Home » साॅइल सोऽल साहित्यिक १२

साॅइल सोऽल साहित्यिक १२

by Correspondent
0 comment
Share



फाळणीनंतर भारताला, मुंबईला सोडून मंटो पाकिस्तानात गेला, म्हणून मंटो देशद्रोहीसुद्धा ठरवला गेला. अर्थात त्या स्थित्यंतराच्या काळात जे कलाकार, जी सामान्य माणसं अशा प्रकारे देशोधडीस लागली, त्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक हळुवार कहाणी आहेच. अनेक वेळा कुणाच्याही जगण्याच्या निर्णयाबाबत आपण सगळेच एखादी सरधोपट प्रतिक्रिया देतो आणि मोकळे होतो. त्या प्रत्येकाच्या हळुवार कहाणीचा, त्याच्या आयुष्यात आधी आणि नंतर झालेल्या उलथापालथीचा विचार आपण करत नाही. तो करायला आपल्याजवळ वेळही नसतो.

मात्र मंटो हे नाव धारण करणा-या व्यक्तीने एकूणच भारतीय साहित्याचा तळ ढवळून काढला, त्यामुळे त्याच्या आयुष्यात झालेल्या या स्थित्यंतरानंतर त्याने जे लेखन केलं, त्याचा एक वेगळा विचार केला गेला. अजूनही केला जातो. स्वतःची जगण्याची मुळंच उपटून ती पुन्हा नव्या जागी रुजवणं, हे अनेकांच्या आयुष्यात घडत असतं. काहींच्या आयुष्यात तर सतत किंवा अनेक वेळा ही प्रक्रिया घडत असते.अशा वेळी संवेदनशील लेखणी लाभलेल्या लेखकाच्या प्रतिभेला कधी नवे धुमारे
फुटतात तर कधी ती निस्तेज होत जाते. अर्थात प्रत्येक कलाकाराचा भोवताल हा त्याच्या कलाकृतीवर प्रभावी परिणाम करतच असतो कळत नकळतपणे. कधी तो परिणाम सकारात्मक ठरतो, तर कधी नकारात्मक.

पाकिस्तानात जाऊन स्थायिक झाल्यावर पुढची सहा-सात वर्षं मंटोची लेखणी इतकी फुलली नाही, जितकी ती मुंबईच्या वास्तव्यात बहरली होती.पाकिस्तानविषयीचे मंटोचे लेख आणि तिथे लिहिलेल्या कथा इ. लेखन हे फाळणीपूर्वीच्या
मुंबई किंवा दिल्लीतील वास्तव्यात लिहिलेल्या लेखनापेक्षा तुलनेने थोडं वेगळं वाटतं. पाकिस्तानचं नागरिकत्व घेतल्यानंतर तिथल्या वास्तव्यात न मिळालेलं समाधान हे त्याच्या लेखनात प्रकर्षाने प्रतिबिंबित झालेलं दिसतं.

सतत प्रश्न पडणं आणि त्यांची उकल शोधण्याचा प्रयत्न करणं हे शास्त्रज्ञही करतो आणि लेखक-कलाकारही. दोघांच्या या प्रक्रियेत फरक असतो आणि तिच्या परिणामांतही. दोघंही सर्जनच करत असतात खरं तर. मंटोच्या लेखणीला अनेक प्रश्न पडत. त्या प्रश्नांना आपल्या लेखनातून व्यक्त करताना मंटोच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक जाणिवा, त्याची प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती आणि त्याच्याकडे असलेलं भाषेचं सहजसौष्ठव यांचा मिलाप होत असे. ब्लॅक ह्यूमर किंवा औपरोधिक स्वर पांघरून मग त्याचे शब्द कागदावर उतरत.

‘सवाल पैदा होता है’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखाची सुरुवात त्याने मनात प्रश्न निर्माण होण्याच्या प्रक्रियेवरच विडंबन करत केली आहे. मंटो लिहितो,

‘सभ्य स्त्री-पुरुषांनो (आणि काहीशा कमी सभ्य स्त्री-पुरुषांनोही), कृपया इकडे लक्ष द्या !
आपल्याला असे कळवण्यात येते आहे की एक सवाल पैदा झाला आहे. खरे तर अॅडमच्या जमान्यापासून आजपर्यंत आकाशात जितके तारे आहेत तितके सवाल पैदा झालेले आहेत. पण इतके असूनही ते पैदा होतच राहतात.

