आजचं बाॅलिवूड आणि त्याविषयी मागील आठवडाभर चालू असलेल्या घडामोडी, चर्चा, टीका-प्रत्युत्तरं इत्यादी इत्यादींबद्दल आपल्याला थोडंबहुत माहीतच आहे. नेपोटिझम किंवा घराणेशाही आणि पैशाचा गैरमार्गी स्रोत, त्या पैशामुळे होणारी दंडेलशाही इ. प्रकार फक्त बाॅलिवूडमध्येच नव्हे, तर राजकारणात आणि इतर सामाजिक क्षेत्रांतही दिसतातच की,असो. भारतीय चित्रपट असं म्हटलं की, मुंबईचं बाॅलिवूड हेच समीकरण बनलं किंवा बनवलं गेलं आहे. आज कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा हा बाॅलिवूडी सिनेमा आता १०७ वर्षांचा झाला, त्याची नवनवी प्रयोगशील रूपं आली, तरीही त्याच्या उत्तमतेबद्दल शंका घेतली जातेच.
भारतीय सिनेमा ज्या वेळी फक्त २५ वर्षांचा आणि स्वतंत्र भारत देश जेमतेम एक वर्षांचा होता, तेव्हाही हा एक विवादास्पद मुद्दा होता, हे मंटोच्या एका लेखामधून लक्षात येतं. ‘हिंदुस्तानी सनत ए फ़िल्मसाज़ी पर एक नज़र’, या लेखात मंटोने भारतीय सिनेमाच्या निर्मितीबद्दल, गुणवत्तेबद्दल प्रश्न निर्माण केले आहेत. सिनेमातील एकेक महत्त्वाचे घटक अगदी सिनेपत्रकारितेलाही घेऊन मंटोने ताशेरे ओढले आहेत.
दादासाहेब फाळके यांचा उल्लेख करून आणि त्यांना भारतीय सिनेनिर्मितीचं श्रेय देऊन मंटो आपल्या लेखास सुरुवात करतो. पुरोगामी भारतीय युवकांचा प्रतिनिधी असा स्वतःचा उल्लेख करतो. मंटोने भारतीय सिनेमानिर्मितीबद्दल केलेला आरोप असा की, चित्रपट तयार करणारे सगळे जुन्या विचारांचे, प्रगतीची इच्छा नसलेले असे आहेत. अशा साचलेल्या पाण्यासारख्या आयुष्यांतून नवी कला उमलणारच नाही असं तो ठामपणे सांगतो.
काँग्रेस पक्षाचा, इंडियन मोशन पिक्चर असा उल्लेख करून हा पक्ष लठ्ठ खिशांच्या धंदेवाईक नियंत्रकांकडून चालवला जात असल्याचा गंभीर आरोप अतिशय स्पष्टपणे करतो. याचा बाॅलिवूडशी काय संबंध? तर मंटोने मांडलेला मुद्दा असा की, भाबड्या पण आयुष्य उत्साहाने जगण्यास उत्सुक अशा तरुणांना देशप्रेमाचा संसर्ग लावून, त्यांच्या तरुण रक्ताचा फायदा करून घेण्याचा विचार सत्ताधारी करतात. देशसेवेच्या भावनेचा आदर केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर कलाप्रांतातही आपला देश जगाच्या नकाशावर अभिमानाने कसा मिरवेल याचाही विचार केला पाहिजे. त्याकरता हवी, अभिनव
कलाविचारांची, सळसळत्या रक्ताची, प्रगतिशील तरुण मंडळी, पण ती तर पक्षांच्या राजकारणात गुंतली आहेत, असे तो म्हणतो. जुनाट विचारांचे लेखक – दिग्दर्शक यांच्याकडून तयार केले गेलेले भारतीय चित्रपट म्हणजे अमेरिकन चित्रपटांच्या केवळ नकला असून भारतीय जाणिवा असलेले चित्रपट औषधालाही नसल्याचा आरोप तो करतो.
कलेविषयीचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मंटो मांडतो. भारतात कलेची व्याख्या केली गेलेली नाही. कला म्हणजे रंगाने भरलेला हौद आहे ज्यात प्रत्येक जण त्याचा कपडा बुचकळून काढतो. पण ही कला नव्हे किंवा हे
कलाकारही नव्हेत.’
(‘हिंदुस्तानी सनत ए फ़िल्मसाज़ी पर एक नज़र’/बाॅलिवूडने काय करायला हवे’)
80 वर्षांपूर्वीचे मंटोचे हे उद्गार आजमितीस तितकेच खरे ठरताना दिसतात. भारतीय कला ही जगाच्या इतिहासातील एक महान परंपरा मानली जात असली तरी एकूणच आजही या कलेच्या विकसनशील आलेखाचा भूतकाळ, वर्तमान आणि तिचे भविष्य याबद्दल साशंकता निर्माण केली जाते. ती का? यांची उत्तरं शोधायला हवीत. अर्थात आजच्या भयानक परिस्थितीवर मात केल्यानंतरच. भारतीय कलाकार आणि भारतीय कलारसिक हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
( तसा हा लाॅकडाऊन काळ चिंतनाकरता योग्य आहेच.)
मंटोने सिनेमानिर्मितीचे एकेक महत्त्वाचे घटक घेऊन त्याबद्दल आपली परखड निरीक्षणं नोंदवली आहेत.
भारतीय फिल्मी पत्रकारिता ही व्यावसायिकतेवर, केवळ पैसे मिळवण्यावर लक्ष केंद्रित करते, असं त्याचं स्पष्ट मत आहे. वृत्तपत्रं आणि मासिकांची संख्या भरपूर असूनही खरी पत्रकारिता इथे दिसत नाही, राष्ट्र म्हणून आपण अजून रानटीच आहोत, खरे विचारवंत होण्यापर्यंत पोहोचू तेव्हाच पत्रकारितेमध्ये बदल होतील, हे त्याचं निरीक्षण आहे.
सिनेमा हे माध्यम केवळ मनोरंजनाचं आहे की, मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचंही आहे? हा प्रश्न सिनेमाची शंभरी झाली तरी चर्चांमध्ये चघळला जातो. याच काळात मराठी साहित्यातही कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा फडके-खांडेकर यांचा प्रसिद्ध वादही रंगला होता. सिनेमाच्या पंचविशीत तर तो ऐरणीवरच होता.
चित्रपटातून दोन्ही व्हावं, असं मंटोचं मत या लेखातून दिसतं. त्याच्यामते त्या वेळच्या काळाची ती गरज होती. भारतीय चित्रपटांमधून मनोरंजनाबरोबरच मनाची मशागत करणारे चित्रपट निर्माण व्हावेत असं तो म्हणतो. थर्डरेट सिनेमा इथे तयार होतो कारण केवळ नफ्याचा विचार केला जातो आणि टुकार मनोरंजन लोकांना आवडतं, कारण निर्माताच त्यांना अशा मनोरंजनाची सवय लावतो, असं तो म्हणतो. संपूर्ण मानवजातीची खरी वेदना मांडणारा, आपल्या भाषेतील, मातीतील
सिनेमा इथे निर्माण व्हावा असं त्याला मनापासून वाटतं.
(जे त्यानंतरच्या काळात काही प्रमाणात नक्कीच घडलं.)
भारतीय सिनेमाची दीर्घ लांबी, त्याकरता केला जाणारा अवाजवी खर्च, भारतीय दिग्दर्शक, नायक, नायिका, खलनायक, अभिनय, संगीत अशा अनेक महत्त्वाच्या घटकांविषयी मंटो काही खुलासे करतो. कमी लांबीच्या चित्रपटात एकसंघता येते, खर्चही कमी होतो, त्याला एक सुंदर घाट मिळतो. याकरता दोन तासांच्या कार्यक्रम निश्चितीचे धडे हाॅलिवूडकडून घ्यावेत असं तो नमूद करतो.
