‘कधीपासून माझी अशी तीव्र इच्छा होती की कोणीतरी मला विचारावे, ‘तू चित्रपट का पाहत नाहीस?’
(मैं फिल्म क्यों नहीं देखता’/ मी बाॅलिवूड सहन का करू शकत नाही?)
एखादी गोष्ट अतिशय आवडीची असावी आणि कालांतराने त्या गोष्टींबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अशा वेळी निर्माण होणारी उलघाल ही अतिशय यातना देणारी असते.
फिल्मलाईनमध्येच जगणारा मंटो, फिल्म बघणंच बंद करतो तेव्हा त्याने लिहिलेल्या वरील औपरोधिक उद्गारामागे त्याच्या मनाची ही उलघाल स्पष्ट होते. अनुवादक आकार पटेल ह्यांनी मंटोच्या या लेखनाला विनोदी फीचर असं म्हटलं आहे. त्यांच्या मते, एवढा दीर्घ लेख लिहूनही मंटोने जे कारण नमूद केलं आहे ते अगदीच फालतू आहे. या लेखाकरता प्रत्येक शब्दानुसार मंटोला मानधन दिलं गेलं असेल असं त्यांना वाटतं. तरीही मंटोच्या या मनोरंजक वाटणा-या लेखामागील ब्लॅक ह्यूमर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि मानसिकतेतचे अनेक पैलू दाखवतात.
मंटोने या लेखात दिलेली उदाहरणं वरवर पाहता बाळबोध वाटतात. असं असलं तरीही ह्या लेखातून मंटोने तत्कालीन मायानगरीबद्दल केलेली विडंबनात्मक भाष्यं अनेकार्थांनी वाचकांचं मनोरंजन करतात.
चाळीसच्या दशकातील नायिका शांता हुबळीकर, नसीम बानू, वीणा, रागिणी ह्यांचा उल्लेख करून, आता ह्यांची शरीरं आपल्या उत्सुकतेचा विषय नसल्याचं नमूद करतो. एडी पोलो, जाॅन गिलबर्ट, मेरी पिकफोर्ड, ग्लोरिया स्वान्सन इत्यादी अनेक पाश्चात्त्य कलाकारांची कामं आणि त्यांची वैयक्तिक माहितीही जपून ठेवणारा मंटो स्वतःला या सगळ्यांपासून दूर करतो.
मंटोच्या चरित्रावर एक नजर फिरवली तर लक्षात येतं की, एकाच ठिकाणी रमणारं असं हे व्यक्तिमत्त्व नाही. उण्यापु-या ४३/४४ वर्षांचं आयुष्य हा माणूस भरभरून जगला, विमुक्तपणे.’कोऽहम्’, मी कोण आहे हा प्रश्न अनेकांसारखा त्यालाही छळत होता. पण या अनेकांतले कित्येक जण कालांतराने ह्या प्रश्नाचा मागोवा घेण्याचं थांबवतात. मंटोने तो शोध चालूच ठेवला, आपल्या लेखनातून. आपल्या जगण्यातून. म्हणूनच कदाचित तो अस्वस्थ राहिला. अस्थिर राहिला. कुठलीही एकच गोष्ट आपल्या जगण्याशी कायमस्वरूपी बांधून घेणं त्याला पसंत नव्हतं, असं त्याच्या चरित्रावरून दिसतं.
मंटोच्या चरित्रात एक असा उल्लेख आहे की, ‘क्या फ्राॅड है’ असं बोलायची एक सवय त्याला होती. परंतु ऊठसूट नव्हे. कधी कुणाला प्रेमाने तर कधी उपरोधाने तो असं म्हणत असे.मुंबईच्या मायानगरीत रमूनही शेवटी बहुतेक हा सगळा फ्राॅड आहे असं त्याला वाटू लागलं असावं.
ह्या फिल्मी दुनियेत काम मिळावं म्हणून त्याने अनेक वा-या केल्या. तिथपासूनच या काल्पनिक जगातील फ्राॅडशी आपले धागे त्याने जुळवले. या आभासी जगात शिरताना जे अनुभव आले त्यांतील काहींचं अनुभवकथन मंटो करतो. ते वाचताना जाणवतं की, वरवर पाहता हे विनोदी आणि अगदी साधे, भाबडे अनुभव आहेत. पण तसं नाही.