अल्ला लोकसंख्येचा विस्फोट नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक आपत्तींना खाली पाठवतो. तो आपल्याला युद्धं करायला उत्तेजन देतो. तो पाकिस्तान आणि अखंड भारत निर्माण करतो. हे करून तो माणसांना जन्मदर नियंत्रित करण्याच्या नवनवीन पद्धती शिकवत असतो.

परंतु काही कारणांमुळे असावे, त्याने अजून प्रश्न-निर्मितीचा विस्फोट कसा करायचा या समस्येची दखल घेतलेली दिसत नाहीये. सवाल पैदा होतच राहतात.’
(‘सवाल पैदा होता है’)

नवनिर्मित पाकिस्तान आणि हिंदुस्थान आपापल्या नशिबाने निर्माण केलेल्या मानवनिर्मित समस्यांशी झुंजत असताना अतिशय तरल संवेदना असणा-या मंटोसारख्या अनेक लेखक-कलाकारांची कशी मानसिक, वैचारिक कोंडी झाली असेल, ह्याचा प्रत्यय सध्याच्या काळात आपणही घेत आहोत. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची ही अवस्था.

निर्वासित झालेल्या मनांचं जगण्यातलं नैराश्य, व्यवस्थांमधील राजकारण इ गोष्टी आता आपल्या इतक्या सवयीच्या झाल्या आहेत की, मंटोने मांडलेले प्रश्न आपल्यालाही कोणे एके काळी पडले होते, अजूनही कधी पडतात पण अंगावर झुरळ पडलं तर जितक्या वेगाने आपण ते झटकून टाकतो, त्याहीपेक्षा जास्त वेगाने आपण आपल्या डोक्यातील,
मनातील ह्या प्रश्नांना झटकून मोकळे होतो असं वाटतं.

मंटो आपल्या मनातील सवाल परखडपणे मांडतो, ‘तुम्ही बेकार आहात, काम मिळत नाहीये आणि खर्च भागवताना जीव मेटाकुटीला येतो आहे. दोन वर्षें झगडून झगडून अखेरीस तुम्ही थकता आणि स्वतःला संपवण्याचे ठरवता.
सुदैवाने तुमचा प्रयत्न यशस्वी होत नाही. पण आता कायद्याचा सवाल पैदा होतो :
आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हांला शिक्षा का केली जाऊ नये?’
(‘सवाल पैदा होता है’)

आत्महत्येचा सवाल हा एक न सुटणारा तिढा आहे. समाजात रहायचं असेल तर समाजाने तयार केलेले नियम काही प्रमाणात तरी पाळणं बंधनकारक ठरतं. स्वातंत्र्याच्या व्याख्या बदलतात. कक्षा कमी-जास्त होतात. दुस-याचं आयुष्य संपवण्याचा निर्णय जसा आपण घेऊ शकत नाही, समाजाच्या कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो, तसंच स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य कायदाव्यवस्थेने आपल्याला दिलेलं नाही. याविषयी निरंतर वादविवाद चालतात. प्रायोपवेशन हा वृद्ध, जर्जर झालेल्या व्यक्तींकरता मृत्यू जवळ आणण्याचा एक उत्तम मार्ग आपल्या संस्कृतीने आजही आपल्यासमोर ठेवला आहे. आज आपल्या आजूबाजूला, सिनेमाजगताच्या चमचमत्या दुनियेत,अगदी लहान लहान विद्यार्थ्यांपर्यंत कितीतरी जीव असे आहेत की, जे या जीवन-मृत्यूच्या प्रश्नाच्या सीमारेषेवर आंदोलित होत असतात. निर्णयही घेत असतात.

