानी सनत ए फिल्मसाज़ी पर एक नज़र’/ बाॅलीवूडने काय करायला हवे?’)
मंटोच्या या वक्तव्यावरून एका चांगल्या दिग्दर्शकाची व्याख्या कशी असावी याबद्दल काही मुद्दे स्पष्ट होतात. जरी मंटोची ही वैयक्तिक मतं असली तरी ती भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या इमेजसंदर्भात आजही काही प्रश्न निर्माण करतात.मंटोच्या लेखांमधून त्याची अफाट अभ्यासूवृत्ती दिसून येते. साहित्य आणि कलाक्षेत्राकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा, त्याबद्दल वेगवेगळ्या पैलूंतून विचार करण्याचा स्वभाव बनत गेल्यामुळे मंटो एक चिकित्सक लेखक-पत्रकार या रूपात उदयाला आला. मुंबईच्या मायानगरीत काम करत असताना त्याची ही मर्मभेदक दृष्टी एकूण होणारे बदल टिपत होती. मुंबईत राहात असताना ‘मुसव्विर’ या सिनेमासिकाचा संपादक म्हणून तो काम पाहत होता. त्यामुळे अनेक प्रकारची इतर मासिक वाचण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याचा व्यासंग वाढत गेला. आपल्या कामाचा आणि आपल्या व्यासंगी वृत्तीचा ताळमेळ कसा घालायचा याबद्दलची शहाणी समज त्याच्याजवळ होती.
खरंतर मंटोचं मूळचं संयुक्य कुटुंब हे उच्चशिक्षित आणि ब-यापैकी श्रीमंत असं होतं. मंटोचे वडील सबजज् होते. त्याचे दोन मोठे सावत्र भाऊ बॅरिस्टर झाले. एक मोठे भाऊ लाॅ जर्नलकरता सहसंपादक म्हणून काम बघत असत. एक बॅरिस्टर बंधू पुढे लाॅ काॅलेजचे उपप्राचार्य बनले. कालांतराने दोन भाऊ पूर्व आफ्रिकेत गेले. कायदा आणि धर्म यासंबंधीचा अभ्यास हा त्याच्या घरामध्ये चालू असे. परंतु सर्वात लहान असलेला मंटो मात्र सर्वांपेक्षा निराळा होता. पुस्तकी अभ्यासापेक्षा बाहेरच्या जगात तो जास्त रमत असे. भोवतालाचं निरीक्षण, अवलोकन करत असे. हाती गवसलेल्या लेखणीचा वापर करताना, या अवलोकनातूनच जाणवलेलं वास्तव त्यानं मांडलं. औपचारिक शिक्षणात तो आपल्या भावंडापेक्षा खूपच मागे राहिला, पण त्याची सर्जनशीलता मात्र त्याला त्याचं वेगळं अस्तित्व देऊन खूप पुढे घेऊन गेली.
वंशपरंपरेनं त्याला जी बुद्धिमत्ता मिळाली होती, तिचा वापर काही विस्फोटक करण्याऐवजी काही निर्मितीशील करण्याकडे वळल्यामुळे मंटोला कलाक्षेत्रात एक ओळख मिळाली. त्याच्या लेखनात त्याच्या बुद्धिमत्तेचं प्रतिबिंब दिसतं. म्हणूनच त्याचं लेखन वेगळं वाटतं. भाबडं आणि वरवरचं वाटत नाही.वर उल्लेख केलेल्या लेखात त्याने चित्रपटाचं तंत्रं आणि मंत्र याबद्दल जी विधानं केली आहेत, ती मंटोच्या निरीक्षणशक्तीची, अभ्यासाची द्योतक आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शक हा किती महत्त्वाचा घटक आहे, हे सांगताना याच लेखात तो पुढे खलनायक आणि कलाकाराचा अभिनय याबद्दलही भाष्यं करतो.
मंटोच्या मते, आपल्याकडील दिग्दर्शकांकरता नायक-नायिका ह्यांच्यापाठोपाठ खलनायक हेच एक पात्र महत्त्वाचं असतं. (आणि अद्यापही तीच समजूत, तशीच आहे.) निर्माता आधी या तिघांची निवड पक्की करतो, मग त्यांच्या अनुषंगाने इतर काही येतं. इतका ढोबळपणा भारतीय सिनेमात आहे. जो हिंदी आणि प्रादेशिक सिनेमात अजूनही ब-याच प्रमाणात चालू आहे.
आपल्या कथानकांतील काळ्या आणि पांढ-या अशा ठाशीव, बटबटीत वर्गीकरणाच्या व्यक्तिरेखा मंटोला मान्य नाहीत. नायक-नायिका सुंदर, नायक देवदूताचे गुण असलेला, नायिका अष्टसात्त्विक नायिकांसारखी आणि खलनायक कायमच गुन्हेगार हे चित्र तो पूर्णतः अमान्य करतो. सिनेमातील पात्रांचे पाय जमिनीवर रोवलेले असायला हवेत असं त्याला वाटतं.आपल्या साहित्यातील 80% स्त्रीचित्रण म्हणजे भ्रामक कल्पना असल्याचं तो सांगतो.भारतीय सिनेमांतील नायक, नायिका आणि खलनायक हे संहितेची गरज म्हणून निर्माण केलेले निर्जीव पुतळे आहेत, असं ठाम विधान तो मांडतो.