उदाहरणार्थ, फिल्म स्टुडिओत प्रवेश करण्याच्या प्रसंगाविषयी तो लिहितो,’तेवढ्यात एक प्रचंड मिशा असलेला माणूस देवाचे कपडे घालून अवतीर्ण झाला. मी ज्या गेटमधून आत आलो होतो त्या गेटकडे चालायला लागला, एवढ्यात एका जबरी आवाजाने त्याला थांबवले. “कंपनीची मालमत्ता घेऊन कुठे चालला रे तू?” त्या आवाजाने त्याच्याकडे मागणी केली. देव आता घाबरला होता आणि रडक्या सुरात म्हणाला, ” काय म्हणताय काय मालक?”तो मालक मला साक्षात इंद्रदेवच वाटला, तो त्याला काहीशा उर्मटपणे म्हणाला,
“मूंछ किसका है?”
देवाने, मालकाने उल्लेख केलेला तो चेह-यावरच्या केसांचा झुपका पिळत, मोठ्या गर्वाने म्हटले, “मालक, या ख-या आहेत.”
मालकाची खातरी पटली आणि मग त्याने आज्ञा केली, “तुम जाने को सकता,” आणि देव गेला.’
(मैं फिल्म क्यों नहीं देखता’/ मी बाॅलिवूड सहन का करू शकत नाही?)
देव या मानवनिर्मित संकल्पनेचं माणसानंच जितकं दैवतीकरण केलं आहे तितकंच हास्यास्पद विदूषकीकरणही केलं आहे. कला किंवा साहित्य क्षेत्र तर त्याला अपवाद नाहीच. मंटोला मायानगरीच्या प्रवेशातच फ्राॅड जाणवला.
या लहानशा उदाहरणांतून तत्कालीन फिल्म स्टुडिओ, त्यांचे रुटीन नियम यांचं वर्णन आणि त्यातून निर्माण होणारा साधीच विनोद जरी समोर येत असला तरी मानवी प्रवृत्तींचं आणि व्यवस्थांचं दर्शन घडवणारा हा एक उत्तम नमुना आहे, हे लक्षात येतं. एखादं पद आणि त्याला चिकटून येणा-या जबाबदा-या यांचा वापर, पडद्यावर असलेलं, दिसणारं एखाद्या कलाकाराचं रूप त्याच्या चाहत्यांकरता वलयांकित असलं तरी त्या कक्षेबाहेर असलेल्या अनेकांकरता तो कलाकार हा साधारण व्यक्ती
असतो. असा विरोधाभास कालातीत आहे. आपण आपल्या अधिकारात दुस-या कुणाला कसं खडसावतो, सुनावतो… मग तो कुणी का मोठा असेना, याबद्दलचे किस्से गर्वाने सांगणारे अनेक महाभाग आपल्याला भेटतात.
मुन्शी म्हणून स्टुडिओत काम करताना दिग्दर्शकाला पान आणून देणं इथपासून चुकीच्या उर्दूत संवाद लिहून वर गप्प बसणं, हे सगळं त्याच्यासारख्या सर्जनशील कलाकाराकरता अतिशय वेदनादायी होतं. परंतु परिस्थितीने त्याच्यावर ती वेळ आणली. त्यानं ते काही प्रमाणात सहनही केलं. आपल्या भाषेवर नितान्त प्रेम करणा-या मंटोला मुंबईच्या मायानगरीत कळलं की, भाषा आणि तिच्या सौंदर्याबद्दल, वापराबद्दल इथे कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही.
‘फ़र्ज-ए-अदा’ हे फिल्मचं नाव मालकाला ब्रिलियन्ट वाटतं आणि ते त्या फिल्मचे अधिकार विकतात. दिग्दर्शकही मान डोलवतात. पण हे नाव उर्दू भाषेच्या शब्दार्थाच्या दृष्टीने कसं चुकीचं आहे, हे मंटो त्यांना कळकळीने समजावून सांगतो. ते ‘अदा-ए-फ़र्ज’ असं हवं असल्याचं सांगतो. आपल्या मतावर ठाम राहतो. “टायटल चेंज होने को नहीं सकता. मी चित्रपट विकून टाकले आहेत.” असं मंटोला ऐकवलं जातं आणि त्याची नोकरी जाते.
