Home » साॅइल सोऽल साहित्यिक 2

साॅइल सोऽल साहित्यिक 2

by Correspondent
0 comment
Share

‘ज्यांना माझ्या आयुष्याची एखादी झलक हवी आहे त्यांच्यासाठी मी माझ्या लग्नाची गोष्ट सांगतो आहे. ती माझी मुंबईत येण्याचीही गोष्ट आहे. मी सगळेच तपशीलउघड करणार नाहीये, हे मात्र लक्षात असू द्या. काही तपशील वगळले जातील, कारण ते सार्वजनिक माहितीसाठी नाहीत.’ (लेख – मेरी शादी)

अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये शिकणा-या तरुण मंटोला टी. बी. झाला. तब्येत सुधारण्याकरता जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवरील बटोट गावी हवापालट करण्याकरता म्हणून तो काही महिने राहिला. तिथून अमृतसरला स्वतःच्या घरी आल्यावर घरची हलाखीची परिस्थिती, आईचे कष्ट पाहून त्याच्या मनात आत्महत्येचे विचार आले.

पण आपल्या आत्मकथनपर लेखात तो पुढे अशीही कबुली देतो की, माझी इच्छाशक्ती आहे त्याच्यापेक्षा भक्कम असती तर मी आत्महत्या केलीही असती. मुंबईतील मुसव्वर साप्ताहिकाचा संपादक होण्याविषयीचं पत्र त्या साप्ताहिकाच्या मालकांनी पाठवल्यावर मंटो मुंबईत दाखल झाला. त्याच वेळी इंपीरिअल स्टुडिओत मुन्शी म्हणूनही त्याला नोकरी मिळाली.

कलाक्षेत्रामध्ये नवोदित असणं, उमेदवारी करणं, आजच्या भाषेत सांगायचं तर स्ट्रगलर असणं म्हणजे काय याचा अनुभव बहुतेक जण घेतात. (असे नवोदित जेव्हा स्वतः प्रस्थापित होतात तेव्हा ते आपलं नवोदितपण विसरतात, तो भाग वेगळा.)
तर मुद्दा हा की, एखाद्या ज्युनियर लेखकाकडून उत्तम लेखन होत असेल तर ते एखाद्या ब्रॅन्डकडून जगापुढे आणताना, त्या ब्रॅन्डवाल्यांनाही खात्री वाटत नसते. त्यांनाही प्रस्थापितांच्या नावांचीच भुरळ असते. हे आजही आपल्याला भोवताली दिसतं.80 वर्षांपूर्वीही असे प्रकार घडत असल्याची कल्पना ‘मेरी शादी’ या मंटोच्या लेखातून येते.

आर्देशीर इराणी यांनी भारतातला पहिला रंगीत चित्रपट तयार करण्याचं ठरवलं. 1931 मध्ये इराणी यांनीच भारतातला पहिला बोलपट आलमआरा बनवला होता. खरंतर 1933 मध्ये व्ही. शांताराम यांनीही सैरंध्री हा आपला चित्रपट रंगीत बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो तांत्रिक कारणांमुळे असफल झाला. इराणीनिर्मित रंगीत चित्रपटाचं दिग्दर्शन मोती बी. गिडवानी करणार होते. मंटोने या चित्रपटाची पटकथा लिहावी असं त्यांना वाटत होतं.

मंटो लिहितो,’तो साहित्यिक माणूस होता आणि मी त्यांना आवडायचो. त्यांनी मला चित्रपटाच्या पटकथेवर काम करायला सांगितले. मी पटकथा लिहिली आणि आश्चर्य म्हणजे त्यांना ती आवडली; पण भारतातल्या पहिल्या रंगीत चित्रपटाची कथा एका कारकुनाने लिहिली असे त्यांना शेठ आर्देशीर इराणींना सांगवले नाही. मग ती कथा कोणातरी प्रसिद्ध माणसाच्या नावे टाकायची ठरली. मला शांतिनिकेतनमधले प्राध्यापक झियाउद्दीन आठवले.ते फारसी शिकवत. त्यांचा मी लाडका होतो, आणि त्यांनी आमच्या या लहानशा फसवाफसवीत सामील व्हायला होकार दिला. झियाउद्दीन यांचा ऋणनिर्देश करत चित्रपट प्रदर्शित झाला आणि सपाटून आपटला.(हा चित्रपट म्हणजे किसान कन्या, तो 1937मध्ये प्रदर्शित झाला होता.) त्यामुळे
कंपनीच्या समस्या आणखीनच बिकट झाल्या.’ (लेख – मेरी शादी)

बाॅलिवूडच्या आणि पर्यायाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या अगदी आरंभीच्या काळातील हे अनुभवकथन, पण हे वाचून असं वाटतं, उमेदवारी, मग ती कुठल्याही क्षेत्रातील असो, आम जनतेची तिच्याबद्दलची मानसिकता आज 80 वर्षांनंतरही जास्त काही बदललेली दिसत नाही.