भारतीय सिनेमाच्या पंचविशीत मंटोने लिहून ठेवलेली ही निरीक्षणं, भारतीय सिनेमाची पन्नाशी, पंचाहत्तरी आणि शंभरी झाली तरी किती यथार्थ वाटतात. हिंदी आणि प्रादेशिक सिनेमाने नंतर काही प्रमाणात का होईना नक्कीच कात टाकली. समांतर, वास्तववादी, मिश्र असे अनेक प्रवाह निर्माण केले. परंतु हिंदी किंवा भारतीय सिनेमा म्हणजे मसालेदार, ठोकळेबाज, उथळ मनोरंजन करत बाॅक्स ऑफीस हिट देणारा सिनेमा अशीच एक ढोबळ प्रतिमा बनत गेल्याचं दिसून येतं.
मंटो स्वतः एक उत्तम कथालेखक होता. त्याच्या कथेवर आधारित पहिला भारतीय रंगीत हिंदी चित्रपट आपटला तरी त्याचं इतिहासातलं महत्त्व कमी होत नाही. नंतरही त्यानं काही चित्रपटांकरता कथा लिहिल्या. कथा या फाॅर्मची त्याला योग्य जाण होती हे त्याच्या या उद्गारांवरून कळून येतं.
‘कथा या बुद्धिबळाच्या पटावर खेळण्यासाठी नसतात, जिथे प्रत्येक सोंगटीची जागा आणि चाल ठरलेली असते. कथेचा अवकाश संपूर्ण जग असते आणि तिथे अगणित शक्यता अस्तित्वात असतात. कथावस्तू, नायक, दुय्यम नायक, नायिका, दुय्यम नायिका, खलनायक दुय्यम खलनायक.मदनिका, दुय्यम मदनिका — या सर्वांखेरीजही कथा लिहिता येतात.फक्त थोडीशी समज असण्याची गरज आहे.’
(‘हिंदुस्तानी सनत ए फिल्मसाज़ी पर एक नज़र’/ बाॅलीवूडने काय करायला हवे?’)
कथालेखकांकरता मंटो थोडक्यात पण महत्त्वाचं असं बरंच काही सांगून गेला आहे. मुंबईत येण्यापूर्वी अमृतसरमधील कुमार वयातील, तारुण्याच्या उंबरठ्यावरील वास्तव्यात मंटोनं केलेलं अमाप वाचन, त्याच्याकडे उपजत असलेली प्रतिभाशक्ती, सर्जनशीलता यांचा संगम पुढील वर्षांत त्याच्या लेखणीतून उतरलेल्या लेखनात दिसून येतो.
मंटोकडे कथालेखनाची ही समज होती, म्हणूनच आज मंटोच्या कथा, तुलनेनं कमी असूनही भारतीय साहित्यामध्ये स्वतःचं स्थान अबाधित राखून आहेत. लेखनाची ही समज केवळ त्याच्या कथांमध्येच नव्हे तर इतरही लेखनात दिसून येते.
बाॅलिवूड अर्थात मुंबईतील मायानगरीच्या ओढीने मुंबईत आलेला, तिथेच नोकरी करणारा मंटो काही वर्षांतच इथल्या दिखाऊ चमचमाटाला कंटाळला. हे आभासी, खोटं जग आहे, हे अर्थातच त्याला माहीत होतं, पण तरीही त्यातून कलात्मक आणि वास्तववादी याचा मेळ असलेलं काही लोकांपर्यंत जावं असं त्याला वाटत होतं. पण तसं होत नव्हतं.
आजही फार कमी प्रमाणात होत असल्याचं दिसतंय. उलट या फिल्मक्षेत्रात आता फॅशनची, जाहिरातींची दुनिया आणि इतर अनेक वेगवेगळे प्रवाह येऊन मिळाल्यामुळे तिचा मूळ प्रवाह अधिकच बेगडी आणि पक्त पैसाकमावू वृत्तीचा झाला आहे. त्यातून समाजविघातक अशा गुन्हेगारी वर्गाचा उदय, त्यांचा पैसा, त्यातून निर्माण झालेल्या समस्या हे आज आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. हजारोंच्या रोजीरोटीचा व्यवसाय झालेलं असं हे कलात्मक सिनेमाक्षेत्र, ह्याचा केवळ धंदा झाला. पंचाहत्तर वर्षांपूर्वीच ह्याची हळूहळू सुरुवात झाली होती.
मंटोने हे पाहिलं, अनुभवलं. त्याला या सगळ्याचं वाईट वाटत असे. खंत वाटण्याच्या या भावनेतूनच त्याने एक औपरोधिक लेख लिहिला, ‘मैं फ़िल्म क्यों नहीं देखता / मी बाॅलिवूड सहन का करू शकत नाही?’
मंटोच्या या लेखाविषयी आणि इतरही काही … पुढील लेखात.
(क्रमशः-)
(लेखातील मंटोची अवतरणे-संदर्भ — ‘मी का लिहितो?’
— संपादन श्री. आकार पटेल,- अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, २०१६)
———- © डाॅ निर्मोही फडके.