सिनेमात गाणी आणि दृश्यं यांना एक ठरावीक जागा असते, त्याचे भान न राखता काही वेळा अनाठायी नाच-गाणी घुसडली जातात. सिनेमा त्याची परिणामकारकता गमावतो. याकरता मंटोने ‘साधू/फकीर’ या शीर्षकाखाली जे एक दीर्घ निरीक्षण लिहिलं आहे, ते खरोखरंच वाचनीय आणि चिंतनीय आहे.
त्यातील काही अंश…
‘पटकथा सांगते, की नायिका कमालीची निराश आहे… दिग्दर्शकाला तिचे नैराश्य दाखवायचे आहे. त्यावर उपाय म्हणजे एखादा गाणारा भिकारी अवतीर्ण करायचा. स्टुडिओत कुठेतरी गायक उपलब्ध असतोच, त्यामुळे गरजेनुसार त्याला कुठेही घालता येते…त्याला माहीत नसते तो का गातोय. तो एक गाणारे यंत्र असतो … मला एक जण माहीत आहे, ज्याने स्टुडिओच्या सेटवरच्या प्रत्येक झाडाखाली किमान डझनभर गाणी गायली आहेत. जेव्हा प्रोजेक्टर त्याला ओकून बाहेर काढतो, तेव्हा आपल्याला सोफ्यावर बसलेली नायिका दिसते. लाँग शाॅट पहिल्यांदा मग क्लोज-अप.
आता आपण बाजारात असतो. तिथे आपला हा माणूस भिका-याचा वेष घालून त्याच्या दुःखाचे राष्ट्रगीत जोरजोरात गात असतो. तो साधारण साडेसात मिनिटे गात राहतो. त्या काळात आपण नायिकेला बघतो. ती त्या गाण्याच्या भावनांवर दीर्घ उसासे टाकत बसलेली असते. मला चित्रपटातील या मूर्खपणाची कारणे जाणून घ्यायची आहेत.मला आता कळून
चुकले आहे की जेव्हा केव्हा दिग्दर्शकाला कल्पनांची वानवा असते, तेव्हा तो चित्रपटात एखादा साधूमहाराज आणि त्याचे गाणे घालतो आणि त्याला वाटते की त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
चित्रपटाची रचना म्हणून जरी विचार केला तरी हा असा अडथळा आणणे चूकच आहे. प्रेक्षकांचे लक्ष मग मुख्य निवेदनाकडून बाजूला जाते, गाणा-या साधूकडे. तो थोड्याच वेळात गायब होतो आणि गोष्ट आहे तिथेच राहिलेली असते. मग आपण हे वळण घेतलेच कशाला? एखाद्या निर्मात्यांनी चित्रपटाचे यश गाणा-या साधूला बहाल केले असावे. त्याचा जो
अव्याहत वापर होतो आहे, त्यावरून आपल्या चित्रपटनिर्मितीत सर्जनशीलतेची किती कमतरता आहे हे दिसून येते. साधू आता बाॅक्स ऑफिसवर ठिय्या देऊन बसला आहे,थोडीफार अभिरुची आणि चिकित्सेची क्षमता असणा-या प्रेक्षकांना न दमता वैताग आणतो आहे. या इसमाला कृपया उचलले पाहिजे.’
(‘हिंदुस्तानी सनत ए फ़िल्मसाज़ी पर एक नज़र/बाॅलिवूडनेकाय करायला हवे’)
सआदत हसन मंटोने ७५ वर्षांपूर्वी बाॅलिवूड चित्रनिर्मितीला किती तंतोतंत ओळखले होते,ह्याचं, हा परिच्छेद म्हणजे एक उत्तम उदाहरण. अशा प्रकारे त्याच त्याच गोष्टी, त्याच प्रकारची दृश्यं, गाणी इ. वर्षानुवर्षं भारतीय रसिक नंतरही पाहत आले. ह्याला अनेक अपवाद नक्कीच आहेत.