फिल्मच्या नावापासूनच इथे योग्य भाषेची योग्य कदर ठेवली जात नाही, हे मंटोच्या लक्षात येऊ लागलं. यासंबंधी आणखी एक किस्सा तो सांगतो.
‘चित्रपटाचे नाव ‘उल्लू के दो पठ्ठे’ असे होते.
मी हरकत घेतली. “हे उल्लू के दो पठ्ठे काय? ‘दो उल्लू के पठ्ठे’ असायला हवं.” मला उत्तर मिळालं — “तू कोण हे सांगणारा. आमचे पैसे इथे लागले आहेत यावर. आम्हांला हवं असेल तर आम्ही त्याला ‘पठ्ठे के दो उल्लू’ असंही म्हणू.”
तर माझ्या प्रिय वाचकांनो ‘उल्लू के दो पठ्ठे’ वर काम सुरू झाले आणि मी परत एकदा नव्या कामाच्या शोधाला लागलो.’
(मैं फिल्म क्यों नहीं देखता’/ मी बाॅलिवूड सहन का करू शकत नाही?)
स्वतःच्या भाषाप्रेमाकरता आणि तत्त्वाकरता मंटोने अनेक वेळा कष्टात दिवस काढले. नोक-या बदलल्या.
फिल्म स्टुडिओमध्ये सगळे खोटे देखावे उभे केलेले असतात, तळपत्या उन्हात कॅमे-यावर लाल फिल्टर बसवून चंद्रप्रकाशाची बरसात होते आणि चुना-पाण्याचं मिश्रण म्हणजे उतू जाणारं दूध असतं.
काश्मीरमधील बर्फवृष्टी म्हणजे कागदांचे कपटे आणि साबणाचा फेस असतो, झेब्रा मिळाला नाही तर गाढवाला रंगवलं जातं इत्यादी. अश्रू म्हणजे ग्लिसरीन असतं आणि सगळ्या भावना खोट्या असतात, अशी परिणामकारक फसवेगिरी असूनही, लोक थिएटरमध्ये गर्दी करतात, शिट्या वाजवतात. आपणही त्यांच्यातलेच एक आहोत या सगळ्याचं मंटोला प्रचंड वैषम्य वाटू लागलं. हळूहळू फिल्मचा धंदा हा एक फ्राॅड असल्याची भावना त्याच्या मनात अधिकच प्रबळ होऊ लागली.
मंटो हा एक लेखक होता. लेखक तरी शेवटी काय करत असतो? शब्दांमधून काल्पनिक विश्वच तर निर्माण करत असतो. तेही एक आभासी जगच. तीही फसवेगिरीच की,असंही कुणाला वाटेल. ब-याच अंशी ते खरंही आहे. प्रतिसृष्टीचा निर्माता असं लेखक-कलाकाराला म्हटलं जातच. अर्थातच ती अनेकार्थांनी आभासी असते.
मंटो त्याला अपवाद कसा असेल? ही फिल्मी दुनिया खोटी असते हे तर सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ असूनही मंटोला त्याबाबत आक्षेप का असावा, असं आपल्याला वाटतं.परंतु मायानगरीतील लोकांच्या दिखाऊ वृत्ती-प्रवृत्तींबद्दल मंटोला अधिक आक्षेप होता. भाषेला, लेखकाला गृहीत धरण्याबद्दल त्याला आक्षेप होता.
स्वतः कथा-पटकथा लिहूनही एका मामुली मुन्शीचं नाव पडद्यावर झळकलं तर कंपनीच्या इमेजचं काय होईल, तेव्हा तुला पैसे मिळतील पण नावाला किंमत असलेल्या माणसाचं नाव पडद्यावर देऊ या मायानगरीतल्या किडक्या विचारसरणीला त्याचा आक्षेप होता. म्हणजे बघा आज बाॅलिवूडमध्ये कंपूबाजीचं, कोत्या मनोवृत्तींचं दर्शन घडतंय त्याची बीजं पाऊणशे वर्षांपूर्वीच पेरली गेली होती हे लक्षात येतं. त्यामुळे कलाक्षेत्र हे निर्भेळ कधीच नसतं का असा प्रश्न सामान्य रसिकांच्या मनात येतो.