वैयक्तिक आयुष्यात मंटो अनेक वेळा अशा प्रकारच्या मानसिक आंदोलनातून गेला. आत्महत्येच्या विचारांपासून स्वतःला त्याने कितीकदा मोठ्या मुश्कीलीने परावृत्त केलं.मंटोच्या चरित्रामध्ये असा उल्लेख मिळतो की, अमृतसरमधील वास्तव्यात कुमारवयीन मंटोच्या खोलीत दोन वस्तू होत्या, एक भगतसिंगांची प्रतिमा जिच्या बाजूला तेलाचा टेबल लॅम्प होता, तर त्याच्या बाजूला जुन्या पद्धतीचा एक टेलिफोनचा रिसीव्हर. एका पब्लिक टेलिफोन बूथवरच्या बिघडलेल्या फोनचा मंटोने रागाने तोडून आणलेला असा तो रिसीव्हर.

या दोन्ही वस्तू मंटोच्या दाहक विचारसरणीच्या प्रतीक आहेत. १९१९ मध्ये जालियाँवाला बाग हत्याकांड घडले तेव्हा मंटो सात वर्षांचा होता. त्या बागेत तो अनेक वेळा जात असे. त्याच्या बालमनावर त्या घटनेचे खोल पडसाद उमटले. भगतसिंग हा त्याचा तारुण्यातील हिरो बनला. क्रांतिकारी विचारांपासून ते आत्मघातकी विचारांपर्यंत अनेक वेळा नंतरही त्याचं मन हिंदकळत राहिलं. स्वतःलाच प्रश्न विचारत राहिलं. पण ह्या हिंदकळण्यातून, प्रश्नांतूनच काही रचनात्मक असं मात्र त्याच्या हातून घडत गेलं, ज्याची माध्यम बनली त्याची लेखणी. जीवन-मरणाच्या सीमारेषेपर्यंत जाऊन परतल्यावर त्याची लेखणी नवं काही लिहीत राहिली. जालियाँवाला बाग हत्याकांड घटना त्याच्या मनाच्या डोहतळाशी घट्ट रुतून राहिली, पुनरावृत्त होत राहिली. निराश मनात उसळणा-या क्रांतिकारी विचारांना लेखणीचा मार्ग गवसला आणि त्या घटनेवर मंटोची ‘तमाशा’ नावाची पहिली कथा शब्दबद्ध झाली.

थोडक्यात, आत्महत्येचा सवाल त्याच्या मनाच्या पार्श्वभूमीवर सतत एखाद्या पडद्यासारखा होता, जो एखाद्या गहि-या घटनेच्या धक्क्याने हलत असे. पण त्याच्या मनाची संवेदन-सर्जनशक्ती त्याला त्यातून खेचून बाहेर काढत असे. आपल्या एक-दीड वर्षांच्या लहानग्या मुलाच्या मृत्यूनंतर तो ढसाढसा रडला. पण त्याच्या मृत्यूबद्दल तो आपल्या मित्राला, कृष्ण चंदरला म्हणाला,

“कृष्ण, मला मरणाची भीती वाटत नाही. कोणाच्याही मरणाचा माझ्यावर परिणाम होत नाही. परंतु हा मुलगा, माझा मुलगा आहे म्हणून म्हणत नाही मी… मला वाटतं जेव्हा एखादा नवीन विचार (कल्पना) पूर्ण होण्याअगोदरच खंडित होतो, त्यावेळी केवढी मोठी दुर्घटना होते. नवीन बाळ म्हणजे नवी कल्पना-नवा विचार आहे. तो का खंडित झाला? …निसर्गाला एखाद्या नवीन कल्पनेचा एवढ्या लवकर गळा दाबून टाकायला पाहिजे होता का?”.’मुलाच्या मृत्यूकडे अशा त-हेनं बघणं हा एक नवीन आणि मौलिक विचार आहे. या वेदनामय अनुभवामुळे मंटो विसकटून गेला.’
(मंटो ज़िंदा है/मंटो तप्त सूर्याचा संताप)

आयुष्यात असे विसकटण्याचे अनुभव घेतलेल्या मंटोला सतत प्रश्न पडत राहिले, त्यांना लेखणीतून इतरांकरता मांडता मांडता तो स्वतःची उत्तरं शोधत राहिला.