आजही गूगलवर किसान कन्या या चित्रपटाच्या माहितीमध्ये, चित्रपटाची कथा प्रोफेसर एम. झियाउद्दीन असंच वाचायला मिळतं. परंतु तपशीलवार माहितीमध्ये आणि यू ट्यूबवरील माहितीपटामध्ये किसान कन्या ही सआदत हसन मंटो याच्या
नाॅव्हेलवर आधारित असल्याचा उल्लेख आहे.

तेव्हा भारतीय चित्रपटाचा रंगीत प्रवास ज्याच्या कथेपासून सुरू झाला, त्याचं आयुष्य मात्र भविष्यात बेरंगी झालं असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. मुळातच नाटक-चित्रपटाची दुनिया ही मोहमयी, क्षणभंगुर अशी समजली जाते. मंटोही या मोहात काही काळ
अडकला. इथल्या अनेक निराश आत्म्यांप्रमाणे निराश झाला. या चंदेरी दुनियेत नोकरी करत असल्याचे साईड इफेक्ट त्यालाही सहन करावे लागले.

बेभरवशाची फिल्म लाइन अशा शब्दांत ज्या क्षेत्राचं वर्णन केलं जातं त्या क्षेत्रात कारकुनी काम करणा-या माणसाला मुंबईमध्ये राहायला जागा मिळवणं आणि लग्नाकरता मुलगी मिळवणं दोन्ही कठीणच. त्यातून तो कारकून कलमबहाद्दर
असेल तर मग बघायलाच नको. लेखक-कवी हे तसे व्यावहारिक जगात उपेक्षितच.

अशा परिस्थितीतही चांगल्या घरातील मुलगी मिळून लग्न जमणं आणि होणं हे भाग्याचं, तेवढं भाग्य मात्र मंटोच्या नशिबी होतं. मेरी शादी या लेखात मंटोने स्वतःच्या लग्नापूर्वीपासून ते लग्न होईपर्यंतचा काळ आणि घटना यांचं तपशीलवार वर्णन केलं आहे.

स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटीशकालीन मुंबई इलाखा, घराचं भाडं, चित्रपट क्षेत्रातील आर्थिक व्यवहार, मुस्लीम घरातील रिवाज या सर्वांमधून लेखनाचा मार्ग शोधत जाणारा एक संवेदनशील लेखक आणि त्याची लेखणी. रोज संध्याकाळी स्वतःचं बिअर पिणं, लग्नापूर्वी अनोळखी बायकांशी आलेले संबंध याबद्दल तो स्पष्टपणे लिहितो तेव्हा त्या काळाचा, सामाजिक परिस्थितीचा विचार करता आश्चर्य वाटतं. लग्नापूर्वीच्या संबंधांना तो जगरुढीप्रमाणे अनैतिक म्हणत नाही तर, दोन प्रौढ माणसांची गरज असं म्हणतो. गर्दीत दोन अनोळखी माणसांनी घसटून पुढे जावं, इतकी ती साधी अशी घटना आहे असं त्याला वाटतं. विचारांतील हा व्यावहारिकपणा त्याने लेखनातही मांडला जो टीकेला पात्र ठरला.

या उलट स्वतःचं नवरा किंवा संसारी गृहस्थ होणं याबद्दल तो शंका व्यक्त करतो. गृहस्थ होण्यापेक्षा निबंधकार किंवा कथाकार होणं सोपं असल्याचं तो सांगतो. ऐंशी-पंचाऐंशी वर्षांपूर्वी मंटोने स्वतःवर आणि तत्कालीन हिंदी लेखकांवर
केलेली ही प्रासंगिक टिप्पणी वरवर विनोदी वाटली तरी तिच्यात एक खोल उपरोध दडलेला दिसून येतो.’माझ्या लग्नाची गोष्ट’ अर्थात ‘मेरी शादी’ या दीर्घलेखाच्या शेवटी स्वतःच्या लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या अनुभवाविषयी मंटोने लिहिलेला लहानसा परिच्छेद हा एखाद्या नवकथेच्या अवतारात चपखल बसावा असाच आहे.

मंटो लिहितो,’दुस-या दिवशी सकाळी मी जागा झालो तेव्हा जादूच झाली होती. माझा एक चतुर्थांश भाग नवरा झाला होता. तो नवरेपणा जाणवून मी सुटकेचा निःश्वास टाकला.बाहेर बाल्कनीमध्ये दोरी बांधली होती आणि त्यावर काहीतरी वाळत घातले होते,वा-यावर हेलकावत, फडफडणारे. आणि अशा प्रकारे सुरुवात झाली होती.’ (लेख – मेरी शादी)

‘मेरी शादी’ या दीर्घलेखाच्या अनुषंगाने मंटोच्या लेखणीचा घेतलेला हा एक लहानसा मागोवा. तसा मंटो आणखी खूपच बाकी आहे.
(क्रमशः-)

(संदर्भ –‘मी का लिहितो?’ संपादन – श्री. आकार पटेल – अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, 2016)

© डाॅ निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.