भारतीय सिनेसंगीताची स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी समृद्ध आणि दीर्घ परंपरा निर्माण झाली आहे. त्या खजिन्यातील अनेक लखलखते हिरे आणि त्या हि-यांच्या गायकीची, संगीताची प्रभावळ गेल्या साठ-सत्तर वर्षांत जन्माला आलेल्या पिढ्यांनी अनुभवली आहे. अनेक कलाकार, तंत्रज्ञ या सिनेसंगीतामुळे जगले, अजरामर झाले.भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेपासून दूर राहिलेल्या आम भारतीय जनतेला या सिनेसंगीताने निदान कानसेन तरी बनवलं. लोकसंगीताला स्थान मिळवून दिलं.
स्वतःची एक ऐतिहासिक परंपरा, एक सुवर्णकाळ निर्माण केला.
तरीही मंटोने बारकाईने निरीक्षण करून जे अभ्यासपूर्ण आणि सोदाहरण मांडलं आहे, ते आजच्या मसाला चित्रपटांच्या बाबतीत पटतं. साधूच्या गाण्यासारखीच, त्याच त्याच प्रकारची आयटम साँग ही त्या सिनेमात नक्की कशाकरता असावीत हा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकालाही पडतो. तर याउलट केवळ संगीतामुळे बाॅक्स ऑफिस हिट मिळवलेल्या चित्रपटांची संख्या कमी नाही.
समृद्ध परंपरा असलेल्या अशा भारतीय सिने-संगीतातील माफिया राजकारणावरही सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी त्यातील संगीताची जाहिरात, म्युझिक लाँच करण्याच्या पार्ट्या इत्यादी, सिनेकंपन्यांमधील
राजकारण, अर्थकारण, कोल्ड वाॅर, त्यामुळे बळी गेलेले जीव इत्यादी. तसंच सिनेसंगीताच्या क्षेत्रात खेडेगाव, लहान शहरं इत्यादी भागांतून आलेल्या कलाकारांमधील नव्या तरुणाईच्या आवाजाला दडपणं, त्यांना मुळापासून कसं उखडता येईल याचं राजकारण करणं, इत्यादी काळ्या बाजू उघड होऊनही सगळं कसं निष्फळ आहे, हे सामान्य कलारसिक मूग गिळून बघत बसतो. ही वर्तमान परिस्थिती आपण आज अनुभवत आहोत.
(आता वेबमूव्हीच्या जमान्यात पुन्हा गद्य सिनेमाकडे तरुण आणि मध्यमवयीन पिढी वळलेली दिसते. तेव्हा सिनेसंगीताचं काय, असा एक प्रश्न आहेच.)
मंटो स्वतः काही वर्षं मुंबईच्या फिल्म स्टुडिओमध्ये नोकरी करत होता. त्यामुळे ही चंदेरी दुनिया त्याने जवळून पाहिली, अनुभवली. तो स्वतः कथालेखक, पटकथालेखक होता त्यामुळे सिनेलेखनातील आराखडे, आडाखे, लेखणीची कसरत आणि
सर्जनशील लेखकाच्या मनातील ताणेबाणे तो ओळखून होता. सिनेपत्रकारिता आणि एकूणच पत्रकारिता त्याने कमी प्रमाणात केली. परंतु जेवढी केली तेवढी अभ्यासूवृत्तीने, कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आणि मनापासून. मुंबईच्या या मायानगरीविषयी आणि हिंदी सिनेमाविषयी मंटोच्या लेखणीतून उतरलेली आणखी काही अभ्यासू मतं आणि गमतीशीर निरीक्षणं पुढील लेखात.
(क्रमशः-)
(लेखातील मंटोची अवतरणे- संदर्भ –‘मी का लिहितो?’ – संपादन श्री. आकार पटेल, अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, २०१६)
———- © डाॅ निर्मोही फडके.