फाळणीनंतर पाकिस्तानला लाहोरमध्ये स्थलांतरित होताना आणि झाल्यावरही मंटोच्या हृदयात बसलेली मुंबई आणि हिन्दुस्तान तो वेगळा करू शकत नव्हता.

‘गंजे फ़रिश्ते’मध्ये मंटो लिहितो, ‘मोकळेपणात असा सुगंध आहे जो पाकळ्या कुस्करून नव्हे तर त्यांना हवेमध्ये उधळून
टाकल्यावर मिळतो. ‘हा सुगंध दिल्ली, मुंबई आणि लाहोरपर्यंत पसरला होता. ही संस्मरणे लिहून फाळणीचा काळिमा आपल्या संस्कृतीमधून धुवून टाकीत होता आणि लाहोरमध्ये बसून मुंबई आणि दिल्लीला जगत होता.’
(मंटो ज़िंदा है/मंटो तप्त सूर्याचा संताप)

स्वतंत्र पाकिस्तानात मंटो साडेसहा-सात वर्षं जगला, मनात आणि डोक्यात अनेक सवाल घेऊन. उत्तरं शोधत राहिला. मंटोलिखित ‘सवाल पैदा होता है’ मधील हे काही प्रश्न .ज्यांची उत्तरं आजही आपण शोधत आहोत… तपशील आहेतच, सुज्ञ वाचक संदर्भ लावू शकतात.

‘कालच माझ्या मनात आले : जेव्हा अॅडम अस्तित्वात आला तेव्हा त्याला काय वाटले
असावे?’

‘एका भिका-याला असे म्हणताना ऐकले आहे :’ मला जिनांना विचारायचंय की त्यांचं इस्लामिक राज्य म्हणजे त्यांनी नवनव्या जाकिटांमध्ये मिरवणं आणि मी या चिंध्या घालणं काय?’

‘सध्या बहुतेक लोक विचार करत आहेत की पाकिस्तान सरकारचे नक्की काम काय? प्रशासन करणे की खोडसाळपणा करणे?

‘सध्या पाकिस्तानात पुढील सवाल पैदा झाले आहेत : स्त्रियांनी त्यांना झाकून घ्यावे का?
या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर मग परिचारिकांचे काय? स्त्रियांनी आत्मविश्वासाने चालणे चांगले की वाईट?
स्त्रीने घोड्यावर बसताना सलवार घालावी की साडी नेसावी?’
(‘सवाल पैदा होता है’) …

या लेखात मंटोने विचारलेला शेवटचा दाहक सवाल (कोणत्याही बाजूने विचार केला तरी) आपल्याला प्रचंड अस्वस्थ करतो आणि त्या प्रश्नातून निर्माण झालेले अनेक उपप्रश्नं आजही आपल्याला शांतपणे जगू देत नाहीयेत हे लक्षात येतं तेव्हा मनाचा नि बुद्धीचाही संताप होतो.

मंटो लिहितो,

‘आपल्या नेत्यांच्या मनात पैदा झालेला एक सवाल फाळणीच्या वेळेस पाठीमागे ठेवलेल्या आणि शत्रूकडून वापरल्या जात असलेल्या ५० हजार मुलींशी संबंधित आहे.गेले नऊ महिने आपले नेते या प्रश्नाने अस्वस्थ आहेत. शक्य आहे की या ५० हजार
मुलींबरोबरच आणखी ५० हजार छोटे सवाल पैदा होतील (खरे तर काही हजार एव्हाना निर्माण झालेही आहेत.) ‘

————- © डाॅ निर्मोही फडके.

(लेखातील मंटोची अवतरणे-संदर्भ- १–‘मी का लिहितो?’
— संपादन श्री. आकार पटेल, अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, २०१६.
२– ‘मंटो जिंदा है/ मंटो- तप्त सूर्याचा संताप,– डाॅ. नरेन्द्र मोहन/
अनुवाद- डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती, २०१३.)
————- © डाॅ निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.