मंटोच्या शब्दांतून निर्माण होणारं आभासी जग हे वास्तवाचं खणखणीत दर्शन घडवणारं होतं. त्याच्या लेखनातील भोवताल, त्याच्या व्यक्तिरेखा, त्यांचे गुणविशेष हे अस्सल होते. त्यांच्यावर बेगडी आदर्शवादाची झूल नव्हती. त्याच्या कथांमधील व्यक्तिरेखा आपल्या आदिम प्रेरणा, आपल्या वृत्ती-प्रवृत्ती पारदर्शकपणे समोर आणत. मुंबईच्या साजि-यागोजि-या रूपामागे असलेलं दाहक वास्तव त्याच्या जाणिवांनी टिपलं आणि लेखणीनं कागदावर उतरवलं.
म्हणजे कलाक्षेत्रात, साहित्यात नेहमी फक्त वास्तवाची लक्तरंच दाखवली जावीत का? मनोरंजन करून आभासी का होईना, आनंदाच्या दोन घटका देणं चुकीचं आहे का? असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. कला-साहित्य क्षेत्रांत त्यावर पिढ्यान् पिढ्या चर्चा, वाद रंगले आहेत. समन्वयात्मक मार्गही शोधले गेले आहेत. अर्थात प्रत्येक लेखक-कलाकाराची स्वतंत्र शैली निर्माण होते. मंटो त्याला अपवाद नव्हता.
मंटोच्या नजरेनं जी मुंबई टिपली ती नाल्यांच्या कडेला असलेल्या वस्तीची, वेश्यागृहांची, झोपडपट्टीची. आपल्या कला-साहित्यातून आपण जर आपल्या शहरातील संगमरवरी, मुलायम न्हाणीघरं दाखवू शकतो तर शहरातील घाण बाहेर घेऊन जाणा-या गटारगंगेचं दर्शन का नाही घडवू शकत? पारंपरिक-आदर्शवादी सौंदर्य दाखवू शकतो तर वास्तववादी कटू सत्य का नाही? असे प्रश्न त्याला पडत.
मंटोच्या या विचारांच्या आणि लेखनाच्या प्रकृतीला बाॅलिवूड काही मानवेना हे बाकी खरं. शेवटी पूर्ण एक तप या मायानगरीत घालवून, फाळणीनंतर त्याने मुंबईचा निरोप घेतला.त्यानंतर अतिशय प्रिय असलेला सिनेमा बघणंही त्यानं कायमचं बंद केलं.
त्याच्या लेखाच्या शेवटी तो म्हणतो,’चित्रपटाचा धंदा म्हणजे कसली परिणामकारक फसवेगिरी आहे– त्याने तो बनवायला मदत करणा-यालाही बनवले. तर– तुम्ही मला कधी विचारले असते, तर मी सांगितले असते की, म्हणून मी चित्रपट बघत नाही.’
(मैं फिल्म क्यों नहीं देखता’/ मी बाॅलिवूड सहन का करू शकत नाही?)
सैगलच्या ‘ज़िंदगी’ या चित्रपटाचं परीक्षण मंटोनं केलं होतं. जे त्यानं केलेलं एकमेव परीक्षण आहे. त्याबद्दल आणि मंटोबद्दल अधिक काही जाणून घेऊ पुढील लेखात.
(लेखातील मंटोची अवतरणे-संदर्भ- १– ‘मी का लिहितो?’
— संपादन श्री. आकार पटेल, ‘ – अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, २०१६.
२– ‘मंटो जिंदा है/ मंटो- तप्त सूर्याचा संताप,– डाॅ. नरेन्द्र मोहन/
अनुवाद- डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती,२०१३.)
– © डाॅ निर्मोही फडके.